fight with cholesterol sakal
फॅमिली डॉक्टर

सामना कोलेस्टेरॉलशी

आजच्या आधुनिक जीवनशैलीमुळे बऱ्याच प्रकारचे वेगवेगळे त्रास दिसायला लागलेले आहेत. त्यात एक म्हणजे अनेक व्यक्तींमध्ये कोलेस्टेरॉल वाढलेले दिसते.

सकाळ वृत्तसेवा

- डॉ. मालविका तांबे

आजच्या आधुनिक जीवनशैलीमुळे बऱ्याच प्रकारचे वेगवेगळे त्रास दिसायला लागलेले आहेत. त्यात एक म्हणजे अनेक व्यक्तींमध्ये कोलेस्टेरॉल वाढलेले दिसते. कोलेस्टेरॉल वाढलेले आहे हे रक्ताच्या तपासणीतून समजते. पण कोलेस्टेरॉल वाढल्यास सुरुवातीच्या काळात फारसा त्रास होत नाही, फक्त आता मला मोठा त्रास होऊ शकतो ही भीती मनात घर करून बसते. कारण कोलेस्टेरॉल व हृदयरोग हे समीकरण सगळ्यांच्या मनात ठाम बसलेले असते.

कोलेस्टेरॉल हा खर तर शरीराच्या वेगवेगळ्या चयापचय क्रियांमध्ये लागणारा एक महत्त्वपूर्ण घटक असतो. त्यामुळेच निसर्गाने अशी व्यवस्था केली आहे की यकृतामध्ये कोलेस्टेरॉल तयार होते. बाहेरून खाल्लेले अन्न थोड्या प्रमाणात कोलेस्टेरॉलची आपूर्ती करते.

आयुर्वेदानुसार विचार केला तर कोलेस्टेरॉलचा संबंध मेदधातूशी असू शकतो. मेदधातूच्या पचनक्रियेत कुठल्याही प्रकारचा दोष आढळून आल्यास कोलेस्टेरॉल वाढू शकते. याकरता आयुर्वेदातील ‘आम’ ही संकल्पना समजून घेणे अत्यंत आवश्यक आहे. आयुर्वेदानुसार शरीरात सेवन केलेल्या अन्नाचे पचन जाठराग्नीद्वारे केले जाते. हे पचन झालेले अन्न ‘सार’ व ‘किट्ट (मल)’ अशा दोन भागांमध्ये परिवर्तित होते.

सार भाग पुढे जाऊन वेगवेगळ्या धातूंमध्ये परिवर्तित होतो. जाठराग्नीचे काम व्यवस्थित होत नसले तर अन्न संपूर्णतया पचत नाही व त्यातून आहाररस व पर्यायाने पुढचे धातू व्यवस्थित न बनता आम तयार होतो, ज्याला आपण अर्धवट शिजलेला आहाररस म्हणू शकतो.

हा आम शरीरात अनारोग्याला आमंत्रण देतो. आम दुर्गंधित, पिच्छिल (चिकट) असतो, त्यामुळे आपल्या शरीरातील धातूंमध्ये, स्रोतसांमध्ये अवरोध निर्माण होऊ शकतात, शरीराची ताकद कमी होऊ शकते, शरीराची रोगप्रतिकारशक्ती कमी होऊ शकते व बऱ्याच प्रकारचे आजार होऊ शकतात.

कारणे

  • आम तयार होण्याकरता आयुर्वेदात सगळ्यात महत्त्वाचे कारण सांगतिलेले आहे ते म्हणजे आहारात झालेल्या चुका. अति प्रमाणात गुरु, रुक्ष, शीत, शुष्क, न आवडणारे, विष्कंभी, विदाही, पवित्र नसलेले, स्वच्छ नसलेले, विरुद्ध व अकाली घेतलेले जेवण आमाकरता कारणीभूत ठरते.

  • अति चिंता, सतत कशाची तरी भीती वाटत राहणे, राग-राग करणे, मनाला लागलेल्या एखाद्या गोष्टीचा सतत विचार करणे, कुठलीतरी दुःखद घटना आयुष्यात घडणे, चुकीच्या स्थितीत झोपणे, रात्री जागरण करणे ही कारणे सुद्धा शरीरात आम वाढण्याकरता कारणीभूत ठरतात. सध्या समजात या प्रकारची कारणे मोठ्या प्रमाणावर दिसू लागली आहेत. म्हणूनच की काय कमी वयातच कोलेस्टेरॉलचा त्रास होण्याचे प्रमाण वाढलेले दिसते.

