Vasundhara Din Sakal
फॅमिली डॉक्टर

प्रार्थना पृथ्वीमातेची!

सध्या सगळीकडे प्रदुषणाच्या गंभीरतेची चर्चा होत असते. मनुष्याने निसर्गावर अतिक्रमण करण्याच्या नादात, फक्त स्वतःच्या क्षणिक सुखाच्या आहारी जाऊन जवळजवळ सर्व नैसर्गिक संसाधनांना दूषित केलेले दिसते.

सकाळ वृत्तसेवा

सध्या सगळीकडे प्रदुषणाच्या गंभीरतेची चर्चा होत असते. मनुष्याने निसर्गावर अतिक्रमण करण्याच्या नादात, फक्त स्वतःच्या क्षणिक सुखाच्या आहारी जाऊन जवळजवळ सर्व नैसर्गिक संसाधनांना दूषित केलेले दिसते.

- डॉ. भाग्यश्री झोपे

२२ एप्रिल हा दिवस जगभरात ‘वसुंधरा दिन’ म्हणून पाळला जातो. पण आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये मात्र रोज दिवसाची सुरुवात पृथ्वीमातेला नमस्कार करून आणि दिवसभराचे काम करण्यासाठी तुझ्यावर पाय ठेवण्यास पर्याय नसल्याने ‘हे देवी, मला क्षमा कर’ ही प्रार्थना करूनच होते. भारतीय ऋषीमुनींच्या दूरदृष्टीचा प्रत्यय यावरून आल्याशिवाय राहत नाही. मात्र संस्कृतीचा एक भाग म्हणून रोज सकाळी फक्त ही प्रार्थना करणे पुरेसे ठरणार नाही, तर हा भाव आपल्या प्रत्येक कृतीमध्ये, प्रत्येक विचारामध्ये साकार व्हायला हवा. सर्व भारतीय शास्त्रे एकमेकांना पूरक असतात. श्रीगुरु डॉ. बालाजी तांबे म्हणतात त्याप्रमाणे योगशास्त्र हे आत्म्याला परमात्म्याशी जोडते, मनाला शांत करते, श्रीमद्‌भगवद्‌गीता कर्माचे कुशलत्व, कर्तव्याची जाणीव करून देते तर आयुर्वेद मनुष्य व निसर्ग यांच्यात संतुलन साधून आरोग्य मिळविण्यास मदत करतो.

सध्या सगळीकडे प्रदुषणाच्या गंभीरतेची चर्चा होत असते. मनुष्याने निसर्गावर अतिक्रमण करण्याच्या नादात, फक्त स्वतःच्या क्षणिक सुखाच्या आहारी जाऊन जवळजवळ सर्व नैसर्गिक संसाधनांना दूषित केलेले दिसते. यात भूमी, जल, हवा या गोष्टी तर आहेतच, पण ध्वनिप्रदूषण आणि त्यापेक्षाही विचारांचे प्रदूषण खूपच भयावह आहे. ज्याप्रमाणे दिसणाऱ्या शत्रूपासून सावध राहणे किंवा त्यावर मात करणे हे सोपे असते पण मागून घाव घालणाऱ्या किंवा डोळ्यांनी न दिसणाऱ्या शत्रूशी मुकाबला करणे अशक्यप्राय ठरू शकते, त्याचप्रमाणे भौतिक स्वरूप नसले तरी एकदा उत्पन्न झालेला ध्वनी आसमंतात कुठे ना कुठे कायम शिल्लक राहतो. दुष्ट विचारांची झळ वातावरणात कायम राहते. श्रीगुरुजी म्हणतात त्याप्रमाणे ग्लोबल वॉर्मिंगच्या मागे मनुष्यमात्राच्या मनातील राग, द्वेष हे सुद्धा कारणीभूत असतात. पृथ्वीला वाचविण्यासाठी योजल्या जाणाऱ्या प्रयत्नांत या गोष्टींवरही लक्ष द्यायला हवे. यासाठी जीवनात योग, संगीत, ध्यान, आयुर्वेदिक जीवनशैली या सर्वांचा अवलंब करणे आवश्यक होय.

