होळी ही एक उपचारपद्धती आहे. आयुर्वेदाच्या उपचाराशी साधर्म्य असणारा ‘सौना बाथ’ आहे. होळीमुळे तयार झालेल्या विशिष्ट धुरामुळे वातावरणातील बरेचसे जीवजंतू, बॅक्टेरिया, व्हायरस मरत असावेत असे वाटते. म्हणजे जीवजंतू, बॅक्टेरिया, व्हायरस मरण्यासाठी होळीची योजना केलेली आहे असे वाटते. तसेच सर्प, विंचू वगैरेंनी आपापल्या घरात जमिनीच्या खाली जावे, असाही संकेत होळीच्या आगीतून मिळतो.
नुकताच सर्वांनी होलिका सण साजरा केला व आज रंगपंचमी साजरी होईल. भारतीय संस्कृतीचे महत्त्व असे की, त्यात सांगितलेल्याचे आचरण करणे हा एक आरोग्य उपचारच असतो. सर्दी, ताप, कर्करोग वगैरे रोग झाल्यावर करायचे शारीरिक उपचार म्हणजे आरोग्य उपचार नव्हे, तर संपूर्ण शरीरात जे काही दोष उत्पन्न होऊ शकतात त्यांचे संतुलन करणे, तसेच शरीर धारण करण्यासाठी ज्या सात धातूंची गरज असते त्यांचे आरोग्य सांभाळणे, शरीरातून जो मल बाहेर टाकला जावा अशी आवश्यकता असते त्याचे योग्य विसर्जन होणे, आणि मुख्य म्हणजे शरीर व मन यांना एकत्र चालविण्यासाठी शरीरातील संप्रेरक शक्तींचा महत्त्वाचा भाग असलेल्या अग्नीचे संतुलन असणे हे सर्व आरोग्यासाठी आवश्यक असतात. गाडी योग्य प्रकारे चालण्यासाठी गाडीला लागणारी शक्ती-पेट्रोल व्यवस्थित असावे लागते व गाडी चालविणारा चालकही व्यवस्थित असावा लागतो हे आपण सहज समजू शकतो, तसेच शरीर स्वस्थ असण्यासाठी शरीर, मन व शरीरातील संप्रेरके यांचे महत्त्व समजून घेणे आवश्यक आहे. अर्थात गाडीवर बसून गाडी कुठेतरी घेऊन जाणे म्हणजे गाडी चालविणे असे नव्हे, तर गाडीत बसलेल्या व्यक्तीने वा गाडीच्या मालकाने सांगितलेल्या स्थळी वेळेवर गाडी पोचविणे, तेही गाडीला कुठल्याही प्रकारचा अपघात होऊ न देता, गाडीला कुठेही धक्का न लागता घेऊन जाणे म्हणजे गाडी चालविणे. त्याचप्रमाणे स्वस्थ शरीरासाठी आत्मा, इंद्रिये व त्यांना संतुलित करणारे मन या सर्वांचे आरोग्य गृहीत धरलेले असते. भारतीय संस्कृती हा उपचार म्हटला तर तो या सर्व व्यवस्थेला आरोग्य प्रदान करेल ही अपेक्षा असते.
भारतीय संस्कृतीत होलिका व रंगपंचमी हे दोन सण आहेत. होलिका सणाशी निगडित असलेल्या प्रह्लादाची कथा ही एक सांकेतिक कल्पना आहे. होलिकेचा दुष्टपणा वगैरे सर्व गोष्टी कथानकाशी निगडित आहेत. आयुर्वेदाने होलिकेची योजना पावसाळ्यानंतर आलेल्या थंडीनंतर वसंत ऋतूची सुरुवात होण्यापूर्वी पर्यावरणात वाढलेले जीवाणू (बॅक्टेरिया), विषाणू (व्हायरस), बुरशी (फंगस) वगैरे सर्व जीवनाला शत्रू ठरणाऱ्या गोष्टींचा नाश करण्यासाठी केलेली योजना असते.
सध्या सगळीकडे कोरोना व्हायरसची भीती वाढलेली आहे. हा व्हायरस अनेकांना आपल्या जाळ्यात ओढताना दिसतो. भीती म्हणजे मरण असे म्हटले तर कोरोनामुळे प्रत्यक्ष मरणाऱ्यांची संख्या प्रचंड नसली तरी सर्व मानवजातीला भीतीमुळे जिवंतपणी मरणाचा अनुभव येत असावा असे वाटते. येथे एक गोष्ट लक्षात घ्यावी लागेल की थंड हवामानामध्ये कोरोना व्हायरस वाढतो. त्यामुळे थंड हवामानाच्या प्रदेशांत याचा त्रास अधिक होऊ शकतो. उष्ण हवामानात कोरोनाचा व्हायरस टिकाव धरू शकत नाही. घर ऊबदार ठेवणे प्रत्येकालाच शक्य आहे हे गृहीत धरले तरी वातावरणाला वसंत ऋतूत येणाऱ्या उष्णतेपूर्वी तयार करणे, त्यासाठी वातावरण गरम करणे आवश्यक आहे. अशीच योजना होळी उत्सवाच्या निमित्ताने केलेली दिसते. होळी काही तासांसाठी पेटवली जात नाही तर ती काही दिवस सलगपणे जाळत ठेवण्याची परंपरा आहे. यामुळे निर्माण होणाऱ्या उष्णतेने किंवा होळीमुळे तयार झालेल्या विशिष्ट धुरामुळे वातावरणातील बरेचसे जीवजंतू, बॅक्टेरिया, व्हायरस मरत असावेत असे वाटते. म्हणजे जीवजंतू, बॅक्टेरिया, व्हायरस मरण्यासाठी होळीची योजना केलेली आहे असे वाटते. तसेच सर्प, विंचू वगैरेंनी आपापल्या घरात जमिनीच्या खाली जावे असाही संकेत होळीच्या आगीतून मिळतो. होळीच्या अग्नीवर पाणी गरम करून स्नान करण्याचा, ते गरम पाणी दिवसभर थोडे थोडे पिण्याचा, होळीच्या निखाऱ्यांवर रताळे, बटाटे वगैरे काही गोष्टी भाजून खाण्याचा आनंद घेता येतो.
होळी ही आयुर्वेदाच्या उपचाराशी साधर्म्य असणारा ‘सौना बाथ’ आहे. सौना सध्या मोठ्या प्रमाणावर स्पा सेंटर्समध्ये किंवा हेल्थ सेंटर्समध्ये योजलेला दिसतो. अग्नीच्या भोवती गोल कोंडाळे करून बसावे, बाजूने मनुष्याच्या उंचीची कनात लावलेली असावी, जेणेकरून होळीचा धूर वरच्या बाजूने निघून जाईल. डोक्याला थंडी लागू नये यासाठी वर छत केलेच तर धूर जाण्यासाठी वरच्या बाजूला मोठे भोक ठेवण्याची योजना केलेली असावी. अशी सौना बाथची कल्पना असते. होळीभोवती बसून गप्पागोष्टी करत असताना मनातील किल्मिषे, वाईट विचार बाहेर टाकून पुन्हा मैत्रीचे भावसंबंध स्थापित करण्याची ही योजना. एरंडीचे झाड किंवा कडुनिंबाची डहाळी वगैरे विशिष्ट वनस्पती, शेणाच्या गवऱ्या अशा सर्व गोष्टी रचून होळी पेटवली जाते. यांच्या धुरामुळे वातावरण शुद्ध होत असावे असे वाटते. आणि यांची राख अंगाला लावल्यानंतर त्वचासंरक्षणाची व्यवस्था होत असावी असे मानायला जागा आहे. म्हणून होळीच्या दुसऱ्या दिवशी त्यातील राख एकमेकांच्या अंगावर टाकून नंतर गरम पाण्याने स्नान करून धुळवड साजरी केली जात असे.
होळीनंतर येणाऱ्या पंचमीच्या दिवशी रंगपंचमी खेळली जात असे. सध्या होळीच्या दुसऱ्या दिवशीच धुळवड, रंगपंचमी असे दोन्ही एकाच दिवशी साजरे केले जातात. एवढ्या बदलामुळे संस्कारात फार मोठा बदल झाला असेल असे वाटत नाही. हे सर्व वर्णन ऐकल्यावर होळी ही एक उपचारपद्धती आहे हे सहज लक्षात येईल. संस्कृती जोपासण्याच्या हेतूने खेड्यांपासून ते शहरांपर्यंत सर्वत्र ही योजना चालू ठेवलेली दिसते. होळीसारख्या सणांमध्ये काही वेळा आलेली विकृती दूर करून कोरोना व्हायरससारख्या गोष्टी दूर ठेवण्यासाठी मदत घेता येऊ शकते.
एकमेकांमध्ये प्रस्थापित झालेल्या मैत्रीतून निर्माण झालेला उत्सव म्हणजे रंगपंचमी. प्रत्येकाने एकमेकांच्या रंगात बुडून जायचे हा यामागचा हेतू. एखाद्याच्या अंगावर पाणी टाकल्यावर ती व्यक्ती आनंदित होईलच असे नाही, मात्र रंगपंचमीच्या दिवशी रंगीत पाणी अंगावर टाकल्यास कुणाची ना नसते. ज्या ज्या ठिकाणी भारतीय संस्कृती टिकून आहे त्या त्या ठिकाणी रंगपंचमीचा प्रेमोत्सव निष्ठेने साजरा केला जातो. प्रत्येक गोष्टीला बीभत्स स्वरूप देणारी काही मंडळी असतातच. अशी मंडळी ऑइलपेंट, एल्युमिनियमचा चकचकीत रंग समोरच्याला लावणे, रंग भरलेले फुगे लपून अनोळखी व्यक्तींवर फेकून मारून त्यांना डिवचणे, चारचौघांनी एखाद्याला उचलून हौदात बुचकळवणे वगैरे प्रकार करताना दिसतात. असे बीभत्स प्रयोग नक्कीच टाळता येऊ शकतात.
वातावरणात थंडी जाणवत असताना रंगीत पाण्याचा वापर न करता वेगवेगळ्या रंगांच्या फुलांची एकमेकांवर उधळण करण्याचा सकारात्मक बदलही काही ठिकाणी झालेला दिसतो.
सध्या कोरोना व्हायरसची चर्चा आहे. अशा वेळी श्वसननलिकेला बाधा होईल किंवा कफजन्य रोग उत्पन्न होईल, फुप्फुसांमध्ये अडथळा उत्पन्न होईल अशा तऱ्हेचा उपद्रव होऊ नये अशी खबरदारी घेण्याचे आवाहन केले जात आहे.
रसायनांपासून बनविलेले रंग, विशेषतः भारतीय संस्कृतीची ज्यांना चाड नाही, माहिती नाही अशा देशांतून आयात केलेले रंग वापरून होळी व रंगपंचमी खेळली गेली तर थोड्याशा आनंदासाठी जिवास मुकावे लागण्याची शक्यता नाकारता येत नाही.
पूर्वीच्या काळी रंग करण्यासाठी केशर, पळसाची फुले, जास्वंदीची फुले, हळद वगैरे द्रव्यांचा वापर केला जात असे. असे रंग कपड्यावर पडले तर नंतर त्या कपड्याची अवस्था न वापरण्याजोगी होत नसे. थोडी मेहनत घेतली तर नैसर्गिक रंग तयार करता येतात आणि असे रंग खेळल्यास कोणालाही अपाय न होता रंगपंचमी आनंदाने साजरी करता येते. पिचकारीने रंग टाकल्यास रंग बारीक बारीक थेंबांच्या रूपाने पडतो तेव्हा अंग शहारते व ज्याने रंग टाकला त्याच्याविषयी जास्त आत्मीयता उत्पन्न होते असे दिसते. वसंत ऋतूच्या उष्णतेला थोडा गारवा मिळावी यासाठी याचे प्रयोजन केलेले दिसते. वसंत ऋतूत सर्व ठिकाणी नवीन पालवी व फुले दिसू लागतात. निसर्ग याप्रमाणे रंगांची उधळण करणार आहे तो आहे हे ओळखून त्याआधीच रंगपंचमीची योजना केलेली दिसते. तरी भारतीय संस्कृती पाळणे हे उपचार आहेत असे समजून त्याचे व्यवस्थित पालन केले तर आरोग्याला अधिक उपयोगी ठरू शकते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.