शिशिरामध्ये थंडीमुळे वाढलेला वात, साठलेला कफ आणि नंतर येणाऱ्या वसंतामध्ये प्रकुपित होणारा कफ यांचे संतुलन करण्यासाठी बरोबर या काळात होळीची योजना केलेली आढळते. चरकसंहितेत अग्नीच्या साहाय्याने करावयाच्या स्वेदनाचे जे अनेक प्रकार सांगितले आहेत त्यातील होळीशी मिळता-जुळता स्वेदनप्रकार म्हणजे जेन्ताक स्वेदन होय.
आज आहे रंगपंचमी, नुकतीच आपण होळी साजरी केली. सध्या या दोन उत्सवांमध्ये सरमिसळ झालेली दिसते. पण खरे तर होळी आणि धूलिवंदन हे अग्नी पेटवून व दुसऱ्या दिवशी ती रक्षा अंगाला लावून साजरे करायचे असतात, तर रंगांचा उत्सव म्हणजे रंगपंचमी असते.
होळी उन्हाळ्याच्या सुरुवातीला येते. शिशिरामध्ये थंडीमुळे वाढलेला वात, साठलेला कफ आणि नंतर येणाऱ्या वसंतामध्ये प्रकुपित होणारा कफ यांचे संतुलन करण्यासाठी बरोबर या काळात होळीची योजना केलेली आढळते.
चरकसंहितेत अग्नीच्या साहाय्याने करावयाच्या स्वेदनाचे जे अनेक प्रकार सांगितले आहेत त्यातील होळीशी मिळता-जुळता स्वेदनप्रकार म्हणजे जेन्ताक स्वेदन होय. यात काळ्या किंवा पिवळ्या मातीने युक्त प्रशस्त जमीन निवडली जाते. या जमिनीवर गोलाकार कुटी बनवली जाते. या कुटीच्या भिंती मातीच्या बनविलेल्या असतात, हवा आत-बाहेर जाण्याच्या दृष्टीने भिंतींना अनेक कवडसे असतात. भिंतीला लागून बसण्यासाठी चौथरा बनविलेला असतो. या कुटीच्या मध्यभागी एरंड, खैर, अश्वकर्ण वगैरे वातघ्न लाकडे पेटवून अग्नी तयार केला जातो. लाकडे नीट पेटली आणि धूर येणे बंद झाले की या कुटीत प्रवेश करायचा असतो. प्रवेश करण्यापूर्वी व्यक्तीने अंगावर तेल लावायचे असते आणि अंगावर पातळ सुती कापड घ्यायचे असते. कुटीत गेल्यावर भिंतीला लागून बनविलेल्या चौथऱ्यावर सुखपूर्वक झोपून घाम येईपर्यंत व शरीर हलके होईपर्यंत शेक घ्यायचा असतो.
बाष्पस्वेदनाच्या साहाय्याने स्वेदन घेणे आणि याप्रमाणे अग्नीच्या उष्णतेने घाम आणवणे यात फरक असतो. अग्नीच्या प्रत्यक्ष उपस्थितीमध्ये होणारे स्वेदन अधिक तीव्र असते, तसेच अधिक गुणकारी असते.
अग्नी, विशेषतः ज्वाळेने युक्त अग्नी हा दोष दूर करणारा, वातावरणाची, पर्यावरणाची शुद्धी करणारा असतो. होळीच्या निमित्ताने प्रत्येक अंगणात, प्रत्येक चौकात एका विशिष्ट दिवशी व विशिष्ट वेळी अग्नी प्रज्वलित झाला की वातावरणातील सूक्ष्म जीवजंतू, जीवाणू-विषाणू यांचाही नायनाट करण्याची जणू योजना असते.
धूलिवंदनाच्या दिवशी होळीची रक्षा (राख) अंगाला लावली जाते. एरंड, नारळ, शेणाच्या गोवऱ्या, नैवेद्यासाठी तयार केलेली पुरणपोळी, तूप वगैरे द्रव्यांचा संस्कार असणारी रक्षा अंगाला लावण्याची पद्धत आहे. या राखेमधे जंतुघ्न हा मोठा गुणधर्म असतो. आधुनिक संशोधनानुसार राखेच्या मदतीने जखमेतील जंतुसंसर्ग दूर होतो आणि जखम भरून येते, हे सिद्ध झालेले आहे. त्वचेवर रक्षा लावणे, धूळवड खेळणे हा एक प्रकारचा उद्वर्तन उपचारच असतो.
उद्वर्तनं कफहरं मेदसः प्रविलायनम् ।
ंउद्वर्तनामुळे कफदोष दूर होतो, मेद वितळून जाण्यास मदत मिळते.
सामान्यतः उद्वर्तनामध्ये वनस्पतींचे सूक्ष्म चूर्ण वापरले जाते, मात्र वनस्पती जाळून शिल्लक राहिलेली राख अजूनच सूक्ष्म असते परिणामतः अधिकच गुणकारी ठरू शकते. गवरी जाळून तयार झालेली रक्षा झाडांसाठी उत्तम जंतुनाशक असते.
रासायनिक कीटकनाशके फवारण्याऐवजी याप्रकारे नैसर्गिक आणि तरीही प्रभावी जंतुनाश वापरणे कधीही चांगले. होळीची उरलेली राख ही जमिनीतील अतरिक्त आम्लता दूर करण्यासाठी सुद्धा उपयुक्त असते. अशा प्रकारे धूलिवंदनाच्या निमित्ताने आपण आपल्या आरोग्याचे आणि पर्यावरणाचे रक्षणच करत असतो.
भारतीय संस्कृतीप्रमाणे, परंपरेप्रमाणे धूलिवंदनाच्या दिवशी चंदनाच्या गंधात आंब्याचा मोहोर मिसळून तयार केलेले पेय प्राशन करण्यास सांगितलेले आहे. चंदन शीतल असते हे आपण जाणतोच.
उन्हाळ्यातील उष्णतेचे योग्य प्रकारे नियमन होण्यासाठी चंदन उपयोगी असते. आंब्याचा मोहोरही अनेक औषधी गुणांनी उपयुक्त असतो.
आम्रपुष्पमतीसारकफपित्तप्रमेहनुत् ।
असृग्दरहरं शीतं रुचिकृत् ग्राहि वातलम् ।।
....भावप्रकाश
आंब्याचा मोहोर कफ-पित्तदोष कमी करतो, थंड असतो, रुची वाढवतो, वातूळ असतो. जुलाब, प्रमेह, पाळीच्या वेळचा अतिरक्तस्राव यांच्यावर उपयोगी असतो. वसंतातील कफप्रकोप आणि वातावरणातील उष्णता यांचा त्रास होऊ नये यासाठी याप्रकारचे पेय घेणे उपयुक्त असते. एक ग्लास पाण्यात चमचाभर चंदनाचे गंध आणि दोन-तीन चिमूट आंब्याचा मोहोर मिसळून हे विशेष पेय तयार करता येते.
होळीनंतर पाच दिवसांनी येते रंगपंचमी. वसंतामध्ये निसर्ग रंगांची उधळण करत असतोच. त्याला रंगपंचमीची जोड मिळत असते. नावाप्रमाणेच रंगपंचमी म्हणजे रंगाचा सण. निरनिराळे रंग व पाणी यांच्या साहाय्याने रंगपंचमी साजरी केली जाते. मात्र हे रंग रासायनिक नाहीत, त्वचेला हानिकारक नाहीत याची खात्री असावी. पाण्याचे फुगे मारणे किंवा डोळ्यांत, नाका-कानात रंग जाईल अशा पद्धतीने एकमेकाला रंग लावणे हे सुद्धा टाळायला हवे.
बाजारात मिळणारे रंग शुद्ध रसायनविरहित असतीलच याची खात्री नसते. त्यामुळे थोडी आधीपासून तयारी केली तर रंगपंचमीला लागणारे रंग घरच्या घरी सुद्धा तयार करून ठेवता येतात. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे हे रंग अशा वनस्पतींपासून बनवता येतात, ज्या त्वचेसाठी आणि केसांसाठी औषधाप्रमाणे उपयुक्त असतात. उदा.
