आयुर्वेदात सांगितलेले आहे की आजारानंतर किंवा वाढत्या वयानुसार शरीरात वात वाढतो आणि वात वाढला की कोरडेपणा येणे साहाजिक असते.
- डॉ. मालविका तांबे
कुठलीही वस्तू जास्त वेळ टिकवून ठेवायची असेल तर तिच्यात ओलावा, स्निग्धता व लवचिकता आवश्यक असते. वाळलेली काडी हिरव्या काडीपेक्षा पटकन मोडते हा आपला सगळ्यांचा अनुभव आहे. घरी लोणचे टिकवायचे असले तर त्याच्या फोडी तेलात बुडवाव्या लागतात. कणीक मळून जास्त वेळ ठेवायची असली तर तिच्यावर तेलाचा हात फिरवावा लागतो. वय वाढल्यामुळे त्वचेवर येणाऱ्या सुरकुत्या कमी करायला क्रीम्स लावली जातात. वयानुसार सांध्यांमधील वंगण कमी व्हायला लागले की डॉक्टर सांध्यावर तेल लावायला सांगतात. थोडक्यात काय, तर स्निग्धता आपल्याला डीजनरेशनपासून लांब ठेवते. वय वाढल्यावर किंवा शरीराला आजार झाल्यावर शरीरात कोरडेपणा वाढत जातो.
आयुर्वेदात सांगितलेले आहे की आजारानंतर किंवा वाढत्या वयानुसार शरीरात वात वाढतो आणि वात वाढला की कोरडेपणा येणे साहाजिक असते. त्यामुळे आयुर्वेदिक उपचार किंवा आयुर्वेदिक औषधे पाहिली की त्यांच्यात कुठल्या ना कुठल्या प्रकारे स्नेहद्वारा औषधे आत देण्याचा समावेश असलेला दिसतो. तेल खायचे म्हटले तर त्याच्या चवीमुळे, गिळगिळितपणामुळे कदाचित ते प्रत्येकाला शक्य होणार नाही. तसेच ते पचून इच्छित स्थानी जाऊन कार्य करण्यात कितपत यश येईल हेही माहीत नाही. त्यामुळे आयुर्वेदाने शरीराला असलेल्या इतर द्वारांचा वापर करायचे ठरविले. त्याच्यामध्ये सगळ्यांत महत्त्वाची असते ते म्हणजे त्वचा. त्वचेवर करोडो रोम असतात ज्यातून आपल्याला औषधे आत पोचविणे शक्य होऊ शकते.
नाक, कान, गुद, योनी इत्यादी शरीराच्या इतर द्वारांचा वापर स्नेहाद्वारे औषधांची शरीराला पूर्ती करण्यासाठी केलेला दिसतो. पण तेल कुठले वापरावे, ते कसे बनविलेले असले पाहिजे, त्यात कुठली औषधी द्रव्ये वापरलेली असावीत या सगळ्यांचा विचारही करावा लागतो. तसेच तेल कुठल्या आजाराकरता व कोणत्या व्यक्तीसाठी वापरायचे आहे याचाही विचार करणे आवश्यक असते. त्वचेवर लावायचे तेल त्वचेद्वारा शोषले जाणे (absorb) सोपे नसते. म्हणून तेलाचे परमाणू सूक्ष्म करून आपल्याला त्वचेमार्फत, आतल्या म्यूकस मेंब्रेनमार्फत पोचवणे गरजेचे असते. यासाठी त्यावर एक वेगळ्या प्रकारचा संस्कार करावा लागतो, जेणेकरून तेलाचे परमाणू सूक्ष्म होऊ शकतील. ज्या औषधांचा संस्कार आपल्याला तेलावर करायचा असले त्या औषधांच्या गुणांचा सुद्धा आपल्याला विचार करावा लागतो.
औषधी तेल बनविण्याची प्रक्रिया खूप विचारपूर्वक करावी लागते. कुठलीही पाककृती करत असताना कुठली गोष्ट कुठल्या वेळी टाकावी, हे ठरविणे आवश्यक असते. जसे की चहा करत असताना आल्याचा कीस चुकीच्या वेळेला घातला तर दूध फाटते. अशा प्रकारे तेल बनविण्याची प्रक्रिया काळजी घेऊन ठरवावी लागते. तेल बनविताना त्याला आवश्यक असणाऱ्या कोरड्या वनस्पतींचा काढा केला जातो. ओल्या वनस्पती कुटून त्यांचा कल्क केला जातो. पाठाप्रमाणे व गरजेप्रमाणे काही वनस्पतींचा रस, कधी तरी तांदळाचे धुवण, कधी गोमूत्र कधी दूध, कधी दह्याचे पाणी अशा गोष्टी क्रमाक्रमाने तेलात घालून ते तेल अग्नीवर उकळत ठेवले जाते.
