सध्या ४५-५० वर्षांपुढच्या कोणालाही प्रश्र्न विचारला की कुठे काही दुखते का? तर याचे उत्तर बहुधा ‘हो’ असेच येते. कुणाचे गुडघे दुखतात, कुणाचे घोटे, कुणाची हाताची बोटे तर कुणाचे खांदे!
- डॉ. भाग्यश्री झोपे
सध्या ४५-५० वर्षांपुढच्या कोणालाही प्रश्र्न विचारला की कुठे काही दुखते का? तर याचे उत्तर बहुधा ‘हो’ असेच येते. कुणाचे गुडघे दुखतात, कुणाचे घोटे, कुणाची हाताची बोटे तर कुणाचे खांदे! सध्या तर गुडघेदुखीला-सांधेदुखीला वयाची मर्यादा राहिलेली दिसत नाही. अगदी तिशीच्या आसपासची तरुण मुले-मुलीसुद्धा सांधेदुखीची तक्रार घेऊन आलेली पाहिली की अजून २० वर्षांनी यांचे काय होईल, अशी काळजी वाटल्याशिवाय राहत नाही. दुखणे म्हणजे काय? ते कशामुळे येते? याचे उत्तर आहे, ‘वेदना नास्ति विना वातात्’ म्हणजे वेदना किंवा दुखणे वाताशिवाय नसतात. क्वचित रक्तातील उष्णता वाढल्यानेही वेदना होत असल्या तरी बहुधा वेदनेच्या मागे असंतुलित किंवा प्रकुपित वातदोष हेच मुख्य कारण असते.
वातदोषाचे गुण पाहिले तर त्यात पहिला आणि महत्त्वाचा असतो कोरडेपणा वा रुक्षता. त्यामुळे शरीरात रुक्षता वाढणे म्हणजे शरीरातील वात वाढणे. याखेरीज थंड गुणानेही वात वाढतो. खरखरीतपणा हे सुद्धा वाताचे एक लक्षण असते. कायम फक्त निःसत्त्व अन्न खाण्यानेही वात वाढू शकतो. म्हणून आयुर्वेदात सांधेदुखीची किंवा गुडघेदुखीची चिकित्सा करताना फक्त दुःख कमी करणे, वेदनाशामक गोळ्या घेणे असे केले जात नाही तर वेदना आहेत म्हणजे वातदोष बिघडला आहे हे लक्षात घेऊन व त्याच्याही पुढे जाऊन तो कोणत्या गुणाने बिघडला आहे हे बघायचे असते, आणि त्यानुसार उपचारांचे स्वरूप ठरवायचे असते. उदा. शीततेमुळे वात वाढलेला असला तर त्यावर उष्ण उपायाचा म्हणजे शेक करण्याचा उपयोग होतो. निःसत्त्व अन्नामुळे वात वाढला असला तर त्यावर पोषक अन्न-औषधांची योजना करावी लागते.
रुक्षतेमुळे वात वाढला असला तर त्यावर स्निग्ध उपचार करावे लागतात. झीज झाल्यामुळे वाढणाऱ्या वातावर आणि अपचनातून तयार झालेल्या आमरूपी विषद्रव्यामुळे गतीमध्ये अडथळा आल्याने बिघडलेल्या वातावर वेगळी चिकित्सा करायची असते. आयुर्वेदातील हा नेमका आणि सूक्ष्म विचारच यशाला कारण ठरणारा असतो. सध्या आढळणाऱ्या सांधेदुखीमागे बहुतेक वेळेला ‘झीज’ होणे आणि सांध्यांमधील वंगण कमी होणे हे मुख्य कारण असते आणि यावरचा सर्वोत्तम उपाय म्हणजे सांध्यांना तेल लावणे. कारण तेल हे वातावरचे श्रेष्ठ औषध सांगितलेले आहे. झीज झाल्यामुळे, वयोमानाप्रमाणे किंवा शरीरातील कोरडेपणा वाढल्यामुळे दुखणाऱ्या सांध्यांवर पुरेशा प्रमाणात तूप सेवन करणे आणि बाहेरून संस्कारित तेल लावणे यांचा अप्रतिम उपयोग होताना दिसतो. संस्कारित तेल म्हणजे काय, तर आयुर्वेदात सांगितल्याप्रमाणे विशिष्ट औषधी वनस्पती आणि इतर द्रव्यांसह अग्निसंस्कार करून तयार केलेले औषधी तेल.
श्रीगुरु डॉ. बालाजी तांबे यांनी अगदी पहिल्यापासून स्वतःची औषधे स्वतःच तयार करण्याचा नेम ठेवला आणि त्यात सिद्ध तेलांना प्रथम प्राधान्य दिले. तेले बनविताना त्यातील घटकद्रव्ये उत्तम प्रतीची असण्याकडे लक्ष दिलेले असते.
त्यातील काही द्रव्यांचा काढा, काही द्रव्ये रात्रभर भिजत घालून वाटून केलेला लगदा किंवा चटणी, याशिवाय काही ताज्या वनस्पतींचा रस, पाठानुसार कधी दूध, कधी दह्याचे पाणी, कधी गोमूत्र कधी तांदळाचे धुवण अशा वेगवेगळ्या गोष्टी टाकून, त्यावर अग्निसंस्कार करून तेल संस्कारित केले जाते. श्रीगुरू डॉ. बालाजी तांबे नेहमी म्हणतात की स्वयंपाकघर आणि आयुर्वेदाची फार्मसी यांत तत्त्वतः काही फरक नसतो. एखादी पाककृती बनविताना जी काळजी घ्यावी लागते, जे प्रमाण सांभाळावे लागते किंवा जो क्रम अनुसरावा लागतो, त्याप्रमाणे आयुर्वेदिक औषध बनवितानाही सरसकट सगळी द्रव्ये एकत्र केली व एखादी उकळी दिली की तयार होत नाहीत. कठीण द्रव्ये सुरुवातीपासून, मृदू द्रव्ये काही वेळाने, सुगंधी द्रव्ये अगदी शेवटी, प्रक्षेप त्याच्याही नंतर असे सगळे काळजीपूर्वक केले तर ते औषध खऱ्या अर्थाने ‘सिद्ध’ होत असते. एखादी गृहिणी भाजी करताना मोहरी सर्वप्रथम टाकते पण कोथिंबीर अगदी वाढण्यापूर्वी टाकते तसेच औषध बनविताना केले तर ते औषध संस्कारसंपन्न बनते.
सांधेदुखीवर अप्रतिम काम करणारे संतुलनचे तेल म्हणजे शांती सिद्ध तेल. या तेलाची विशेषता अशी की ते फक्त वेदना कमी करत नाही तर वेदनेला कारण असणाऱ्या वातदोषाला कमी करते, ज्या गुणाने वातदोष वाढला त्या गुणाला समत्वामध्ये आणते. दुखणाऱ्या सांध्यावर गोलाकार दिशेत व हलक्या हाताने हे तेल दिवसातून एकदा किंवा गरजेनुसार २-३ वेळा लावता येते. झोपण्यापूर्वी किंवा मधल्या वेळेत कधीही बसल्या बसल्या जिरवून लावणे सर्वांत चांगले असते. अग्निसंस्कारामुळे सूक्ष्म झालेले हे तेल अक्षरशः २-३ मिनिटांत आतपर्यंत जिरते असाही अनुभव येतो.
हिवाळ्यात तसेच पावसाळ्यात जेव्हा वातावरणात गारवा असेल तेव्हा तेल कोमट करून घेण्याने बरे वाटते. अगोदर तेल लावून वरून शेक करता येतो. त्यासाठी एरंड, निर्गुडी, शेवगा, सागरगोटा यापैकी मिळतील त्या वनस्पतींची पाने वाफवून घेता येतात. रुईची पाने असतील तर तव्यावर गरम करून शेक करता येतो. बरोबरीने दशमूळ काढा, दशमूळारिष्ट, योगराज गुग्गुळ, अमृता गुग्गुळ, संतुलन वातबल गोळ्या, संदेश आसव, तूप-साखरेसह गोक्षुरादी चूर्ण किंवा संतुलन प्रशांत चूर्ण, लाक्षादी घृत, पंचतिक्त घृत यासारखी औषधे घेण्याचाही उपयोग होतो. वातशामक द्रव्यांनी सिद्ध तेलाच्या किंवा तुपाच्या बस्ती घेण्याचा, त्याआधी शास्त्रोक्त पंचकर्म करण्याचाही अप्रतिम उपयोग होताना दिसतो.
आत्मसंतुलन व्हिलेजपासून कार्ल्याच्या एकवीरा देवीचे क्षेत्र खूप जवळ पण डोंगरावर आहे. सांधेदुखी, गुडघेदुखीसाठी पंचकर्मासाठी आलेली अनेक मंडळी घरी जाण्यापूर्वी एकवीरा देवीचे दर्शन घेऊन जातात. यावरून त्यांना किती बरे वाटत असेल हे समजू शकते. गुडघेदुखी, सांधेदुखीसमोर गुडघे टेकायचे नसतील तर आयुर्वेदाच्या उपचारांची मदत घेणे हा उत्तम पर्याय आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.