लाल रंग - लाल जास्वंदाची फुले सर्वांच्या परिचयाची असतात. ही फुले केसांसाठी उत्तम पोषक असतात. केसांची नीट वाढ व्हावी, केस अकाली पांढरे होऊ नयेत यासाठी जास्वंदाचे संपूर्ण झाड उपयुक्त असते. लाल रंग बनविण्यासाठी जास्वंदाची लाल फुले वाळवून त्यांचे चूर्ण बनविता येते. लाल गुलाबाच्या पाकळ्या वाळवूनही लाल रंग बनविता येतो. गुलाबाची फुले त्वचेचा वर्ण उजळवणारी, सौंदर्य वाढण्यास मदत करणारी असतात. पांगारा नावाच्या वृक्षाला लालभडक रंगाची फुले येतात. ही फुले रात्रभर पाण्यात भिजवून ठेवली असता लाल रंगाचे पाणी मिळते. पांगारा जंतुनाशक असतो. त्यामुळे पांगाऱ्याच्या फुलांच्या लाल पाण्याने त्वचा स्वच्छ व शुद्ध होण्यास मदत मिळते. त्वचेचे जंतुसंसर्गापासून रक्षण होते. मंजिष्ठा ही सुद्धा त्वचेसाठी उत्तम असणारी वनस्पती होय. मंजिष्ठा या वनस्पतीच्या मुळ्या पाण्यात उकळल्या असता पाण्याला सुंदर लाल रंग येतो.
हिरवा रंग - मेंदीचा हिरवा रंग प्रसिद्ध आहे. मेंदीची पाने वाळवून बनविलेले चूर्ण हिरवा रंग म्हणून वापरता येते. सध्या बाजारात तयार मिळणारी मेंदी बहुधा रासायनिक द्रव्यांनी युक्त असते, त्यामुळे घरच्या घरी मेंदीचे चूर्ण बनविणे श्रेयस्कर. मेंदी केसांसाठीही उत्तम असते, शरीरातील उष्णता कमी करून रक्तशुद्धीला मदत करते. हिरव्या रंगाचे पाणी हवे असेल तर लिटरभर पाण्यात दोन चमचे मेंदीचे चूर्ण मिसळता येते किंवा कोथिंबीर वाटून त्यापासूनही हिरवा रंग बनवता येतो.
मॅजेंटा रंग - बीट रूटपासून अतिशय सुंदर रंग मिळू शकतो. एक बीट रूट किसून एक लिटर पाण्यात रात्रभर भिजवून सकाळी गाळून घेतले की छान रंगीत पाणी तयार होते.
केशरी रंग - पळसाची फुले रात्रभर पाण्यात भिजत ठेवली किंवा पाण्याबरोबर उकळून घेतली तर सुंदर केशरी रंग तयार होतो. पळस सुद्धा त्वचेला जंतुसंसर्ग होऊ नये, त्वचा नितळ राहावी म्हणून उपयुक्त असतो.
पिवळा रंग - बेसनाच्या पिठात हळद मिसळली असता सुंदर पिवळा रंग तयार होतो. भारतीय परंपरेत हे उटणे म्हणून घराघरात वापरले जाते हे आपण जाणतोच. झेंडूची फुले वाळवून सुद्धा पिवळा रंग बनवता येतो. झेंडूची फुले पाण्यात भिजवून उकळली असता सुंदर पिवळ्या रंगाचे पाणी मिळू शकते.
अशा प्रकारे शुद्धतेची शंभऱ टक्के खात्री असणारे रंग घरच्या घरी तयार करता येतात. असा रंगांबरोबर रंगपंचमी साजरी केली तर आनंदाबरोबर आरोग्याचाही अनुभव घेता येईल.
अशा प्रकारे आरोग्यासाठी शंभर टक्के सुरक्षित, इतकेच नाही तर त्वचेच्या सौंदर्याला पूरक असे रंग तयार करून रंगपंचमी साजरी केली तर पाण्याचा अपव्यय, प्रदूषण टाळता येईल आणि या सणांचा खऱ्या अर्थाने उपयोग करून घेता येईल.
|