आयुर्वेद हे निसर्गावर आधारित असणारे अनुभवसिद्ध शास्त्र होय. दैनंदिन जीवन जगताना म्हणजे सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत वापराव्या लागणाऱ्या सर्व गोष्टी, मग त्या वैयक्तिक वापरासाठी असोत किंवा घरा-परिसराच्या शुद्धतेसाठी असोत, आयुर्वेदाच्या मार्गदर्शनाप्रमाणे वापरल्या तर ते आपल्या आरोग्यासाठी तर चांगले असतेच, पण पृथ्वीच्या आरोग्यासाठीही चांगले असते. उदा. सकाळी उठल्यावर सर्वप्रथम ‘पादस्पर्शं क्षमस्व मे’ असे म्हणून सरळ बेसीनवर जाऊन पाण्याला व जमिनीला हानिकारक द्रव्यांनी भरपूर असणारी टूथपेस्ट वापरणे, रासायनिक द्रव्यांपासून बनविलेला साबण वा शांपू वापरून स्नान करणे या परस्परविरोधी क्रिया नव्हेत का? टूथपेस्टमध्ये असणाऱ्या रासायनिक द्रव्यांची एका क्लिकसरशी उघडणारी यादी बघितली तर लक्षात येईल की यामुळे उपयोगापेक्षा अपाय होण्याचाच संभव जास्ती आहे, त्याऐवजी आयुर्वेदानुसार दात व हिरड्यांची काळजी घेतल्यास दात निरोगी राहतील, सुंदरही राहतील आणि दंतवैद्यांकडे जाण्याचा त्रासही वाचेल.

पूर्वीच्या काळी बकुळ, वड, बाभूळ वगैरे वृक्षांची करंगळीइतक्या जाडीची फांदी दाताने चावून चावून तयार केलेल्या दंतधावनाने दात स्वच्छ केले जात असत. आधुनिक काळात हे जवळपास अशक्य असले तरी संतुलन योगदंती या चूर्णाच्या व बांबूपासून बनविलेल्या ब्रशच्या मदतीने दात हिरड्या स्वच्छ करता येतात. याने संपूर्ण मुख, दात, हिरड्या स्वच्छ होतातच, शिवाय घशातील मलरूपी कफ सुटा होऊन निघून जातो असा अनुभव आहे. काही आधुनिक प्रयोगात टूथपेस्टमधील एका घटकामुळे मेंदूतील पिनिअल ग्रंथीमध्ये कॅल्सिफिकेशन होऊ शकते असेही आढळून आलेले आहे. यावर अधिक संशोधनाची गरज असली तरी आयुर्वेदाने दिलेल्या संपूर्ण सुरक्षित पर्यायाचा अंगीकार का करू नये? बरोबरीने इरिमेदादी तेल किंवा संतुलन सुमुख तेल व पाण्याचे मिश्रण तोंडात चूळ भरल्याप्रमाणे धरून ठेवणे आणि खुळखुळवणे हे सुद्धा मुखाच्या आरोग्यासाठी उत्तम असते.

साबण किंवा शांपू बनविण्यासाठी सुद्धा सोडियम हायड्रॉक्साइड हे रासायनिक द्रव्य वापरले जाते ते हवेसाठी हानिकारक असते. तयार साबणात हे द्रव्य शिल्लक राहत नाही असा दावा केला जात असला तरी ज्यांना त्वचारोग आहे किंवा ज्यांची त्वचा अतिशय संवेदनशील आहे त्यांना ज्याअर्थी साबणाचा त्रास होतो त्याअर्थी त्याचा काहीतरी प्रभाव साबणात राहातच असणार. त्याऐवजी सुगंधित द्रव्यांपासून तयार केलेल्या उटण्याने स्नान केले तर त्वचा शुद्ध तर होतेच, पण सुरक्षितही राहते. बरोबरीने नैसर्गिक सुगंधामुळे चित्तवृत्ती उल्हसित होतात, उत्साह वाढतो. सॅन मसाज पावडरसारखे उटणे छान चोळून लावले तर कांती उजळते, त्वचेखाली साठलेल्या चरबीचे लेखन होण्यासही मदत मिळते.

