बीड : गणेशोत्सव म्हटले की धांगडधिंगा, पत्त्यांचे डाव आणि आणखी काही. फार झाले तर फलकांतून जनजागृती व देखावे. यंदा जिल्ह्यात (District) गणेशोत्सव कोविड (covid) प्रतिबंधक लसीकरणोत्सव ठरणार आहे. मोठ्या गणेश मंडळांमार्फत किमान ११०० लोकांचे लसीकरण (Vaccination) करून घ्यावे, असे आदेश जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा (Radhabinod Sharma) यांनी संबंधित यंत्रणेला दिले आहेत. यामुळे जिल्ह्यात उत्सवानिमित्त लसीकरणास (Vaccination) मोठी मदत मिळणार आहे.
जानेवारी महिन्यापासून कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहीम सुरु झाली आहे. काही वेळा लोकांचा प्रतिसाद असला तरी लस उपलब्ध होत नाही. तर, अनेकदा लस असेल तर लोक येत नाही, असे विरोधाभासाचे चित्र आहे. मात्र, जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा यांनी गणेशोत्सवाची पर्वणी लसीकरणासाठी शोधली आहे. प्रत्येक शहरांमध्ये मोठ्या गणेश मंडळांची संख्या २० च्या वर असते. या मंडळांकडून किमान ११०० लोकांचे लसीकरण करण्यासाठी लसींचा पुरवठा शीतसाखळी, आवश्यक मनुष्यबळ व नोंदणीची यंत्रणा उपलब्ध करून देण्याची जबाबदारी वैद्यकीय अधीक्षक, मुख्याधिकारी व पोलिस यंत्रणेवर सोपविली आहे. सहाजिकच गणेश मंडळाचे उत्साही व तरुण कार्यकर्त्यांमुळे येवढे उद्दिष्ट पूर्ण व्हायला काहीही अडचण येणार नाही.
तर, ग्रामीण भागातही मोठ्या मंडळांकडून एवढेच लसीकरणाचे उद्दिष्ट पूर्ण करण्याची जबाबदारी तहसीलदार, गटविकास अधिकारी, तालुका आरोग्य अधिकारी, तलाठी, ग्रामसेवक, वैद्यकीय अधिकारी व पोलिस पाटील यांच्यावर दिली आहे. बाजारपेठांच्या गावांमध्ये किमान दोन तरी गणेश मंडळे असतात. त्यामुळे ग्रामीण भागात देखील लसीकरणाला वेग येणार आहे. लस साठा उपलब्ध करून देण्याची जबाबदारी जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांवर असून लसीकरणाच्या आढाव्याची जबाबदारी नगर पालिका जिल्हा प्रशासन अधिकारी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पंचायत) यांच्यावर असेल. दरम्यान, जिल्ह्यात आतापर्यंत लसींचे साधारण साडेनऊ लाखांवर डोस टोचण्यात आले आहे. दोन डोस घेणाऱ्यांची संख्या अडीच लाखांच्या घरात आहे. गणेशोत्सवात लसीकरणाला प्राधान्य दिल्याने हा आकडा झपाट्याने वाढण्यास मदत होणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.