kahaja karnaji sakal media
फूड

ट्रेंडी ‘अन्नपूर्णा’ : खाज्याचे कानवले

दिवाळी जवळ आली, की सर्वप्रथम वेध लागतात ते फराळाचे. सर्वांची आवडती करंजी तयार करणे म्हणजे घरोघरी सोहळा असतो

मधुरा पेठे

दिवाळी जवळ आली, की सर्वप्रथम वेध लागतात ते फराळाचे. सर्वांची आवडती करंजी तयार करणे म्हणजे घरोघरी सोहळा असतो. ज्या दिवशी करंजी करायची त्या दिवशी झटपट स्वयंपाक करून गृहिणी पूर्ण वेळ याकरता देतात. घरातील सर्वांना, शेजारपाजार, नातेवाईक या सगळ्यांना पुरेल इतक्या करंज्या तयार केल्या जातात. आधीपासून करंजीचे सारण तयार करून ठेवणे, सकाळी लवकर पारीकरता कणीक भिजवून ठेवणे ही कामे घरातील वयस्कर बाई लक्ष देऊन करतात. मग दुपारी मांडामांड करून बायका आणि लहान मुली करंजी भरायला बसतात. एकेक थाळी भरून करंजी भरली, की तळायला घ्यायचे.

महाराष्ट्रात निरनिराळ्या पद्धतीने करंजी तयार केली जाते. त्यातही खाज्याचे कानवले हा तयार करायला क्लिष्ट आणि नाजूक प्रकार. तोंडात टाकता क्षणी विरघळणारे हे कानवले पाकसिद्धीचा नमुना आहे. करंजीपेक्षा कानवले थोडा निराळा पदार्थ आहे. याची पारी तयार करण्याच्या पद्धतीमुळे पारीचे असंख्य पदर तयार होतात. प्रत्येक पदर निराळा दिसतो, त्यामुळे दिसायलादेखील हा अतिशय देखणा पदार्थ. पदार्थातील सौंदर्यस्पर्धा घेतली असता निश्चित कानवले बाजी मारून जातील इतके सुरेख आणि सुबक. कानवले भरताना, तो उचलून ताटात ठेवताना, तळताना, आणि तळून झाल्यावर अलगद हाताने काढून ठेवताना अगदी फुलांच्या पाकळ्या हाताळाव्यात इतक्या नाजूक हाताने काम करावे लागते. वेळखाऊ काम आहे जरूर; परंतु पिढीगणीक ही खाद्यपरंपरा जोपासण्यात आली आहे. चला तर मग, आज आपण पण पाहूयात हे खास खाज्याचे कानवले कसे तयार करतात.

पारीकरता साहित्य : २ वाटी बारीक रवा, चिमूटभर मीठ, २ टेबलस्पून तेल, भिजवण्यासाठी दूध.

कृती :

  • २ कप रव्याला २ लहान पळी तेल चिमूटभर मीठ आणि थोडे थंड दूध घेऊन घट्ट भिजवायचे. ही कणीक किमान ४ तास रूम टेंपरेचरला ठेवून द्यावी.

  • ४ तासाने किंचित तेलाचा हात लावून मळून एकसारखे करून घायचे.

  • पूर्वी पाट्यावर वरवंट्याने कुटला जाई. आजकाल त्याचे लहान तुकडे मिक्सरवर फिरवून घेतात. असे केले की पीठ मऊ होते. अशी मिक्सरवर फिरवलेली कणीक ओल्या मलमलच्या कापडाखाली झाकून ठेवा.

  • सारण साहित्य : २ वाट्या कणीक, २ टेबलस्पून तूप, १ वाटी डेसिकेटेड कोकोनट, २ टेबलस्पून खसखस, ४ टीस्पून वेलदोडा पावडर, २ वाट्या पिठीसाखर (याकरता खास तूप चोळलेली पिठीसाखर दिवाळीत मिळते. ती हाताने फोडून भुसभुशीत करून घ्यावी.)

कृती :

  • कणीक आधी नुसती थोडी आणि मग तूप घालून खमंग भाजावी. नंतर खसखस कोरडी भाजून घेणे. खोबरे हलके भाजून घ्यावे.

  • सगळे थंड झाले, की मिक्स करून तयार करून ठेवावे. वेलदोडा अंमळ जास्तच घालावा, छान लागतो.

साटा : १ टेबलस्पून कॉर्नफ्लोअर आणि १ टेबलस्पून तूप एकत्र करून फेसून घट्ट पेस्ट करून घ्यावी.

करंजी कृती :

  • मिक्सरवर फिरवलेल्या कणकेचे ३ ते ४ भाग करावेत.

  • थोडे जाडसर लाटून त्यात बोटे रुतवावीत. प्रत्येक लाटलेल्या पोळीवर साटा नीट लावून घ्यावा. नंतर सर्व पोळ्या एकमेकांवर रचून किंचित दाबून घ्याव्यात.

  • त्याचा अळूवडीसारखा व्यवस्थित रोल करावा. रोल केल्यावर लाटणे जसे फिरवतो, त्याप्रमाणे थोडे गोल फिरवून हा रोल थोडासा लांब करून घ्यावा. असे केल्याने पारीचे पदर छान तयार होतात.

  • या रोलमधील दीड इंचाचे आशा मापाने भाग करावेत. प्रत्येक भागाच्या दोन्ही उघड्या बाजू विरुद्ध दिशेने फिरवावीत जसे आपण चॉकलेटचे रॅपर गुंडाळतो. असे केल्याने त्यात लावलेला साटा बाहेर येत नाही. याला पगडी तयार करणे म्हणतात. अशी एकेक पगडी हाताने पेढ्यासारखी हलके दाबून हलक्या हाताने लाटावी.

  • अगदी पातळ लाटून मग सारण भरावे. सारण भरून कानवल्यांच्या कडांना दूध पाण्याचा हात लावावा आणि करंजी दुमडून घ्यावी.

  • कातणीने सुबक कातून घ्यावी आणि भरलेला कानवला ओल्या मलमलच्या कापडाखाली झाकून ठेवावा. अशा प्रकारे ताटभर कानवले करून घ्यावेत आणि मग तळण करावे. तळताना तूप व्यवस्थित तापवून घ्यावे आणि नंतर गॅस बारीक करून थोडे निवले की मग त्यात एका वेळेस एकच कानवला तळायला घ्यावा.

  • मध्यम आचेवर हळूहळू तळावा, त्याचा रंग बदलू देऊ नये. कानवला पांढरा शुभ्र असतो आणि याचा रंग असाच असावा असा संकेत आहे. रंग बदलला म्हणजे कानवला पुढे गेला. म्हणून तळणेदेखील एक कसब आहे. तळतानाच त्याचे असंख्य पापुद्रे तयार होतात. ते झाले म्हणजे आपल्याला कानवले जमले असे म्हणावे.

  • कानवला तळला तरी अगदी मऊ असतो. करंजी तळल्यावर जशी स्टीफ होते त्याप्रमाणे होत नाही, त्यामुळे झऱ्यासोबत अजून एका जास्त धार नसलेल्या उलथण्याची मदत घेऊन तुपातून अलगद बाहेर काढावा. असे करतानासुद्धा फुटू शकतो म्हणून विशेष काळजी घ्यावी.

  • तळलेला कानवला अलगद टिपकागदावर काढून घ्यावा. थंड झाला, की सर्व पापुद्रे अजून छान दिसायला लागतील. मग अलगद हे कानवले मोठ्या डब्यात एकावर एक न ठेवता लाडूप्रमाणे ठेवावे.

  • कानवले गरम आणि गार दोन्ही सुरेख लागतात. अगदी १५ दिवस शिळेसुद्धा छान लागतात. प्रचंड वेळखाऊ आणि कसब असलेले काम आहे. तोंडात पडताक्षणी विरघळणारे हे कानवले घरी करून पहा. सर्वाना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Georai Crime : बूथप्रमुखांचा अर्ज भरण्यास गेलेल्या एकावर लोखंडी रॉड आणि कोयत्याने तिघांकडून मारहाण, बीडच्या गेवराईतील घटना

Bharat Global Developers : बोनस आणि स्टॉक स्प्लिटचा डबल धमाका, कोणता आहे हा शेअर ?

Belrise Industries IPO Launch : बेलराईज इंडस्ट्रीज आणणार 2150 कोटीचा आयपीओ, डिटेल्स जाणून घ्या...

Udgir Assembly Elecion Result : पंचवीस टेबल, २६ राऊंडमध्ये होणार मतमोजणी; बारा वाजेपर्यंत ट्रेंड हाती येणार

Ramchandra Ingawale : राजकारणाचा नुसता चिखल झालाय; भूगावमधील १०९ वर्षीय रामचंद्र इंगवलेंची व्यथा

SCROLL FOR NEXT