शांपूला पर्याय म्हणून शिकेकाई, रिठा, आवळा, कापूरकाचरी वगैरे वनस्पतींचे मिश्रण किंवा तयार संतुलन सुकेशा मिश्रण वापरणे उत्तम असते. कपडे धुण्यासाठी, घराची फरशी पुसण्यासाठी, शौचालयाच्या स्वच्छतेसाठी सुद्धा आजकाल नैसर्गिक द्रव्यांपासून बनविलेली उत्पादने मिळतात त्यांचा वापर करता येतो. पूर्वीच्या काळी भांडी घासण्यासाठी राख व नारळाच्या शेंडीचा वापर केला जात असे. आज पुन्हा एकदा नारळाच्या शेंडीपासून बनविलेले स्क्रबर बाजारात उपलब्ध होताना दिसू लागले आहेत. यावरून भारतीय पारंपरिक जीवनपद्धतीतील शाश्र्वतता लक्षात येते. ज्यांची शेती आहे त्यांनी सेंद्रिय पद्धतीनेच शेती करणे, ग्राहकांनी सुद्धा सेंद्रिय अन्नाला, फळांना प्राधान्य देणे हे आवश्यक. यामुळे आपले तसेच पृथ्वीचे आरोग्य चांगले राहण्यास नक्कीच मदत मिळेल. औषधांच्या बाबतीतही सुरुवातीपासून शुद्घ आयुर्वेदाची औषधे घेतली, पंचकर्माच्या मदतीने शरीरशुद्धी करून घेऊन आरोग्य उत्तम ठेवले, च्यवनप्राश, धात्री रसायनसारखी रसायने नियमित घेतली तर कृत्रिम, केमिकल द्रव्यांपासून बनविलेल्या औषधोपचारांची गरजच पडू नये. स्त्रियांनी सुद्धा संततीनियमनासाठी असो किंवा स्त्रीविशिष्ट तक्रारींसाठी असो, कृत्रिम हॉर्मोन्सचा उपयोग कमीत कमी किंवा अजिबात केला नाही तर त्यांचेही आरोग्य सुरक्षित राहील.

हवेतील प्रदूषण टाळणे जेवढे आवश्यक तेवढेच असलेले प्रदूषण दूर करणेही गरजेचे होय. कृत्रिम मेणापासून बनविलेल्या मेणबत्त्यांऐवजी मधमाश्यांच्या खऱ्या मेणापासून बनविलेल्या मेणबत्त्या वापरणे; त्याहीपेक्षा उत्तम म्हणजे तेला-तुपाची समई किंवा निरांजन लावणे; प्लॅस्टिक, रबरसारखी द्रव्ये जळणार नाहीत याकडे लक्ष देणे; खरे तर प्लॅस्टिकचा वापर शक्य तितका टाळण्यासाठी कटिबद्ध राहणे; छोट्या अंतरावर जाण्यासाठी वाहनाऐवजी सायकलचा वापर करणे; पेट्रोल-डिझेलपेक्षा विजेवर चालणाऱ्या वाहनांना प्राधान्य देण; घराजवळ, आजूबाजूच्या परिसरात जास्तीत जास्त देशी आणि त्या प्रदेशात अंगभूत (नेटिव्ह) असणाऱ्या वनस्पतींची लागवड करणे हे उपाय करता येण्याजोगे होत. याच्या बरोबरीने आपल्या भारतीय संस्कृतीत पूर्वीच्या काळापासून रोज सकाळ-संध्याकाळ घरात, मंदिरात, गुरुद्वारात वगैरे धूप केला जात असे. त्याचा खरा उद्देश हवा शुद्ध व्हावी, हवेतील सूक्ष्म जीवजंतू, विषद्रव्ये नष्ट व्हावीत असाच होता. यालाच आयुर्वेदिक तत्त्वांची जोड देऊन निंब, मोहरी, वचा वगैरे वनस्पती मिसळून तयार केलेला संतुलन प्युरिफायर धूप जाळणे, रोज घरात १०० टक्के नैसर्गिक घटकांपासून तयार केलेली उदबत्ती लावणे, तुपाचे निरांजन लावणे, अग्निहोत्र-यज्ञ करणे हेही हवा शुद्ध करण्यासाठी सिद्ध असे उपाय आहेत यांचाही जीवनात अवलंब करणे श्रेयस्कर.

ध्वनिप्रदूषणावर उपाय योजणे तितकेसे सोपे नसले तरी गोंगाट, छातीत धडधड वाढवणारे कर्णकर्कश संगीत यापासून शक्य तितके दूर राहणे चांगले, पण ध्वनिप्रदूषणामुळे मेंदूपर्यंत जी अनावश्यक स्पंदने सतत पोचतात त्यामुळे मेंदू चक्रावून जातो, गोंधळून जातो. हा गोंधळ दूर करून मेंदूचे पुन्हा व्यवस्थापन करण्यासाठी स्वास्थसंगीत ऐकणे, ॐकार गूंजन, योगनिद्रा, विशिष्ट मंत्र, शुद्ध उच्चारात व सुरात म्हटलेली स्तोत्रे म्हणणे किंवा लक्षपूर्वक ऐकणे हे सुद्धा महत्त्वाचे होय. तेव्हा अशा प्रकारे भारतीय शास्त्रांचा जीवनात खऱ्या अर्थाने समावेश केला तर आपलेही आरोग्य उत्तम राहील आणि ‘सुजलाम् सुफलाम्’ अशी पृथ्वीमाता आपले सर्वतोपरी रक्षण करेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT