Infertility in male 
फॅमिली डॉक्टर

पुरूषाचे वंध्यत्‍व 

संतोष शेणई

आपल्याकडे लग्न हा विषय ‘मुला’भोवती केंद्रीत झालेला असतो. त्यामुळे लग्न होऊन सहा महिने व्हायच्या आधीच मूल कधी होणार याची स्त्रीकडे विचारणा सुरू होते. त्यामध्ये मूल होणे हे फक्त स्त्रीवरच अवलंबून आहे असा आविर्भाव असतो. मूल होत नसेल, तर तिलाच दोषी धरून तिच्या तपासण्या सुरू होतात. पण अशावेळी पुरूषाच्याही तपासण्या होणे गरजेचे आहे. दोष पुरुषामध्येही असू शकतो हे समजून घ्यायला हवे. 
 

आपल्याकडे लग्न हा विषय ‘मुला’भोवती केंद्रीत झालेला असतो. त्यामुळे लग्न होऊन सहा महिने व्हायच्या आधीच मूल कधी होणार याची स्त्रीकडे विचारणा सुरू होते. सुरूवातीला गंमत, मग चेष्टा, नंतर कुत्सितपणा आणि शेवटी टोमण्यांना तोंड देण्याची वेळ त्या स्त्रीवर येते. त्यातही एकाच सुमारास लग्न झालेल्या एकीला दिवस गेले आणि दुसरीला गेले नाहीत, तर दुसरीला स्वतःलाच उणेपणा अधिकच जाणवू लागतो. ती स्वतःलाच दोष देऊ लागते, ही सर्वसाधारणपणे घडणारी गोष्ट आहे.
बहुतेकदा मूल होत नाही म्हणून सासरची माणसे दोष देऊ लागतात आणि त्यात भर म्हणून नवऱ्याच्याही मनात पत्नीविषयी तिटकारा उत्पन्न करतात. साहजिकच त्यांच्या संसारात तणाव निर्माण होऊ लागतो. येथे एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी की, मूल होत नसेल तर त्याला स्त्री इतकाच पुरूषही जबाबदार असू शकतो. मूल होत नसेल, तर केवळ स्त्रीलाच दोषी धरून तिच्या तपासण्या सुरू होतात. पण अशावेळी पुरूषाच्याही तपासण्या होणे गरजेचे आहे. दोष पुरुषामध्येही असू शकतो हे समजून घ्यायला हवे. 

वैवाहिक जीवनाचा पुरेपूर उपभोग घेतल्यानंतर पहिल्या दोन-तीन वर्षांत गर्भधारणा न झाल्यास स्त्री आणि पुरुष सारखेच जबाबदार असतात, हे लक्षात घ्या. अभ्यासानुसार, गर्भधारणा न होण्याच्या केसेसमध्ये केवळ स्त्रीमध्ये दोष असण्याचे प्रमाण जसे 33 टक्के आढळले आहे, तसे फक्‍त पुरुषामध्ये दोष असण्याचेही प्रमाण तेवढेच म्हणजे 33 टक्केच आढळले आहे. दोघांमध्येही एकाच वेळी थोडे थोडे दोष असण्याचे प्रमाणही तेवढेच आहे. एक टक्का केसेसमध्ये वंध्यत्वाचे नेमके कारण समजून येत नाही. असे असले तरी, बहुधा मूल न होण्याचा सर्व दोष फक्‍त स्त्रीवरच लादला जातो. यामुळे शारीरिक दोषांपेक्षा सामाजिक दडपणाचेच भय अशांना जास्त वाटत असते. त्यामुळे होते काय की, अशी जोडपी समाजाच्या, कुटुंबाच्या दडपणाने अशास्त्रीय व अंधश्रद्ध उपायांकडे वळतात. अजूनही वंध्यत्वासाठी वैद्यकीय मदत घेण्याची बहुतेकांना लाज वाटत असते. किंबहुना, डॉक्टरकडे गेल्यास समाजात त्याविषयी चर्चा होण्याची जास्त भीती वाटत असते. त्यापेक्षा गुपचुपपणे देव-देव करणे, व्रत-वैकल्ये करणे त्यांना सोयीचे वाटते. पण त्यानंतरही मूल होत नाही म्हटल्यावरत त्यांच्या मनावरील दडपण अधिकच वाढत जाते आणि शेवटचा उपाय म्हणून ते भीतभीतच डॉक्‍टरांकडे जातात. जर देव-देव न करता डॉक्टरकडे आधी गेल्यास लवकर कारण समजून योग्य उपाय होऊन हा अवघड व नाजूक प्रश्‍न कोणताच तणाव निर्माण होण्यापूर्वीच सुटू शकतो. 