  • कामाच्या व्यस्ततेमुळे आहाराच्या वेळा पाळल्या जात नाहीत. त्याचबरोबरीने रिलॅक्स होण्यासाठी किंवा संध्याकाळी वेळ आहे या कारणामुळे, रात्री जड व बाहेरचे अन्न खाल्ले जाते. तसेच आजकाल शिळे अन्न, गोठविलेले डबाबंद अन्न (फ्रोजन फूड) खाण्याचे प्रमाण वाढलेले आहे. पिझ्झा, बर्गर, चाट, वडा-पाव, सँडविच, चीज वगैरे लोकप्रिय अन्न खाण्याचे प्रमाण सध्याच्या काळात वाढलेले आहे.

  • नवीन पिढी सध्याच्या काळात धूम्रपान, मद्यपान यांचा आहारी जाते आहे.

  • कामाच्या ठिकाणी स्वतःला सिद्ध करण्याचा ताण असल्यामुळे मानसिक ताण अवाजवी प्रमाणात वाढताना दिसत आहे.

  • कुठल्याही रोगावर उपचार म्हणजे तो रोग हेण्याच्या कारणापासून लांब राहणे, पण दुर्भाग्य असे की ही कारणे जाणून घेतल्यावर सुद्धा कारणांपासून लांब राहण्याऐवजी सगळे फॅटस् पासून लांब रहाण्याचा प्रयत्न करतात. घरी जेवत असताना उकडलेल्या भाज्या खाणे, फळे जास्त प्रमाणात घेणे, आहारात तेला-तुपाचा समावेश न ठेवणे याचा सध्या अतिरेक होताना दिसतो. खरे तर साजूक तुपात असलेले कोलेस्टेरॉल आरोग्याकरता उत्तम असते असे आधुनिक शास्त्रही सांगायला लागले आहे. त्यामुळे तुपासारखी चांगली गोष्ट वर्ज्य करणे म्हणजे स्वतःवर दोन्हीकडून नुकसान करून घेण्यासारखे आहे. एकीकडे चुका न थांबवणे आणि दुसरीकडे बाहेरून येणाऱ्या मदतीला थांबवणे हे दोन्हीही आरोग्याच्या दृष्टीने योग्या नाही.

  • घरात तेल-तूप वर्ज्य करून बाहेर सॅलडस् खाल्ली जातात. या सॅलडस्मध्ये वरून टाकलेले तेल ऑलिव्ह ऑइल असावे अशी मनात इच्छा असते, पण हे ऑलिव्ह ऑइल कशा प्रकारचे असेल, त्यावर कुठल्या प्रकारच्या रासायनिक प्रक्रिया केल्या गेल्या असतील हे माहिती नसते.

  • विकतच्या सँडविचमध्ये लोण्याऐवजी वनस्पतीजन्य तेलापासून बनविलेले मार्गारिन लावलेले असू शकते. त्यात वापरलेले चीज प्रोसेस्ड असल्यामुळे त्याचाही शरीरात अपचन व्हायला हातभार लागत असतो.

  • हॉटेलमध्ये तयार केल्या गेलेल्या पाककृतीमध्ये वापरलेले तेल रासायनिक प्रक्रियेतून तर गेलेले असतेच, पण ते तेल परत परत गरम करून पदार्थ तळण्यासाठी वापरले जात असल्यामुळे त्यात ट्रान्स फॅटस्चे प्रमाण वाढलेले असते. एवढेच नाही तर कोलेस्टेरॉल नसलेले किंवा कमी कोलेस्टेरॉल असलेले अशा ठप्पा लावून बाजारात मिळणारे करडई तेल, सूर्यफुलाचे तेल, कॅनोला, कॉर्न तेल यांचा वापर आपल्या शरीरातील लिपिड संतुलनाकरता चुकीचा ठरू शकतो.

उपचार

  • शरीरातील कोलेस्टेरॉल कमी राहावे अशी इच्छा असणाऱ्यांनी बाजारातील अन्नपदार्थ कमीत कमी प्रमाणात खाण्याचा निश्र्चय करणे आवश्यक.

  • आमाचे पचन करण्याकरता आयुर्वेदाने सांगितलेले सगळ्यात सोपा उपाय आहे गरम वा कोमट पाणी पिणे, ज्यामुळे शरीरातील अग्नीचे कार्य व्यवस्थित होते. कुठल्याही प्रकारचा आमाचा वा अपचनाचा त्रास कमी होण्यास मदत होऊ शकते.

  • रोज सात्त्विक व सुपाच्य आहार घेतलेला बरा.

