- नीलिमा नितीन
तुझं माझं जमेना आणि तुझ्यावाचून करमेना’ अशीच काही स्थिती असते प्रत्येक बहीण-भावाची. लहानपणी अगदी छोट्या छोट्या गोष्टींवरून सतत खटके उडत असतात. कधी बाचाबाचीवरून ते हाणामारीपर्यंतही भांडणं जातात; पण यात सगळ्यांत अवघड काय असतं तर तो अबोला.
आख्खं घर काही मिनिटांसाठी अगदी सुन्न होऊन जातं; पण परत ये रे माझ्या मागल्या म्हणत यांची बोलणी, भांडणं सुरू होतात. मला वाटतं बहीण-भावांचं नातं हे लिंबाच्या लोणच्यासारखं असतं. आंबट, गोड, तिखट. नवीन असतं तेव्हा स्वाद अगदी झोंबतो. डोळे मिचकावून तोंड वेडवाकडं करून आपण ते खात असतो; पण जसजसं ते मुरतं, तसं जेवणाचा स्वाद दुप्पट करतं.
अगदी मिळमिळीत झालेल्या जेवणालाही चविष्ट बनवतं. तुम्हाला माहिती आहे का, एखाद्या वेळी वरणाला चव चांगली नाही आली, तर अगदी थोडंसं लोणचं घालून एक उकळी आणायची. त्याचा अगदी कायापालट होतो. करून बघा. अगदी तसंच काहीसं बहीण-भावाचं नातं असतं. लहानपणी होणारे वादविवाद हळूहळू काळजीत रूपांतरित होतात. नातं मुरत जातं तसतसं ते स्वादिष्ट होत जातं.
घरातील मोठी बहीण ही कधी आईची जागा घेऊन सगळ्यांची काळजी घेत असते, तर भाऊ हा वडिलांप्रमाणे खंबीर पाठीशी उभा असतो. बहीण कुठल्याही परिस्थितीत मोडणार नाही, याची काळजी घेत असतो. लहानपणी ओवाळणीवरून होणारी भांडणाची जागा ‘तू स्वतःची काळजी घे’नं घेतली जाते.
बहीण-भाऊ आपल्या आयुष्यातील पहिले मित्र-मैत्रिणी असतात. ते लाख जरी तुम्हाला नावं ठेवत असले, तरी त्यांच्यासमोर तुम्हाला कोणी बोललं, तर अगदी त्यांच्या अंगावर धावून जायला कमी करणार नाहीत. लहानपणी मिळणाऱ्या स्पंजच्या राखीच्या आकारावरून मिरवणारा आपला भाऊ ते आत्ताच्या रेशीमधाग्यांच्या राखीपर्यंतची ही वाटचाल अनोखी आहे.
राखीच्या नाजूक धाग्यांनी घट्ट विणलेलं हे नातं म्हणजेच रणरणत्या उन्हात झाडाखाली मिळणारी शांत छाया आहे. अशा या आठवणीनं भरगच्च भरलेल्या क्षणांना खास करण्यासाठी मी आजची ही शेफ्स स्पेशल रेसिपी घेऊन आले आहे.
जो जिव्हाळा पारंपरिक मिठाईत आहे तो चॉकलेटमध्ये नाही, असं माझं स्पष्ट मत आहे. आणि त्यामुळेच आजची ही खास रेसिपी ही पुण्यातील पंचतारांकित हॉटेल कॉनराडचे एक्झिक्युटिव्ह शेफ अनिर्बन दासगुप्ता यांची आहे.
शेफ अनिर्बन हे गेली कित्येक वर्षं महाराष्ट्रातील व भारतातील विविध पंचतारांकित हॉटेलमध्ये मुख्य शेफ म्हणून काम करत आहेत. मूळचे बंगाली असले, तरी पुणे हे त्यांचं आवडतं शहर आहे. त्यांनी बनवलेल्या काही खास आणि अप्रतिम रेसिपीज मी स्वतः खाऊन पहिल्या आहेत. चला तर मग बघू या राखीपोर्णिमा स्पेशल ही रेसिपी.
साहित्य
१०० ग्रॅम नारळ पावडर, १०० ग्रॅम काजू पावडर, १०० ग्रॅम साखर + २० ग्रॅम साखर (अंजीर मिक्ससाठी), २ चमचे तूप, ५ नग अंजीर, तूप १ टीस्पून, २ चमचे दूध पावडर.
कृती
अंजीरे पाव कप पाण्यात अर्धा तास भिजवा. ४-५ मिनिटे
मऊ होईपर्यंत उकळी आणा. अतिरिक्त पाणी काढून टाका.
पेस्ट होईपर्यंत ग्राइंडरमध्ये क्रश करा.
कढईत तूप गरम करा. अंजीर पेस्ट परतून घ्या. २० ग्रॅम साखर आणि २ चमचे दूध पावडर घाला. २-३ मिनिटे घट्ट होईपर्यंत शिजवा. थंड होऊ द्या.
आता, स्टफिंगसाठी नारळ आणि काजू रोल पेस्ट करण्यासाठी दुसऱ्या पॅनमध्ये ३ चमचे पाण्यात साखर विरघळवा. ५ मिनिटे उकळी आणा. पाक बनवा.
पाकात काजू पावडर आणि खोबरं घाला. नीट ढवळून घ्या. मिश्रणात तूप मिसळा.
तूप लावलेल्या जाड प्लास्टिक शीटनं झाकून ठेवा. अंजीर मिक्स शीटच्या आकारात लाटून घ्या. यात मध्यभागी आडव्या रेषेत नारळ आणि काजू पेस्टचा रोल ठेवा.
रोलचे दीड इंच तुकडे करा.
तय्यार आहे आपली खास मिठाई. नक्की करून बघा व तुमच्या नात्यातला गोडवा वाढवा.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.