- डॉ. मालविका तांबे
साध्या सोप्या शब्दात सांगायचे झाले तर विबंध म्हणजे मलावरोध, बद्धकोष्ठ किंवा कॉन्स्टिपेशन. अगदी लहान मुलांपासून ते म्हाताऱ्या व्यक्तींपर्यंत विबंध हा सर्वसाधारणपणे आढळून येणार आजार दिसतो. कधी कधी तर दवाखान्यात येणाऱ्यांना कुठलाही मोठा आजार झालेला नसतो, फक्त पोट साफ होत नसल्यामुळे मन अशांत असते व दिवसभर मरगळल्यासारखे वाटत असते.
‘एकदा पोट साफ झाले की पुढचा दिवस अगदी छान जातो, त्यामुळे डॉक्टर असे औषध द्या जेणेकरून माझे पोट रोज उठल्या उठल्या साफ होऊ शकेल’ असे अनेक जण म्हणतात. साधारणपणे ३०-३५ टक्के लोकांना विबंधाचा त्रास असतो असे आकडेवारी सांगते.
वय वाढते तसे तसे साधारण ७५ टक्के ज्येष्ठ नागरिक कुठल्या ना कुठल्या प्रकारचे रेचक औषध (लॅक्झेटिव्ह) नियमितपणे घेत असतात. पुरुषांपेक्षा स्त्रियांमध्ये विबंधाचे प्रमाण जास्त असते. असे का याची कारण आपण पुढे पाहू या. विबंधांच्या वेगवेगळ्या पातळ्या आपण आधी पाहू.
विबंधाची लक्षणे
1) सकाळी उठल्या उठल्या शौचाला जाण्याची भावना न होणे.
2) रोज शौचाला न होणे.
3) रोज विशिष्ट वेळी शौचाची भावना येणे पण मलत्यागासाठी खूप जोर लावून प्रयत्न करावा लागणे.
4) जोर न लावता रोज विशिष्ट वेळी मलत्याग होणे परंतु पोट साफ झाले आहे अशी भावना येणे.
5) सकाळी पोट साफ झाले आहे असे समाधान वाटणे परंतु दिवसातून ३-४ वेळा शौचाला जावे लागणे.
6) शौचाला दिवसातून एकदाच जावे लागणे, पण त्यासाठी खूप वेळ लागणे.
7) शौचाला कडक किंवा मल फार कोरडा असणे.
8) गुदभागी काहीतरी अडकले आहे असे वाटत राहणे.
9) शौचाला चिकट होणे व त्यामुळे कुंथून मलत्याग करावा लागणे.
10) काही लोकांना पोटात दुखणे, पोटात गुबारा धरण्यासारखे वाटणे, डोके दुखणे, थकवा जाणवणे असेही त्रास विबंधाबरोबर होऊ शकतात.
विबंध हा सकाळी उठल्या उठल्या पोट साफ न होण्यासारखा एक साधा त्रास असू शकतो किंवा ते कुठल्यातरी मोठ्या आजाराचे एक लक्षण असू शकते. पण कधीतरी आतड्यांमध्ये अवरोध उत्पन्न झालेला असणे, खूप जास्त प्रमाणात मूळव्याधीचा त्रास असणे, गुदभ्रंश, हर्निया, कोलायटिस वगैरे मोठ्या आजाराची सूचना असू शकते. कुंथणाऱ्यांना रक्ताभिसरणाचे त्रास असले तर त्यातूनही इतर मोठे आजार होऊ शकतात.
विबंधाची कारणे
मोठ्या आतड्यातील मल पुढे जात असताना त्यात कोरडेपणा येणे हे विबंधाचे मुख्य कारण आहे. हा कोरडेपणा वेगवेगळ्या कारणांमुळे येऊ शकतो.
आहारात द्रवपदार्थ कमी प्रमाणात घेणे हे मुख्य कारण होय. अनेकांना कोरडे अन्न खाण्याची सवय असते किंवा रोज नोकरीवर जाणाऱ्यांना डब्यामध्ये पोळी-भाजी-वरण-भात असे सगळे पदार्थ नेता येत नाहीत. त्यामुळेही सध्या विबंधाचा त्रास वाढत चाललेला आहे. तसेच उपवास फार प्रमाणात करणे हेही विबंधाचे कारण असू शकते. वातूळ पदार्थ, आंबवलेले पदार्थ, गोठविलेले अन्न यांचा आहारात अतिरेक असणे हेही विबंधाला कारण असू शकते.
वेगांचे धारण करणे. सध्याच्या काळात शौचाची भावना झाली की व्यस्त असल्यामुळे शौचाला जाता येईल असे नव्हे, तसेच अनेक लोक गॅसेस या वेगाचेही धारण करताना दिसतात. अशा प्रकारे वेगांचे धारण केले तर अपान वायूमध्ये दोष तयार होतो व पुढे हळू हळू विबंधाचा त्रास सुरू होऊ शकतो. स्त्रियांमध्ये बरीच कार्ये अपानाच्या अधीन असतात. त्यामुळे स्त्रियांमध्ये अपानात दोष निर्माण झाला तर तो लगेच दिसून येतो. त्यामुळे स्त्रियांमध्ये विबंध अधिक प्रमाणात आढळतो.
वाढलेले वय. जसेजसे वय वाढत जाते तसेतसे आतड्यांना कोरडेपणा येतो, तसेच पोट साफ करण्याचे आतड्यांना मिळणारे संदेशही कमी होत जातात. त्यामुळे बऱ्याच वेळा वय वाढल्यावर विबंधाचा त्रास होताना दिसतो.
फार प्रमाणात प्रवास करणे – प्रवास केल्यानेही शरीरात वाताची वृद्धी होऊन विबंध होऊ शकतो.
काही दीर्घ आजारामुळे शरीराची पचनशक्ती कमी होते व शरीरातील रसधातूचे प्रमाण कमी होते. अशा वेळीही मलावरोधाचा त्रास होऊ शकतो.
रासायनिक औषधे - काही रासायनिक औषधांचा दुष्परिणाम म्हणूनही विबंधाचा त्रास होऊ शकतो. हायपोथायरॉइडझम, फिशर, आतड्यांचा कर्करोग वगैरे मोठ्या रोगांची चाहूल म्हणूनही विबंधाचा त्रास होताना दिसतो.
हेही समजून घ्या
मलावरोध झाला की दोन गोष्टींकडे खूप लक्ष ठेवावे लागते. एक म्हणजे मलावरोधाचे मुख्य कारण जाणून घेऊन त्यावर उपचार करणे आवश्यक असतात. अनेक लोक मलावरोध झाला की रेचक औषधे घेतात. रेचक औषधाची सवय झाली की त्यापेक्षा प्रभावी रेचक औषध शोधावे लागते. काही लोक तर नियमितपण एनिमा वगैरे घेताना दिसतात. मूळ कारणाचे निदान न करता अशा प्रकारे रेचक औषधांचा मारा करत राहिले तर आतड्यांमध्ये कोरडेपण वाढत जातो, पर्यायाने मलावरोधाची तक्रारही वाढत जाते.
जुनाट मलावरोध असला तर तो शरीरात अन्य रोगांना कारणीभूत ठरू शकतो. जसे रोजच्या रोज आपल्या घरातील, गल्लीतील कचऱ्याचा निचरा केला नाही तर दुर्गंध येतो, तेथे जंतू वगैरे तयार होतात, तसेच शरीरातील कचरा रोजच्या रोज बाहेर गेला नाही तर शरीरात विषद्रव्ये साठू लागतात व त्यामुळे वेगवेगळ्या प्रकारचे उदररोग, इन्फेक्शन, त्वचारोग उद्भवू शकतात. आयुर्वेदात ग्रहणी व यकृताच्या संबंधित आजारांचा याच्याशी संबंध सांगितलेला आहे.
आयुर्वेदिक उपाय
सर्वप्रथम आहारावर लक्ष देणे अत्यंत गरजेचे असते. आतड्यांमधील कोरडेपणा कमी करण्याच्या हेतूने आहारात आमटी, सूप वगैरे द्रवपदार्थांचे प्रमाण योग्य असावे.
तसेच आहारात घरच्या साजूक तुपाचा, दुधाचा, घरच्या ताज्या लोण्याचा समावेश असावा.
शक्यतो आहार रोज घरी केलेला ताजा, सात्त्विक, फार तिखट नसलेला असावा.
शक्यतो फ्रीजमध्ये ठेवून गार केलेल्या गोष्टी किंवा गोठविलेल्या गोष्टी पूर्णपणे टाळाव्यात.
दिवसभरात पाणी योग्य प्रमाणात प्यावे तसेच जेवताना व सकळी उठल्यावर कोमट पाणी पिणे जास्त उत्तम.
आहारात तंतुमय गोष्टी, भाज्या, फळे यांचा वापर असावा.
गहू, मूग, जुने तांदूळ आवर्जून आहारात असावेत.
कुठल्याही प्रकारचा वेग टाळू नये. मलावरोधाची प्रवृत्ती असणाऱ्यांनी सकाळी लवकर उठावे, एक ग्लास कोमट पाणी पिऊन टॉयलेट सीटवर जाऊन बसण्याची सवय लावावी. झोपणे व उठणे वेळेत होईल तेवढी मलावरोधाची समस्या कमी होते. सकाळचा प्रहर वाताचा प्रहर असतो व वेळेत पोट साफ होणे सोपे असते. सात-साडेसात नंतर वाताचा काळ संपल्यामुळे मलावरोधाचा त्रास वाढलेला दिसतो. शक्यतो रोज विशिष्ट वेळी मलविसर्जनाला गेलेले उत्तम.
पचन व्यवस्थित होण्यासाठी व पोट साफ होण्यासाठी नियमित व्यायाम करणे चांगले. त्यातल्या त्यात वज्रासनात बसणे, संतुलन समर्पण क्रिया, पवनमुक्तासन, सर्वांगासन करणे उत्तम.
कुठलेही रासायनिक औषध घेण्यात येत असले तर त्यापासून शरीरात उत्पन्न होणारी उष्णता कमी करण्यासाठी बरोबरीने संतुलन पित्तशांती, प्रवाळपंचामृत, कामदुधा वगैरे आयुर्वेदिक औषधे घेणे चांगले.
कुठलाही अन्य आजार असल्यामुळे मलावरोध होत असल्यास मूळ आजारावर औषधोपचार करणे उत्तम.
रोज भोजनानंतर अन्नयोगसारख्या गोळ्या घेणे उत्तम.
गरज पडल्यास संतुलन योगसारक चूर्ण, संतुलन त्रिफळा चूर्ण घेता येते.
गरजेप्रमाणे पचनाकरता वेगवेगळी औषधे तसेच वातशमनास मदत करणारी औषधे, बस्ती हे उपचार वैद्यांच्या सल्ल्याने करून घेता येतात.
घरगुती उपाय - साध्या मलस्तंभासाठी काही उपचार घरच्या घरी केले जाऊ शकतात.
रात्री झोपण्यापूर्वी कपभर कोमट वा गरम पाण्यात दोन चमचे साजूक तूप व एक चिमूट मीठ घालून घ्यावे
रोज सकाळी उठल्यावर कपभर कोमट पाणी प्यावे.
रात्री दोन अंजीर व १०-१२ काळ्या मनुका भिजत घालाव्या. सकाळी हे सगळे चावून खाऊन टाकावे, उरलेले पाणी पिऊन टाकावे. लहान मुलांनाही मलावरोधाचा त्रास होत असल्यास मनुकांचे पाणी देण्याचा उपयोग होतो.
आले, मध, लिंबू यांचे चाटण दिवसभरात अधून मधून घेणे उत्तम.
रात्री झोपताना १०-२० मिलीलिटर एरंडेल तेल अर्धा कप दुधात मिसळून घेण्याचा फायदा मिळू शकतो.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.