bhogi Recipe : खान्देशात भोगी सक्रांतीला बहुतेक घरात खास गावरान बेत असतो. यातला प्रत्येक पदार्थ खान्देशात ज्यापध्दतीने करतात त्या पध्दतीने इतरत्र केला जात नाही.महाराष्ट्रात संक्रात म्हणजे भोगी आणि मकर संक्रांत अशी साजरी करतात. भोगीची भाजी, तीळ लावून भाकरी, सुगडे पूजणे, तीळ गूळ करणे, गुळाची पोळी, पतंग उडवणे या गोष्टी पूर्ण महाराष्ट्रात सारख्याच असल्या तरी भोगी आणि संक्रांतीला त्या प्रदेशाचा म्हणून जो वेगळेपणा असतो तो जेवणाच्या ताटात आणि खास तिथल्या चवीत हमखास आढळतो.
भोगी आणि संक्रांतीला जेवणाच्या ताटातला वेगळेपणा खान्देशाच्या बाबतीत खूपच उठून दिसतो. कढी, शेंग सोलाण्याची भाजी आणि ज्वारीची तीळ लावून केलेली भाकरी आणि खास भोगीसाठी म्हणून मुगाच्या डाळीची खिचडी हे पदार्थ करतात. आजच्या लेखात आपण भोगी स्पेशल कळण्याची पुरी आणि भरीत कसे तयार करायची याची पद्धत पाहणार आहोत.
सुरूवातीला बघू या कळण्याच्या पुरीसाठी लागणार कळण्याचं पीठ कस करावं लागतं ?
कळण्याचे पीठ तयार करण्यासाठी 1 किलो ज्वारीला 200 ग्रॅम अख्खे उडीद, 25 ग्रॅम मेथ्या आणि 100 ग्रॅम खडेमीठ टाकून हे चक्कीतून दळून आणावे. कळण्याच्या पुरी कशा तयार करायच्या ?भाकरीच्या पिठाप्रमाणेच पुरीचे पीठ हे गार पाण्याने भिजवावं. फक्त हे पिठ थोडं चिकट असतं. ते चांगलं मळलं की कणिक मळून झाल्यावर आपण वरुन तिला जसं तेल लावतो तसं तेल कळण्याचं पीठ मळलं की लावावं. नंतर मग केळीच्या पानाला तेल लावून किंवा पोळपाटाला तेल लावून अगदी हलक्या हातानं पुऱ्या लाटाव्यात आणि तेलात तळून घ्याव्यात. या पिठात इतर काहीही घालण्याची गरज नसते. पिठात मीठ असतंच. ज्वारी आणि उडदाच्या एकत्रित मिश्रणामुळे या पुऱ्यांना छान चव येते.
आता बघू या पुऱ्यासोबत खायला वांग्याचं खान्देशी भरीत कस करायच याची सविस्तर रेसिपी..
खान्देशात सर्व घरात एकाच प्रकारचं भरीत होतं ते म्हणजे खान्देशी पध्दतीचं. इथल्या भरताचं हेच वैशिष्ट्य आहे. खान्देशी पध्दतीच्या भरतात कधीही हळद घातली जात नाही. हे भरीत मस्त पांढरं दिसतं. या पध्दतीचं भरीत करताना कांदा नाही तर कांद्याची पात घातली जाते. भरपूर तेलात कांद्याची पात एकतर ठेचून नाहीतर बारीक चिरुन, मिरची परतून मिरची लसणाचा ठेचा, लसणाची पात असल्यास लसणाऐवजी लसणाची पात ठेचून किंवा बारीक चिरुन घालावी. शेंगदाणे घालून ते तळून घ्यावेत. मग बाडग्यात ठेचणीनं कुस्करलेलं भरताचं वांगं यात टाकून ते परतून घ्यावं. मीठ घालावं आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घातली की खान्देशी पध्दतीचं भरीत तयार होतं.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.