साधारणपणे या प्रक्रियेला ४०-५० तासांचा अवधी लागतो. तेल शिजत असताना ते करपायची भीती असते, त्यामुळे तेल सिद्घ करत असताना खूप काळजी घ्यावी लागते. तापमान किती ठेवायचे, किती वेळ उकळले गेले पाहिजे, त्यातील जलांश किती कमी झालेला आहे, अशा सगळ्यांवर लक्ष ठेवावे लागते. जलांश पूर्णपणे उडून गेला नाही तर तेल कच्चे राहते व त्यात पाणी असल्यामुळे असे तेल लवकर खराब होते. तेल टिकावे व शरीरात व्यवस्थित शोषले जावे अशी इच्छा असेल तर जलांश पूर्णपणे उडून गेलेला असणे गरजेचे असते. पाणी उडून गेले आहे की नाही याकरता आपण प्रयोगशाळेत तपासणी करतोच, पण यासाठी आयुर्वेदातही काही युक्ती सांगितलेली आहे. कापसाची वात तेलात भिजवून वात पेटवली जाते, वात पेटताना चुरचुर आवाज आला नाही तर तेल व्यवस्थित तयार झाले आहे अशी समजले जाते.
ही सगळी मेहनत कशासाठी करायची? कुठलेही कच्चे तेल शरीरात व्यवस्थित शोषले जाऊ शकत नाही किंवा वापरले जाऊ शकत नाही. त्यामुळे तेल पक्व केलेले असेल, म्हणजेच शिजवलेले असेल तरच ते आपल्या शरीरात सहजपणे सामावते. तर तेलाचे व्यवस्थित शोषण होऊन ते त्चचेमार्फत स्नायू, हाडे, मज्जाधातूपर्यंत पोचून त्याने कार्य करावे यासाठी ही प्रक्रिया गरजेची असते. तेल बस्तीसारख्या उपचाराकरता तयार केलेले असले तर आपल्या पक्वाशयातील म्यूकस मेंब्रेनद्वारा तेलाचे शोषण होऊन त्याने योग्य जागी जाऊन काम केले पाहिजे याकरता त्यात सूक्ष्मत्व येणे गरजेचे असते. तेल बनविण्याचा प्रक्रिया व्यवस्थितपणे केली गेली नाही, आवश्यक त्या वनस्पती टाकल्या नाहीत, त्यावर जितका वेळ अग्निसंस्कार होणे आवश्यक आहे तेवढा वेळ अग्निसंस्कार केला गेला नाही तर असा तेलापासून अपेक्षित फायदा होणे शक्य नसते.
सध्या बाजारात उपलब्ध असणारी तेले पाहिली तर त्या तेलात कित्येकदा फक्त रंग टाकला जातो, कृत्रिम सुगंध टाकले जातात व काही वनस्पतींचे अर्क टाकले जातात, जेणेकरून या-या वनस्पती या तेलात आहेत असे लेबलवर लिहिता यावे. परंतु तेले बनवत असताना योग्य त्या प्रक्रियेचे पालन केले नाही तर तेलाचे गुण बदलणार नाही व औषधी वनस्पतींचा गुण येणार नाही. दुर्भाग्य असे की तेल कशा प्रकारे बनविलेले आहे सांगू शकेल अशी तूर्त तरी कुठलीही प्रयोगशाळा नाही. संतुलनसारख्या फार्ससीमध्ये तेले बनविताना त्यांच्यावर होणारा अग्निसंस्कार, त्यासाठी आवश्यक असलेली घटकद्रव्ये यांच्यात कुठल्याही प्रकारची कुठल्याही तडजोड केली जात नाही. अशा प्रकारे संस्कारित केलेल्या तेलांचा उपयोग आपण वेगवेगळ्या आजारांमध्ये किंवा त्रासांमध्ये कसा करू शकतो याची माहिती आपण पुढच्या भागात पाहू.
नवीन वर्षामध्ये पदार्पण करताना चांगल्या गोष्टीची सुरुवात करावी असे म्हणतात. तर आरोग्याकरता आयुर्वेदाने दिलेल्या संस्कारित तेलाचे ब्रह्मास्त्र आपण नक्की वापरू असा निश्र्चय आपण सगळे करू या.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.