वर्षभरापासून ज्यांच्या आगमनाची आपण आतुरतेने वाट पाहात असतो असे आपल्या लाडक्या गणपती बाप्पांच्या आगमनाचे सर्वांना वेध लागले आहेत. मोठ्या उत्साहात बाप्पांच्या स्वागताची तयारी सर्वत्र सुरू आहे. अनेकांच्या मनात गणपती बाप्पांची स्थापना कधी करावी, त्याचा मुहूर्त काय असे एक ना अनेक प्रश्न तयार झाले आहे. यंदाच्या गणेश स्थापनेच्या दिवसाला एक विशेष महत्व प्राप्त झाले आहे. यंदाच्या गणेश चतुर्थीला काय विशेष महत्व आहे, स्थापनेचा मुहूर्त काय, स्थापनेचे महत्व काय अशा अनेक प्रश्नांची उत्तर आपण पं. अतुलशास्त्री भगरे यांच्याकडून जाणून घेवूया. (Ganesh festival 2022 Ganpati sthapana muhurat date time significance in Marathi)
* प्रश्न - श्री गणेशाची स्थापना चतुर्थीलाच का?
पं. अतुलशास्त्री भगरे - आपल्या सर्वांना कल्पना आहे की भाद्रपद शुद्ध चतुर्थी हा गणेश व्रताचा आरंभ करण्याचा दिवस. आपल्याकडे पंचायतन देवता प्रधान आहेत. यामध्ये गणपती, विष्णू, शिव, शक्ती आणि सुर्य आहे. या प्रत्येक देवतेसाठी एक विशिष्ट तिथी निर्धारित करण्यात आली आहे. यानुसार गणपतीसाठी चतुर्थी येते म्हणून गणेशाच्या पुजेसाठी चतुर्थी तिथी पुजनीय आहे. या तिथीला गणपतीचे पुजन, उपासना भक्तीभावे केल्यास त्या फळास जातात, म्हणून गणेशाची स्थापना तथा पुजा चतुर्थीला केली जाते.
* प्रश्न - भाद्रपदातील चतुर्थीचे व्रत कसे करावे?
पं. अतुलशास्त्री भगरे - भाद्रपद शुद्ध चतुर्थीपासून ते भाद्रपद शुद्ध चतुर्दशी म्हणजेच 'अनंत चतुर्दशी' या दहा दिवसांत सर्वत्र उत्साहात गणेश उत्सव साजरा केला जातो. हे व्रत प्रत्येकाने आपल्या कुल परंपरेनुसार साजरे करावे. मग काही लोकांकडे दिड दिवस, कोणाकडे तीन, पाच, सात आणि दहा अशा दिवसांत पार्थिव गणेशाची प्रतिष्ठापना केली जाते. त्यानुसार आणि कुल परंपरेनुसार त्याचे स्थापना, नित्यपुजन, आरती भक्ती-भावे पुर्ण करावी.
* प्रश्न - गणेशाची स्थापना करताना मुहूर्त बघणे आवश्यक आहे का? स्थापना कधी करावी?
पं. अतुलशास्त्री भगरे - गणपती स्वतः निर्विघ्न देवता आहे त्यामुळे भाद्रपद शुद्ध चतुर्थीला पार्थिव गणपतीचे घरोघरी स्थापन पुजन करताना ते माध्यान्न काळापुर्वी म्हणजेच साधारण दुपारी दिड वाजेपुर्वी करावे. या दरम्यान विशेष वेळ किंवा मुहूर्त पाहण्याची आवश्यकता नाही
* प्रश्न - यंदा भाद्रपद चतुर्थी 30 तारखेला सुरु होत आहे मग गणेश स्थापना 31 ला का?
पं. अतुलशास्त्री भगरे - पंचांगानुसार कुठलीही तिथी ही सुर्योदयापासून मानली जाते जाते. 30 ऑगस्टला तृतीया तिथी दुपारी 3 वाजून 32 मिनीटांनी संपून चतुर्थी तिथीला प्रारंभ होत आहे. मात्र सुर्योदयावेळी तृतीया तिथी असल्याने 30 तारखेला तृतीया तिथी मानली जाईल. मात्र 31 ऑगस्टला चतुर्थी तिथी दुपारी 3 वाजून 22 मिनीटांनी संपेल पण तरीही चतुर्थी तिथीला सुर्योदय हा 31 ऑगस्टलाच होत असल्याने 31 ऑगस्ट 2022, बुधवार या दिवशीच गणेश चतुर्थी साजरी करावी.
* प्रश्न - यंदा गणेश स्थापनेच्या दिवशी बुधवार येतो आहे, याला काही विशेष महत्व आहे का?
पं. अतुलशास्त्री भगरे - होय, बुधवार हा बुध ग्रहाचा वार, बुध हा बुद्धीचा दाता मानला जातो. याचप्रमाणे गणेशाला बुद्धीचा अधिपती मानतात. बुधवार हा श्री गणेशाला समर्पित केलेला वार आहे. बुधवारी गणेशाची मनोभावे पुजा, आराधना केल्याने भक्तांची सर्व दुःख, संकटे दूर होतात असे मानले जाते. यंदाच्या वर्षी गणेश चतुर्थीला हा योग जुळून आला आहे. त्यामुळे यंदा बुधवारी गणेश चतुर्थी आल्याने याला विशेष महत्व प्राप्त झाले आहे.
* प्रश्न - उजव्या सोंडेच्या गणपतीचे कडक सोवळे असते हा समज कितपत खरा आहे?
पं. अतुलशास्त्री भगरे - उजव्या सोंडेचा गणपती कडक सोवळ्याचा असून त्याचे पुजन कडक पद्धतीने करावे लागते आणि डाव्या सोंडेचा गणपती सौम्य असल्याने त्याचे पुजन प्रत्येकजण करु शकतो म्हणून डाव्या सोंडेचा गणपती बसवावा हा समज चुकीचा आहे. गणपतीची श्रद्धा- भक्ती युक्त मनोभावे पुजा करणे हे अत्यंत महत्वाचे आहे.
* प्रश्न - घरात गर्भवती स्त्री असताना पार्थिव गणेशाचे पुजन करावे की नाही?
पं. अतुलशास्त्री भगरे - अनेकांच्या मनात हा प्रश्न उद्भवतो. अनेक ठिकाणी गर्भवती स्त्री घरात असेल तर त्यावर्षी गणेशाचे विसर्जन करत नाही. असे करणे केवळ चुकीचे आहे. भाद्रपद शुद्ध चतुर्थीला गणेशाची स्थापना करुन अनंत चतुर्दशीला त्याचे विसर्जन केलेच पाहीजे.
* प्रश्न - घरात अडचण असल्यास गणेशाची स्थापना करावी का?
पं. अतुलशास्त्री भगरे - होय, कारण पार्थिव गणेश पुजन हा आपल्या कुल परंपरेनुसार गणेशाची स्थापना झालीच पाहीजे. या करिता आपण इतर गोत्रजांच्या हस्ते देवाची स्थापना करुन पुजन करावे मात्र दिवस चुकवू नये.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.