  • ज्यांची कोलेस्टेरॉल व ट्रायग्लिसेराईड वाढण्याची प्रवृत्ती असेल त्यांनी शाकाहार जास्त प्रमाणात घेणे बरे. अंडी, मासे, मटण वगैरेंमुळे शरीरातील कोलेस्टेरॉलचे प्रमाण वाढताना दिसते.

  • आमाचा त्रास व मेदधातूशी संबंधित त्रास कमी होण्यासाठी लंघन हा उपचार महत्त्वाचा असतो असे आयुर्वेदात सांगितलेले आहे. लंघन वेगवेगळ्या प्रकारे करता येते. दोन जेवणांत जास्त अंतर ठेवणे, रात्री सूप, खिचडी वगैरे हलका व सुपाच्य आहार असणे, भूक, तहान लागेल तेव्हाच खाणे-पिणे, पोट पूर्ण भरेपर्यंत अन्नसेवन न करता थोडी भूक असताना जेवण थांबवणे जास्ती बरे.

  • आहारात आले, काळी मिरी, दालचिनी, वेलची वगैरै मसाल्यांचा समावेश असावा.

  • संतुलन अन्नयोगसारख्या गोळ्या सकाळ संध्याकाळी भोजनानंतर घेणे, रात्री झोपताना संतुलन सॅनकूल वा संतुलन अविपत्तिकर चूर्णासारखे चूर्ण घेणे हेही पचनाकरता व अग्नीच्या कार्याकरता मदत करू शकते.

  • रोजच्या दिनचर्येत व्यायामाचा अंतर्भाव नक्की करावा. रोज सकाळी ३०-३५ मिनिटे चालायला जाणे, १० मिनिटे प्राणायाम करणे, जमत असेल त्याप्रमाणे योगासने करणे, सूर्यनमस्कार घालणे, संतुलन भस्त्रिका क्रिया करणे हेही कोलेस्टेरॉलच्या पचनाच्या दृष्टीने उत्तम ठरू शकते.

  • कोलेस्टेरॉल वाढले आहे अशी चाहूल लागल्या लागल्या शास्त्रोक्त पद्धतीने शरीरशुद्धी करवून घेणे चांगले. कार्ला येथील आत्मसंतुलन केंद्रात शास्त्रोक्त पद्धतीने पंचकर्म केल्यानंतर वाढलेले कोलेस्टेरॉल कमी झालेली असंख्य उदाहरणे आहेत. या पंचकर्मादरम्यान आयुर्वेदिक पद्धताने सिद्ध केलेल्या औषधी सिद्ध तुपांचा वापर केल्यामुळे शरीरात असलेले चुकीचे फॅट कमी करता येतात ही महत्त्वाची गोष्ट होय.

  • येथे एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवायला पाहिजे की शरीरात चांगल्या कोलेस्टेरॉलची आपूर्ती होणेही अत्यंत आवश्यक असते. त्यामुळे सध्याच्या प्रचाराला बळी न पडता आयुर्वेदिक पद्धतीने बनविलेले गाईचे वा म्हशीचे तूप आहारात ठेवल्याचा शरीराला व हृदयाला फायदा होतो. अशा प्रकारचे साजूक तूप प्रकृतीनुसार ४-५ चमचे घेण्यास हरकत नसते.

मी स्वतः आयुर्वेदिक तुपावर संशोधन केलेले आहे, रोज साधारण २०-३० ग्रॅम तुपाचा समावेश केल्यास कुठल्याही प्रकृतीला त्रास होत नाही, कोलेस्टेरॉल वाढताना दिसत नाही. फक्त तूप बनविण्याची पद्धत शास्त्रोक्त असणे आवश्यक आहे. ही पद्धत समजून घेण्यासाठी डॉ. मालविका तांबे यूट्यूब चॅनेलला भेट द्यावी. यातून सविस्तर माहिती मिळू शकेल.

लिपिड प्रोफाइलमध्ये कोलेस्टेरॉलचे विविध प्रकार व कोलेस्टेरॉलची काय पातळी आहे हेही पाहावे लागते. नुसतेच कोलेस्टेरॉल वाढणे त्रासदायक असेलच असे नाही. शरीरात कोलेस्टेरॉल वाढले असल्यास घाबरू न जाता किंवा डाएटचा अतिरेक न करता नीट विचार करून स्वतःची दिनचर्या आखली, आहाराची नीट काळजी घेतली व चुकीच्या सवयी कमी केल्या तर खूप फायदा मिळू शकतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT