Blood-Pressure 
फॅमिली डॉक्टर

उच्च रक्तदाब

डॉ. अश्‍विनी उमाळकर-गुगळे

उच्च रक्तदाबाची लक्षणे प्राथमिक पातळीवर दिसत नाहीत; मात्र तो शरीरातील महत्त्वाच्या अवयवांना हानी पोचवत असतो, म्हणून त्याला सायलेंट किलर म्हणतात. रुग्णाला उच्च रक्तदाबाची सुरवात लक्षात येत नाही. उच्च रक्तदाबाच्या द्वितीय किंवा तृतीय श्रेणीमध्येच लक्षणे दिसून येतात.

हृदयाचे प्रमुख कार्य म्हणजे शुद्ध झालेले रक्त संपूर्ण शरीरभर पसरविणे. हे कार्य पूर्ण करण्यासाठी रक्तवाहिन्यांमध्ये पुरेसा जोर व दाब असणे आवश्‍यक असते. या दाबालाच ‘रक्तदाब’ असे म्हणतात. रक्तदाब हा रक्ताभिसरणासाठी अतिशय महत्त्वाचा जोर असतो. ही शक्ती चैतन्य स्वरूपात असल्याने ती आपापल्या परीने काम करत असते. रक्तदाब हा आपल्याला डोळ्यांनी सहजरीत्या दिसत नाही व तो रोजच्या आयुष्यात जाणवतही नाही; परंतु जेव्हा रक्तदाबात बिघाड होतो, तेव्हा तो आपले स्वरूप काही लक्षणांद्वारे दाखवतो; परंतु दुर्दैवाने लक्षणे ही बिघाडाच्या दुसऱ्या अथवा तिसऱ्या श्रेणीत दिसून येतात, त्या आधी रुग्णाला कोणतेही लक्षण दिसून येत नाही.

हृदय शुद्ध रक्त बाहेर फेकण्यासाठी आकुंचन पावते तेव्हा लाट निर्माण होऊन सत्तर मिलिलिटर एवढे रक्त महारोहिणीद्वारे बाहेर पडते. ते पुढे धमन्या ते केशवाहिन्यांद्वारे शरीरभर पसरते. या लाटेच्या उच्चांक बिंदूला सिस्टोलिक व लयाच्या बिंदूला डायस्टोलिक रक्तदाब म्हणतात. या लयदार लाटा सतत याव्याच लागतात.

आजाराचे दोन प्रकार
रक्तदाबाचा आजार दोन प्रकारांत विभागला जातो. 
  उच्च रक्तदाब (हायपरटेन्शन)
  अल्प रक्तदाब (हायपोटेन्शन)

उच्च रक्तदाब हा प्रामुख्याने आढळून येणारा आजार आहे. रक्तदाबातील या प्रकारचा बिघाड असलेल्या रुग्णांची संख्या देशभरात जलद गतीने वाढत आहे. पूर्वी साठीच्या पुढे हा आजार दिसून येत असे; पण आता उच्च रक्तदाब हा तिशीतच डोके वर काढू पाहत आहे. स्त्री व पुरुषांची तुलना केल्यास तीस ते पंचेचाळीस वयोगटांत पुरुषांमध्ये उच्च रक्तदाबाचे प्रमाण वाढलेले दिसून येते, तर पन्नाशीच्या पुढे स्त्रियांमध्ये हे प्रमाण जास्त दिसून येते.

सिस्टोलिक ११० ते १३० mm/Hg  व डायस्टोलिक ७८ ते ९० mm/Hg हे रक्तदाबाचे प्रमाण निरोगी असल्याचे लक्षण आहे. उच्च रक्तदाबाच्या तीन श्रेण्या आहेत. 

प्रथम श्रेणी (सौम्य) - सिस्टोलिक १४० ते १५९ व डायस्टोलिक ९० ते ९९, 

द्वितीय श्रेणी (मध्यम) - सिस्टोलिक १६० ते १७९ व डायस्टोलिक १०० ते १०९, 

तृतीय श्रेणी (गंभीर) - सिस्टोलिक १८०पेक्षा जास्त व डायस्टोलिक ११० पेक्षा जास्त.
 
उच्च रक्तदाबाची कारणे 
प्राथमिक उच्च रक्तदाब - सर्वसाधारणपणे प्राथमिक उच्च रक्तदाबाची कारणे ही अज्ञात असतात. काही जोखमीचे घटक, उदाहरणार्थ- कौटुंबिक इतिहास, वाढते वय, लिंग तसेच पर्यावरणीय घटक, खारट व तेलकट पदार्थांचे सतत सेवन, लठ्ठपणा, मद्यपान व धूम्रपानाचा अतिरेक, अनियमित व्यायाम, शरीराची कमीत कमी हालचाल, शारीरिक व मानसिक ताणतणाव, अशांत झोप या व अशा घटकांच्या अतिरेकाने उच्च रक्तदाबाची सुरवात तरुण वयात, अगदी तिशी-चाळिशीतही दिसून येते.

मध्यम उच्च रक्तदाब - जुन्या व गंभीर स्वरूपाच्या आजारांमुळे रक्तदाब वाढतो. मूत्रपिंड निष्क्रियता, मूत्रपिंडातील रक्तवाहिन्यांचे आजार, महाधमनी विच्छेदन, ब्रेन ट्यूमर, हृदय रक्तवाहिन्यांचे आजार, स्ट्रोक, गर्भवती स्त्रियांमध्ये वारंवार येणारी आकडी यांसारख्या आजारात मध्यम स्वरूपाचा उच्च रक्तदाब त्रासदायक ठरतो.

लक्षणे  
उच्च रक्तदाबाची लक्षणे प्राथमिक पातळीवर दिसत नाहीत; मात्र तो शरीरातील महत्त्वाच्या अवयवांना हानी पोचवत असतो, म्हणून त्याला सायलेंट किलर म्हणतात. रुग्णाला उच्च रक्तदाबाची सुरवात लक्षात येत नाही. उच्च रक्तदाबाच्या द्वितीय किंवा तृतीय श्रेणीमध्येच लक्षणे दिसून येतात, ती अशी -
  डोके जड होणे,
  कमीतकमी हालचालींनीही थकवा जाणवणे, 
  डोळ्यांसमोर वारंवार अंधारी येणे, 
  अस्वस्थ वाटणे, धाप लागणे,
  क्षुल्लक गोष्टींची भीती वाटून छातीत धडधड होणे, 
  यासोबतच मळमळ, उलटी, आकडी, चक्कर वा बेशुद्धी अशी लक्षणेही आढळून येतात. तसे काही जाणवल्यास रुग्णास ताबडतोब रुग्णालयात दाखल करणे योग्य ठरेल. कारण, या स्थितीला अतिपरिचित संकट संबोधले जाते. जर उच्च रक्तदाब हा सिस्टोलिक १८०हून अधिक व डायस्टोलिक ११० हून अधिक असल्यास रुग्ण दगावण्याची शक्‍यता वाढते.

अवयवांवर होणारे दुष्परिणाम  
रक्तवाहिन्या : उच्च रक्तदाबामुळे धमन्यांच्या अस्तरामध्ये बदल घडतात, ते अधिक कडक व जाड बनून त्यात चरबीचा थर जमा होतो, त्यामुळे धमन्यांचा व्यास कमी होऊन इतर महत्त्वाच्या अवयवांना पुरेसा रक्त पुरवठा होत नाही. जुनाट उच्च रक्तदाबामुळे इतर रक्तवाहिन्या कमकुवत बनून त्या हळूहळू सुजतात, त्यास ॲन्युरिझम असे म्हणतात. अशा सुजलेल्या रक्तवाहिन्या अचानक फुटून जीवघेण्या ठरू शकतात.

हृदय : महारोहिणी ही हृदयाला रक्त पुरवठा करणारी महत्त्वाची वाहिनी आहे. या रक्तवाहिनीमध्येही चरबीचा थर जमा होऊन ती अरुंद होते व हृदयाला रक्त पुरवठा कमी करते. हार्ट ॲटॅक, हार्ट स्ट्रोक इत्यादींनी या आजारात अजून भर पडते. हृदयाचा डावा कप्पा पंपाप्रमाणे काम करून शुद्ध झालेले रक्त शरीरभर पसरवतो; परंतु उच्च रक्तदाबामुळे रक्तवाहिनीचा प्रतिकार वाढतो आणि हृदयाला शुद्ध रक्त शरीरभर पसरवण्यासाठी अधिक शक्तीने पंप करावे लागते. सतत होणाऱ्या या क्रियेमुळे डावा कप्पा कणखर व जाड बनू लागतो. कालांतराने त्याची क्षमता घटत जाऊन तो निकामी होतो. पूर्ण रक्त बाहेर फेकू न शकल्यामुळे ते रक्त हृदयातच साचून राहते आणि त्यामुळे हृदयाचा डावा भाग आकाराने वाढतो. त्याचबरोबर संपूर्ण शरीराला रक्तपुरवठा अपूर्ण पडतो. 

मध्यवर्ती मज्जासंस्था (मेंदू) : स्ट्रोक हा उच्च रक्तदाबाचा अधिक घातक परिणाम आहे. येथे रक्तवाहिन्या कमजोर व अरुंद होऊन रक्तपुरवठा खंडित करतात.

मूत्रपिंड : मूत्रपिंडाची क्षमता घटण्याचे एक मुख्य कारण उच्च रक्तदाब होय. मूत्रपिंडास पुरेसा रक्तपुरवठा न झाल्यास रेनिन - अँजिओटेन्सीनं - एल्डेस्टेरॉन एक्‍सेसची सुरवात होते व उच्च रक्तदाब जलद गतीने वाढू लागतो. यामुळे मूत्रपिंड शरीरातील ‘कचरा’ बाहेर फेकण्यास अपयशी ठरते. अनावश्‍यक कचरा शरीरात साठून गंभीर आजार निर्माण होतो. 

डोळे : उच्च रक्तदाब डोळ्यांतील रक्तवाहिन्यांचे नुकसान करून डोळ्यांमध्ये रक्तस्त्राव, धूसर दृष्टी किंवा दृष्टिहीनता घडवून आणतात. या सर्व प्रक्रियेला रेटिनोपॅथी असे म्हणतात. उच्च रक्तदाबासोबतच मधुमेह असल्यास रुग्णास डोळ्यांची काळजी घेणे अनिवार्य ठरते.

अशा प्रकारे उच्च रक्तदाब अनेक अवयवांनादेखील घातक ठरतो. म्हणूनच हा आजार योग्य वेळेस निदर्शनास आणून योग्य ती उपचार पद्धती आत्मसात करणे गरजेचे आहे.
  
उपचार  
होमिओपॅथीमध्ये प्रत्येक रुग्णाची मानसिकता, शारीरिक सवयी, आजाराचा इतिहास आणि कौटुंबिक इतिहास अशा सर्व गोष्टींचा बारकाईने अभ्यास करून औषधोपचार दिले जातात. होमिओपॅथीमध्ये उच्च रक्तदाब व मानसिकतेचा घनिष्ट संबंध समजला जातो. नकारात्मक मानसिक ताण वाढल्याने रक्ताभिसरण जलद गतीने होऊ लागते व त्यामुळे रक्तवाहिन्यांवरील ताणदेखील वाढतो, यास आपण उच्च रक्तदाब म्हणतो. होमिओपॅथिक औषधे मानसिकतेमध्ये सकारात्मक बदल घडवून रक्तवाहिन्यांवरील ताण वेगाने कमी करतात. रक्तप्रवाह सुरळीत व संथ गतीने होत असल्याने धमन्यांचे अस्तर इजा होण्यापासून वाचते. चरबीच्या गाठी धमन्यांमध्ये तयार होत नाहीत, त्यामुळेपुढील संभाव्य गुंतागुंत थांबते व उच्च रक्तदाब नियंत्रित होतो. होमिओपॅथिक औषधे उच्च रक्तदाबासाठी जास्त काळ नियमित घेतल्यास रुग्णास त्याचा चांगला परिणाम दिसून येतो आणि भविष्यातील क्‍लिष्ट आजार टाळण्यास मदत होते.

आहार
वर्ज्य असणारे खाद्यपदार्थ -
 
  सोडियम असणारे खाद्येपदार्थ आहारातून कमी करणे. उदा .पापड, लोणची, चिप्स, बिस्किट्‌स, फ्रेंच प्राइज इ. तसेच सॅलड किंवा अन्नपदार्थात वरून मीठ घेणे टाळणे. 
  अतिसाखर असणारे खाद्य पदार्थ आहारातून वजा करणे. उदा. मिल्क चॉकलेट्‌स, शीतपेये, डबा बंद खाद्यपदार्थ, टोमॅटो सॉस / केचप इ. 
  चरबीयुक्त खाद्यपदार्थ. उदा. दुधावरील मलई, भजे, सामोसा, पकोडे, मांसाहार (लाल मांस), ब्रेड, बटर, पाव, डालडा, तूप इ. 
  मद्यपान 

हे सेवन करा - 
  रिफाईंड तेल न वापरता कच्चे तेल वापरणे उदा. सरसोचे तेल 
  मॅग्नेशिअम, पोटॅशिअम, कॅल्शिअमयुक्त फळे व भाज्यांचे सेवन करणे 
    उदा : केळी (रोज एक सेवन करणे, कारण त्यात पोटॅशिअम जास्त असते), डाळिंब, मोसंबी, द्राक्ष (काळे द्राक्ष जास्त गुणकारी), पपई इ. तसेच पालक, टोमॅटो, बीट रूट, मेथी, कांदा, आवळा, लसूण (एक पाकळी रोज सकाळी)
  मासे, अंडी (पिवळा भाग वर्ज्य करणे).

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: पुण्यात मतमोजणीला प्रत्यक्ष साडे आठ वाजता सुरुवात होणार

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: दहिसर मतदान केंद्रात निवडणूक आयोगाचा भोंगळ कारभार

Maharashtra Assemble Election Result: निकालाच्या टेन्शननं बीपी वाढलंय? अशी घ्या काळजी

Bacchu Kadu Update: निवडणूक निकालापूर्वी बच्चू कडूंचा निकाल लागला, कोर्टाने काय दिला निर्णय?

Chandrapur Assembly Constituency Result 2024 : चंद्रपूर मतदारसंघात भाजप आपला बालेकिल्ला मिळवणार? किशोर जोर्गेवार विरुद्ध प्रवीण पाडवेकर

SCROLL FOR NEXT