Dr Girish Oak Sakal
फॅमिली डॉक्टर

आयुर्वेद.. जीवनशैलीचे वरदान !

जीवनशैलीतील बदलाने जेवणाच्या, झोपेच्या वेळा बदलल्या आहेत. मधुमेहापासून असंख्य रोग हे आपल्या अनिश्चित जीवनशैलीमुळेच होत आहेत.

सकाळ वृत्तसेवा

जीवनशैलीतील बदलाने जेवणाच्या, झोपेच्या वेळा बदलल्या आहेत. मधुमेहापासून असंख्य रोग हे आपल्या अनिश्चित जीवनशैलीमुळेच होत आहेत. असे रोग किंवा त्रास झाल्यावर आपण शरीरावर विविध औषधांचा मारा करतो. परंतु औषधांपेक्षा खरंतर जीवनशैलीत योग्य ते बदल घडवून हे रोग आपल्या शरीरातून हद्दपार करण्याकडे आपण लक्ष दिले पाहिजे.

चित्रपट, मालिका आणि नाटकांच्या माध्यमातून मला आपल्याशी कायम संवाद साधण्याची, संपर्कात राहण्याची संधी मिळते. पण आज मी आपल्यासोबत अभिनेता म्हणून नाही तर आयुर्वेदाचा एक विद्यार्थी आणि आचरणकर्ता या भूमिकेतून संवाद साधणार आहे. मला समजलेल्या आणि मी आवर्जून पाळत असणाऱ्या काही गोष्टी आपल्यासमोर मांडणार आहे. नागपूर मध्ये ‘बीएएमएस’ केल्यानंतर मी अभिनय क्षेत्राकडे वळलो. कलाक्षेत्रात गेल्याने आयुर्वेदाची प्रॅक्टिस सुटली, पण तरी माझ्या वय्यक्तीक आयुष्यात मात्र मी आयुर्वेद त्यासोबतच योग, प्राणायाम यांचा वापर आणि शक्य तिथे पुरस्कार करत आलोय. आयुर्वेदाच्या पुण्याईनेच आज वयाच्या साठीतही दिवसाचे १४ ते १५ तास अतिशय उत्साहाने आणि आनंदाने काम करू शकतोय असं म्हणायला हरकत नाही.

आयुर्वेदातील दिनचर्या, ऋतुचर्या, स्वस्थवृत्त आणि अपुनरुद्भवचिकित्सा या बाबी मला दैनंदिन आयुष्यात फार महत्वाच्या वाटतात ! दिनचर्या ऋतुचर्येच्या अनुशंघाने आपण आहार आणि विहाराकडे विशेष लक्ष देणे आवश्यक असते. ऋतूनुसार आपल्या शरीरात काय दोष उद्भवू शकतात याचा विचार करूनच आयुर्वेदात ऋतुचक्र तयार केले गेले आहे. या ऋतुचर्येत तुम्ही कुठल्या ऋतूत कुठले कपडे परिधान करावे, काय खावं, किती खावं या सर्वच बाबी समाविष्ठ आहेत. याच गोष्टी आपल्या सणांमध्येही परावृत्त होतात. उदा. मकरसंक्रांतीमध्ये शरीरासाठी उष्ण असणारे तीळगूळ खाणे इ. सध्याच्या काळातील सर्वात महत्वाची समस्या हीच आहे की आपल्या कामाच्या व्यापामुळे आपली जीवनशैली बिघडली आहे. आहार विहारात बदल झाला की त्याचे दुष्परिणाम आपल्या शरीरावर होतात. आयुर्वेदात ‘वेगान्नधारयेत’ हे एक सूत्र आहे. यातील वेग हे वाताशी संबंधित आहेत. वायूमुळे उत्पन्न होणाऱ्या ढेकर, शिंक, जांभई, उचकी इ. गोष्टी या वेगात गणल्या जातात. हे वेग आपण दाबले तर त्याचाही आपल्या शरीरावर डोके दुखणे, अन्नावरची वासना कमी होते अशा पद्धतीचा दुष्परिणाम होतो. पण आत्ताच्या काळात या गोष्टी उघडपणे करणे हे शिष्टाचार संमत लक्षण नाही तरीही शक्य तिथे यागोष्टी करणे, त्या दाबून न ठेवणे आवश्यक आहे. काळानुसार आपला विहारही बदलत चाललाय. आपल्याला ऑफिसमध्ये अगदी कडक सुटाबुटात, वातानुकूलित वातावरणात राहावं लागतं.

कपड्यांपासून प्रत्येक गोष्टीमुळे आपले शरीर आकसले जात आहे. याचेही परिणाम शरीरावर निश्चित होतात. जीवनशैलीतील बदलाने जेवणाच्या, झोपेच्या वेळा बदलल्या आहेत. मधुमेहापासून असंख्य रोग हे आपल्या अनिश्चित जीवनशैलीमुळेच होत आहेत. असे रोग किंवा त्रास झाल्यावर आपण शरीरावर विविध औषधांचा मारा करतो. परंतु औषधांपेक्षा खरंतर जीवनशैलीत योग्य ते बदल घडवून हे रोग आपल्या शरीरातून हद्दपार करण्याकडे आपण लक्ष दिले पाहिजे. काळाच्या प्रवाहात प्रत्येक गोष्ट पाळणे शक्य नाही तरी त्यातल्या त्यात मध्यमार्ग काढून शक्य तितके पाळून आपल्या आरोग्याची काळजी घेतली पाहिजे.

आयुर्वेदातली अजून एक महत्वाची संकल्पना म्हणजे ‘अर्धभुक्त’ ! म्हणजेच एकदा जेवल्यानंतरही आपण पुन्हा एकदा जेवू शकू एवढी जागा पोटात असणे ! आपण इतके पोट भरून जेवतो की त्या अन्नात पाचकरस आणि बाकी द्रव्ये मिसळण्यासाठी पोटात जागाच ठेवत नाही. हे देखील कटाक्षाने टाळले पाहिजे. त्यासोबतच रोज एक सारखा घरगुती आहार घेणे गरजेचे आहे. आहारात रोज बदल करणे देखील चांगले नाही. आयुर्वेदात ‘सम्यकयोगा’ नुसार प्रत्येक गोष्ट पाळली तर शरीराच्या बहुतांश समस्या दूर होतील. सम्यकयोग म्हणजेच एखादी गोष्ट शरीराच्या गरजेनुसार संतुलित पद्धतीने योग्य प्रमाणात करणे. आहार, व्यायाम, झोप हे सर्वच सम्यकयोगानुसार झाले तर शरीरासाठी ते फायदेशीर ठरतात. व्यायाम अगदी जिम मध्ये जाऊनच केला पाहिजे असे नाही.

आपण घरच्या घरी किमान सूर्यनमस्कार आणि प्राणायाम जरी केले तरी पुरेसे आहे. मी कॉलेज जीवनापासून आजतागायत दररोज न चुकता घरी व्यायाम, प्राणायाम करतो. रक्तामार्फत अन्नरस शरीरात पोहोचतो तसाच ऑक्सिजन देखील पोहोचतो. तो शरीराच्या सर्व भागात व्यवस्थित पोहोचला नाही तर समस्या सुरु होतात. प्राणायामात अनुलोमविलोम आणि कपालभाती हे दोन प्रकार आपण लक्ष पूर्वक केले तर त्याचा श्वसनसंस्थेवर सकारात्मक परिणाम होतो. हे एक प्रकारचं शरीराचं शुद्धीकरणच आहे. यात शरीरातील कार्बनडायऑकसाईड पूर्णपणे बाहेर पडतो.

कोरोना आल्यानंतर आता इम्युनिटीसाठी आवळ्याचे महत्व अनेकांना पटले आहे, पण आयुर्वेदात प्रतिकारशक्ती आणि सी विटमिनसाठी आवळाच महत्वाचा मानला गेला आहे. या आवळ्याचे आणि त्यापासून बनलेल्या च्यवनप्राशचे सेवनही अतिशय आवश्यक आहे. मी माझ्या आयुष्यात आहार ,व्यायाम, प्राणायाम या गोष्टी सम्यकपणे पाळत आलोय. शारीरिक स्वास्थ्यासोबत मानसिक स्वास्थ्याकडेही विशेष लक्ष दिले आहे. मला कायम एका गोष्टीची खंत वाटते.

आपल्याला आवडलेल्या गोष्टीला ‘अरे वाह’ म्हणायला आपण विसरत चाललो आहोत. मोकळेपणाने दाद द्यायला कचरतो आहोत. जीवनातला खरा आनंद यातच लपला आहे. आपण कोणाशीही स्पर्धा न करता चांगल्या गोष्टीचे स्वागत करत मनातून आनंदी राहायला शिकलो तर मानसिक आरोग्य अतिशय उत्तम राहील. मी पाळत असणाऱ्या गोष्टी आपल्या पर्यंत पोहोचवण्याचा हा एक छोटासा प्रयत्न. आपण सर्वांनीच जर आयुर्वेदाने सांगितलेल्या शक्य तितक्या गोष्टी पाळल्या तर आपले जीवन निश्चितच निरोगी, आनंदी आणि समाधानी होईल यात शंका नाही.

- डॉ. गिरीष ओक (BAMS) अभिनेते, दिग्दर्शक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vadgaon Sheri Assembly Election 2024 Result Live: वडगाव शेरी मतदारसंघात तुतारी वाजली; बापू पठारेंचा 5000 मतांनी विजयी

Devendra Fadnavis : फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, एक है तो 'सेफ' है!

Karad South Assembly Election 2024 Results : कऱ्हाड दक्षिणेत काँग्रेसच्या सत्तेला सुरुंग! पृथ्वीराज चव्हाणांचा पराभव करत अतुल भोसलेंचा मोठा विजय

Madha Assembly Election 2024 Result Live: माढ्यात तुतारीची गर्जना, अभिजित पाटील यांचा दणदणीत विजय

Parag Shah Won in Ghatkopar East Assembly Election: घाटकोपर पूर्व मतदार संघावर भाजपचा झेंडा कायम; पराग शाहांचा मोठ्या फरकाने विजय

SCROLL FOR NEXT