गर्भधारणेसाठी स्त्री-पुरुषांमध्ये कोणती शारीरिक रचना व कार्य आवश्‍यक असते, याचे शास्त्रीय ज्ञान समजून घेतले तर बरेचसे गैरसमज टळू शकतील. म्हणून सातत्याने प्रयत्न न केल्यानंतरही गर्भधारणा होत नसेल तर, मनाने खचून न जाता तपासण्या करून घेऊन योग्य ते उपचार करून घेण्यास पुढे आले पाहिजे. विवाह होऊन पती-पत्नी एक वर्षाहून जास्त काळ, संतती प्रतिबंधक उपाय न करता, एकत्र येत असतील आणि तरीही स्त्रीमध्ये गर्भधारणा झाली नसेल तर दोघांनीही प्राथमिक तपासण्या करून घेतल्या पाहिजेत. त्यात कोणतेही न्यूनत्व आढळले नाही, तर आणखी एक वर्ष थांबायला हरकत नाही. मात्र त्यानंतरही गर्भधारणा होत नसेल तर दोघांनीही जास्त सखोल व खर्चीक तपासण्या करून घ्याव्यात. स्त्री-पुरुषांच्या विविध तपासण्यांपैकी पुरुषाची प्राथमिक तपासणी सोपी व कमी खर्चाची असल्यामुळे प्रथम पुरुषाने तपासण्यांसाठी तयार व्हावे व त्यात कोणताही मोठा दोष आढळला नाही, तर स्त्रीने विविध प्रकारच्या तपासण्या करून घेण्याची तयारी ठेवावी. 

पुरुषांमधील तपासण्या 
पुरूषांमधील वंध्यत्व दोन प्रकारचे असते. नपुंसकत्व म्हणजे शारीरिक संबंध येण्यासाठी पुरुष लिंगामध्ये आवश्‍यक ते बदल घडू न शकल्याने समागमच होऊ न शकणे हा एक प्रकार आहे. तसेच मूल होण्यासाठी आवश्‍यक असणारे योग्य वीर्य नसल्यामुळे गर्भधारणा होऊ न शकणे हा दुसरा प्रकार आहे. या दोन भिन्न गोष्टी आहेत. म्हणजे, नपुंसकत्व असणाऱ्या पुरुषाचे वीर्य गर्भधारणेसाठी योग्य असू शकते; पण असा पुरुष स्त्रीबरोबर समागम करू शकत नाही. बऱ्याच वेळा अशा व्याधीचे मूळ मानसिक रोगामध्ये असते. म्हणून या दोषांची गल्लत करू नये. कारण त्यावरील उपचार अगदी भिन्न असतात. आजारपण, दुखापती, आधीपासून असलेले आजार, चुकीची जीवनशैली आदी कारणांमुळे शुक्राणूंच्या समस्या येतात. शिवाय, वाढत्या वयासोबत प्रजननक्षमताही कमी होते.

वंध्यत्व कोणत्या वयात समजते, यावर त्याचे कारण अवलंबून असते. जनुकीय व औषधांमुळे निर्माण झालेले वंध्यत्व कमी वयातही दिसून येते. तणावामुळे निर्माण झालेले वंध्यत्व प्रजननाच्या दृष्टीने कमी वयात दिसून येते. आघात, प्रादुर्भाव यांमुळे तरुण वयात वंध्यत्वाची समस्या निर्माण होऊ शकते. याशिवाय वय वाढणे, आनुवांशिकता, प्रादुर्भाव, मॅलिग्नन्सी, ट्युमर्स, आघात, आजार, अपरिपक्व वृषण, अमली पदार्थ व मद्यपान, धूम्रपान, कामाच्या ठिकाणी उच्च तापमानाचा संपर्क येणे, अतिस्थूलपणा, अतिश्रम यांसोबतच काही स्पष्ट न होऊ शकणाऱ्या किंवा इडियोपॅथिक कारणांमुळे पुरुषांमध्ये वंध्यत्वाची समस्या दिसून येते.
अशा परिस्थितीत पुरुष लैंगिकदृष्ट्या सक्रिय राहतात. इतर कारणे नसल्याचे स्पष्ट झाल्यास वयोमानपरत्वे कामवासना कमी होणे, इच्छा कमी होणे, वारंवारता कमी होते.
इरेक्शनसंदर्भातील (शिश्न ताठर होण्याशी संबंधित) काही समस्यांमुळे, शिश्न वाकडे असणे किंवा वेळेपूर्वीच स्खलन (इजॅक्युलेशन) आदीं समस्याही दिसून येतात. पुरुषांमधील नपुंसकत्व शोधून काढण्यासाठी अगर त्याचे कारण करण्यासाठी प्रयोगशाळेतील तपासण्या नसतात. परंतु नपुंसकत्व नसताना गर्भधारणा होत नसेल तर वीर्य तपासणी करून घेण्यास पुरुषाने टाळाटाळ करू नये. 

लिंगाचा ताठरपणा पुरेसा नसणे किंवा वेळेपूर्वी स्खलन होणे यांसारख्या लैंगिक संबंध ठेवण्यातील समस्या येणाऱ्यांचा वंध्यत्वाशी थेट संबंध नसतो. यामध्ये रुग्णाला वंध्यत्वाहून अधिक तणाव असतो तो लैंगिक संबंध ठेवण्यात कमी पडण्याचा. वंध्यत्व हा येथे अप्रत्यक्ष परिणाम ठरतो. काहीवेळा प्रादुर्भावांमुळे लैंगिक संबंध वेदनादायी झाल्यास पुढे लैंगिक संबंध नीट ठेवण्याची समस्या येते. मात्र त्यातही मानसिकता अधिक कारणीभूत असते. 

वीर्य तपासणी 
स्त्री-पुरुषांमधील शारीरिक संबंधाच्या सुखाच्या उच्च बिंदूला पुरुष लिंगामधून (शिस्नामधून) बाहेर उडणाऱ्या चिकट द्रव पदार्थाला वीर्य असे म्हणतात. यामध्ये गर्भधारणेला आवश्‍यक असणारी पुरुषबीजे म्हणजेच शुक्राणू असतात. स्त्रीच्या योनीमध्ये वीर्य सोडल्यानंतर त्यातील शुक्रजंतू गर्भाशयातून गर्भनलिकेत प्रवेश करतात. त्याच वेळी स्त्रीबीज तयार झाले असेल तर एका शुक्रजंतूचा स्त्रीबीजाशी संयोग होऊन गर्भधारणा होऊ शकते. वीर्यामधील शुक्रजंतूंची संख्या एका घन सेंटीमीटरमध्ये चार कोटी ते दहा कोटी इतकी प्रचंड असते. एका संबंधाच्या वेळी वीर्यपतनातून सुमारे तीन ते पाच घन सेंटीमीटर (साधारण एक चमचा) वीर्य बाहेर पडते. म्हणजेच दर वेळी एकूण बारा ते वीस कोटी इतके शुक्रजंतू स्त्रीच्या योनीमध्ये सोडले जातात. यातील फक्‍त एका शुक्राणूचा उपयोग गर्भधारणेसाठी होतो. उरलेले सर्व शुक्राणू थोड्या तासांतच मृत पावतात. 

हे लक्षात घेतले तर, वीर्य तपासणीस देताना ते शारीरिक संबंधाच्या ज्या नैसर्गिक अवस्थेत निर्माण होते तशाच परिस्थितीत देणे योग्य ठरते. तरच त्यापासून मिळणारी माहिती जास्त उपयोगी ठरू शकते. म्हणून वीर्य तपासणीस देताना ते कसे गोळा करावे, याविषयीच्या सूचना अगोदर प्रयोगशाळेत जाऊन समजावून घ्याव्यात आणि मगच ते तपासण्यास द्यावे. याबाबत कोणतीही शंका असल्यास ती विचारण्यास संकोच बाळगू नये. 
पुढील सूचना लक्षात ठेवाव्यात : 

- चांगल्या दर्जाचे वीर्य मिळण्यासाठी ज्या वेळेस पुरुषाची मानसिक व शारीरिक तंदुरुस्ती उत्तम असेल अशाच वेळी ते तपासावे. म्हणून दमलेले असताना किंवा सर्दी-खोकला यासारखे किरकोळ आजार असतानाही वीर्य तपासू नये. पूर्ण विश्रांती व मन:स्वास्थ्य असताना ते तपासावे. 

- वीर्य तपासणीचा दिवस व वेळ अगोदर ठरवून घ्यावी. त्या अगोदर तीन-चार दिवस संबंध करू नये. तसेच या काळात हस्तमैथुन किंवा स्वप्नावस्थेतही वीर्यपतन झालेले नसावे. नैसर्गिक अवस्थेत दोन संबंधांमध्ये साधारण तीन-चार दिवसांचा कालावधी जातो, असे धरून हा काळ ठरवला आहे. म्हणून तीन-चार दिवसांपेक्षा जास्त काळही जाऊ देऊ नये. 

- वीर्य गोळा केल्यानंतर त्याची प्राथमिक तपासणी अर्ध्या तासातच करावी लागते. त्यामुळे वीर्य गोळा केल्यापासून ते सुमारे अर्ध्या तासातच प्रयोगशाळेत देणे आवश्‍यक असते. म्हणून ते गोळा करण्यासाठी प्रयोगशाळेत स्वतंत्र जागा उपलब्ध असल्यास तेथेच घेणे चांगले. परंतु तशी सोय नसल्यास किंवा घर जवळ असल्यास बाहेर गोळा करून ते लगेच प्रयोगशाळेत नेऊन द्यावे. म्हणून प्रयोगशाळा उघडण्याची वेळ पाहून त्याप्रमाणे ते गोळा करण्याची वेळ ठरवावी. रात्री गोळा केलेले वीर्य सकाळी प्रयोगशाळेत देऊन चालणार नाही. 

- वीर्य गोळा करण्यासाठी मोठ्या तोंडाची, काचेची (प्लास्टिकची नाही), फिरकीच्या घट्ट झाकणाची, मध्यम आकाराची बाटली घ्यावी. पाण्याच्या किंवा इतर द्रव पदार्थांच्या सान्निध्यात शुक्राणू आल्यास ते लवकरच मृतवत होतात. म्हणून बाटली कोरडी व स्वच्छ असावी. बाटलीवर सुवाच्च अक्षरांत आपले संपूर्ण नाव, दिनांक व वीर्य गोळा केल्याची वेळ लिहिलेली नोंद करावी. 

- हस्तमैथुन किंवा खंडित संभोग करून वीर्याचा संपूर्ण भाग बाटलीत धरावा. कारण वीर्यपतनाच्या वेळी प्रथम उडणाऱ्या भागात शुक्रजंतूंची संख्या त्यानंतरच्या भागापेक्षा बरीच जास्त असते. निरोधसारखे कोणतेही साधन या वेळी वापरू नये. कारण निरोध हे संतती प्रतिबंधक असल्यामुळे त्याच्या सान्निध्यात शुक्रजंतू जिवंत राहू नयेत, अशी काळजी घेतलेली असते. 

- तपासणीच्या निष्कर्षांचा अहवाल (रिपोर्ट) प्रयोगशाळेतून नेताना तेथील डॉक्‍टरांना भेटून अहवालातील नोंदी समजावून घ्याव्यात आणि कोणतीही शंका असल्यास तिचे निरसन करून घ्यावे; म्हणजे गैरसमजाने मनात अकारण भीती उत्पन्न होत नाही. वीर्यामध्ये कोणताही दोष आढळल्यास काही दिवसांनी परत एकदा वीर्य तपासून दोष तत्कालीक नसल्याची खातरी करून घ्यावी. दोषावर केलेल्या उपचाराचा परिणाम अजमावण्यासाठी वीर्य तपासणी परत-परत करावी लागण्याचा संभव असतो. पूर्वीच्या अहवालातील माहितीशी तुलना करण्यासाठी जुने अहवाल क्रमवार लावून ठेवावेत. 

वीर्यामध्ये पुढील प्रकारचे प्रमुख दोष आढळून येतात : 
- शुक्राणूंची संख्या कमी असणे. 
- शुक्राणूंचा जिवंत राहण्याचा काळ कमी असणे. 
- संख्या कमी व जिवंत राहण्याचा काळही कमी. 
- शुक्राणूंचा हालचालीचा वेग कमी असणे. 
- शुक्राणू अजिबात नसणे. 

... तर काय? 
प्रजननक्षमता व शुक्राणूंची संख्या वाढवण्यासाठी पुरुष काय करू शकतात? शुक्राणूंची संख्या व हालचाल वाढवण्यासाठी औषधे उपलब्ध आहेत. वीर्य विश्लेषणाच्या आधारे या औषधांचा योग्य वापर केल्यास इच्छित परिणाम साध्य होऊ शकतात. तणावातून बाहेर येणे, सैल अंतर्वस्त्रे वापरणे व उच्च तापमानाशी जननेंद्रियांचा संपर्क टाळणे यांमुळे प्रजननक्षमता सुधारू शकते. अतिताण, मद्यपान, धूम्रपान तसेच हार्ड ड्रग्जचे सेवन यांमुळे शुक्राणूंच्या संख्येवर परिणाम होत असल्याने आरोग्यकारक जीवनशैलीचा अवलंब करा. यापैकी कोणतीही सवय तुमच्या जीवनशैलीचा भाग असेल तर ती दूर करा. शिवाय, पुरुषांमधील वंध्यत्व स्थूलपणामुळे वाढू शकते. त्यामुळे आरोग्यपूर्ण आहार घेणे, अधिक क्रियाशील राहणे व वजन कमी करणे यांमुळे स्थूलतेशी निगडित वंध्यत्वाच्या समस्या कमी होऊ शकतात. तुम्हाला किंवा तुमच्या जोडीदाराला गर्भधारणेत अडचणी येत असतील, तर वयाशी निगडित प्रजननक्षमतेच्या समस्या सोडवण्यात तज्ज्ञ तुम्हाला मदत करू शकतात. 

मात्र, काही अंतराने लागोपाठ केलेल्या दोन वेळच्या तपासणीत शुक्राणूंचा अजिबात अभाव आढळल्यास पुढील एक महत्त्वाची तपासणी करावी लागते. अंडाशय आकाराने लहान असेल किंवा रिकामे असेल तर समस्या येऊ शकते. म्हणून वृषणांच्या पिशवीतील दोन अंड्यांचा छोटा तुकडा काढून तो तपासावा लागतो. ही शस्त्रक्रिया सोपी व फक्‍त कापावयाच्या ठिकाणचा भाग बधिर करून करता येते. त्यासाठी रुग्णालयामध्ये राहण्याची जरुरी नसते. छोटी शस्त्रक्रिया करून काढलेले अंड्यांचे तुकडे प्रयोगशाळेत तपासावयास पाठवतात. त्यावरून अंड्यांमध्ये शुक्राणू तयार होण्याची क्रिया व्यवस्थित चालू आहे किंवा नाही, याची माहिती मिळते. शुक्राणू व्यवस्थित तयार होत असतील, तरीही ते वीर्यतपासणीत आढळून येत नाहीत, असा दोष आढळल्यास शुक्राणू तयार झाल्यापासून शिश्‍नातून बाहेर पडेपर्यंतच्या नलिकामार्गात अडथळा असल्याचा दोष संभवतो. 

अशा वेळी शस्त्रक्रिया करून अडथळा दूर करणे शक्‍य असते. पूर्ण वाढ झालेले शुक्राणू तयार होत नसतील तर ते तयार होण्यासाठी आवश्‍यक असणाऱ्या अंतस्रावी पदार्थांचे (हार्मोनचे) मापन रक्‍त तपासून करण्याची आवश्‍यकता असते. प्रामुख्याने टेस्टोस्टेरॉन, फॉलिकल स्टिम्युलेटिंग हार्मोन, ल्युटिनायझिंग हार्मोन व प्रोलॅक्‍टिन या चार स्रावांचे प्रमाण बघतात. या तपासण्यांची सोय फक्‍त मोठ्या रुग्णालयांमध्ये व प्रयोगशाळांतूनच असते. त्या तपासण्याही बऱ्याच खर्चीक असल्याने आवश्‍यक तेव्हाच त्या करण्याचा सल्ला डॉक्‍टर देतात. या संप्रेकांची (हार्मोन्सची) कमतरता आढळल्यास बाहेरून टोचून त्याची भरपाई करणे शक्‍य असते. 

काही दोष दुरुस्त करण्यापलीकडे असतात, तर काही वेळा कोणताही दोष आढळला नसला तरीही गर्भधारणा होत नाही. अशा वेळी निराश न होता ही समस्या कशी सोडवायची याबद्दल आपले डॉक्‍टर सल्ला देतील त्याप्रमाणे करावे. 

 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT