Konkan Ganeshotsav Tilari Dam esakal
Ganesh Chaturti Festival

Konkan Ganeshotsav : 'त्या' सोनेरी दिवसांच्या उरल्या फक्त आठवणी! आताच्या झगमगाटातही 'तिलारी'च्या स्मृती तेजस्वी

नदी-नाल्यातून डोकीवरून गणेशाची मूर्ती नेण्याची परंपरा आता शहरी उत्सवात केवळ आठवणी राहिल्या आहे.

सकाळ डिजिटल टीम

मूर्तीसाठी दिले जाणारे २०० ते ३०० रुपये ही किंमत तेव्हा खूप मोठी वाटायची; मात्र आताही किंमत हजारात गेली आहे.

-संदेश देसाई

दोडामार्ग : पूर्वी तिलारी खोऱ्यातील डोंगर कपारीतून धरणामुळे विस्थापित झालेल्या व आता शहराच्या जवळ पुनर्वसित गावातील रहिवासी सह्याद्रीच्या रांगांमधील जुन्या गणेशोत्सवाच्या सोनेरी आठवणींना उजाळा देताना दिसत आहेत.

गतस्मृतीतील ते दिवस परत येणार नसले, तरी त्या काळातील उत्सवाची (Ganeshotsav) मजा आताच्या झगमगाटात नसल्याची भावना यातील अनेकजण व्यक्त करत आहेत. तिलारी धरणामुळे (Tilari Dam) विस्थापित होऊन आता बराचकाळ लोटला असला, तरी तेथील उत्सव पाहिलेली पिढी ते सोनेरी दिवस विसरलेली नाही.

मूळ गावातील उत्सव आणि आताचा पुनर्वसनाच्या ठिकाणचा सण यात आमूलाग्र बदल झाल्याचे ते आवर्जून सांगतात. दळणवळणाच्या सक्षम सुविधा नसताना, नदी-नाल्यातून डोकीवरून गणेशाची मूर्ती नेण्याची परंपरा आता शहरी उत्सवात केवळ आठवणी राहिल्या आहे. आता वजनदार असलेली गणेशाची मूर्ती आणण्यासाठी वाहनाचा उपयोग केला जात आहे; मात्र त्या काळात जुन्या गावठाणात कंदील, बत्तीच्या प्रकाशावर साजऱ्या होणाऱ्या सणाच्या आठवणी आजच्या विद्युत रोषणाईच्या झगमगाटातही प्रकल्पग्रस्तांच्या मनात तितक्याच ताज्या आहेत.

जुन्या गावातील तो उत्साह व मौज-मजा शहराच्या ठिकाणी येत नसल्याचे प्रकल्पग्रस्त सांगत आहेत. खोऱ्यात डोंगर कपारीतील आठ गावं धरण प्रकल्पामुळे दोडामार्ग शहराजवळ वसवण्यात आली. जुन्या गावात कित्येक पिढ्यांचा वर्षानुवर्षे असलेला अधिवास, तेथील पारंपरिक रिवाज धरणाच्या जलाशयात विसावला असून, आठवणी मात्र प्रकल्पग्रस्तांच्या मनात आजही ताज्या आहेत. यात सणासुदीच्या स्मृती तर लखलखणाऱ्या आहेत.

अतिदुर्गम भाग, दळणवळणाची गैरसोय, आणि विद्युत रोषणाईची कमतरता असतानाही त्यावेळीचा सणासुदीचा उत्साह वेगळाच होता. एकत्र लागून असलेली घरे आणि चाकरमान्यांच्या आगमनामुळे निर्माण झालेला चैतन्य झरा हा एकप्रकारे आपुलकी व आत्मियता निर्माण करणारा होता; मात्र आता नव्या वसाहतीत कामाधंद्यात व्यस्त असलेल्या जीवनशैलीमुळे आपुलकी आणि आत्मियतेत काहीसा दुरावा होताना दिसून येत आहे.

मूळ गावात शेती व्यवसायावर गुजराण करीत असतानाचा तो एकोपा, एकमेकांना सहकार्याचा हात देण्याचा आदर्श होता. मात्र, आताच्या या शहराजवळच्या जीवनात त्याचेही दर्शन विरळ होत आहे. त्या काळातील उत्सव पाहिलेल्या प्रकल्पग्रस्तांनी जुन्या आठवणींना उजाळा देताना सांगितले की, सह्याद्रीच्या कुशीत तिराळी डोंगर रंगाचा पायथ्याशी भौतिक सुख-सोयी पासून वंचित असलेले केंद्रे बुद्रुग, केंद्रे खुर्द, सरगवे, पाल, पाटये, आयनोडे, शिरंगे आदी गावांतील ग्रामस्थ पैशाच्या दुनियेतील गरिबी पण निसर्गाच्या सान्निध्यातील समृध्दीचे जीवन व्यथित करीत होते.

आर्थिक दुर्बलता असली तरी शेतीच्या जोरावर सामान्य जीवन जगणारे लोक धार्मिक उत्सव मात्र आनंदाने साजरे करायचे. गणेश चतुर्थी हा सण दुर्गम भागातील या लोकांसाठी खर्चिक असायचा. श्रावण महिना हा सणासुदीचा म्हणून साजरा करण्यात येतो. हा महिना चालू व्हायच्या आधी शेतीची कामे आटोपती घेतली जात असत. नागपंचमी, नारळी पौर्णिमा, गोकुळाष्टमी ते गणेश चतुर्दशी अशी सणांची लगबग चालू व्हायची. त्यावेळी बाजारपेठ जवळ नसल्याने मोठी गैरसोय होत असे.

पावसाळ्यात संपूर्ण महिन्याचा बाजार एकदाच केला जायचा. कारण, तुडुंब भरलेले नदी-नाले पार करून मैलो न मैल पायी चालत बाजारपेठेला जावे लागायचे. या लोकांसाठी तिराळी व भेडशी ही मुख्य बाजारपेठ होती. गावागावात एक दुकान असायचे; मात्र ते आठवड्यातून एकदा उघडले जायचे. गणेश चतुर्थीच्या आधी पंधरा दिवस तयारीला सुरुवात व्हायची. संपूर्ण घराची झाडलोट करण्यात येत असे. तेव्हा घरांची रंगरंगोटी करण्यासाठी आतासारखे रंग नसायचे. डोंगरातील लाल रंगाची माती (रेऊ) आणून घराच्या भिंती रंगविल्या जायच्या. भिंतीच्या खाली एक फूट शेणाचा पट्टा दिला जायचा.

त्या शेणाच्या पट्टयाने भिंतीला वेगळीच शोभा येत असे. गणपती पूजनाच्या जागी भिंतीवर वेगवेगळी आकर्षक चित्रे आवडीने काढली जायची. त्यासाठी मुले शाळेत वापरत असलेल्या रंग पेटीतील रंग भरले जायचे. घरातील मध्यभागी असलेल्या चौकात पताका लावून सजावट करण्यात यायची. काही लोक गणेश चतुर्थीचा बाजार गावात असलेल्या दुकानातून करायचे, तर काहीजण बाजारपेठेतून करायचे. आर्थिक परिस्थिती कमकुवत असल्याने गणेश चतुर्थीची संपूर्ण खरेदी २५० ते ३०० रुपयांची असायची.

बाजारपेठेतील किरकोळ सामान वगळता रानमेव्याने चतुर्थी साजरी केली जायची. पूजनासाठी लावण्यात येणारी गणेशाची मूर्ती ही पूर्णतः मातीची असायची. मूर्तीसाठी दिले जाणारे २०० ते ३०० रुपये ही किंमत तेव्हा खूप मोठी वाटायची; मात्र आताही किंमत हजारात गेली आहे. मूर्ती तयार करण्याच्या पद्धतीत देखील बदल झाले आहेत. अतिदुर्गम असलेल्या भागात त्याकाळी वाहनांचे साधन नसल्याने मूर्ती डोक्यावरून नेल्याशिवाय दुसरा पर्याय नव्हता. डोक्यावर घेऊन दोन ते तीन मैल चालत भरलेल्या नदी नाल्यातून मूर्ती आदल्या दिवशी घरी आणली जायची.

गावातील घरे लागूनच असल्याने मुलांचा गाजावाजा व फटाक्यांच्या करण्यात येणाऱ्या आतषबाजीमुळे वेगळाच रंग चढायचा. उत्सवकाळात भजनाचे सूर भक्तिरसाची धुंदी चढवणारे ठरायचे. पाचव्या दिवशी देवीचे पाणी आणण्यासाठी गावातील सर्व महिला एकत्र जमून गावापासून काही अंतरावर असलेल्या नदीवर जात असत. वाजत गाजत गौरीच्या पाण्याचे आगमन घरी होत असे. पाणी आणण्यासाठी गेलेल्या गावातील शेकडो महिला एका रांगेत चालत असतानाचे ते दृश्य व निसर्गाची उधळण, यामुळे वेगळाच माहोल तयार व्हायचा.

गणपती विसर्जन करण्यासाठी गावातील सर्वजण त्याच नदीपत्रावर जयघोष करीत जात असत. भरलेल्या नदीपात्रात गणेश मूर्तीचे विसर्जन करून पाच दिवसांच्या बाप्पाचा निरोप घेत असत. जुन्या गावातील ती मौजमजा आता राहिलेली नाही. बाजारपेठांच्या जवळ नव्याने वसलेल्या या गावात दोन घरांतील अंतर दुरावले आहे. सणासुदीतील तो उत्साह आता राहिलेला नाही. प्रत्येकजण आपल्या घरात गणेशाच्या मोठ्या मूर्तीची प्रतिष्ठापना करीत असतात.

मूर्ती वजनदार असल्याने डोक्यावरून आणणे शक्य होत नाही. त्यामुळे वाहनाच्या मदतीने मूर्ती घरी आणली जात आहे. साहजिकच मूर्ती डोक्यावरून आणण्याचा तो अनुभव आताच्या युवापिढीला आजमावता येत नाही. सणासुदीत करण्यात येणारे खाद्यपदार्थ, भाजीपाला आता सर्रास बाजारपेठेत येत असल्याने रान मेव्याकडे पूर्णतः दुर्लक्ष झाले आहे. आता पुनर्वसन केलेल्या ठिकाणी नदीपात्र नसल्याने गावातील महिला आपाआपल्या विहिरीवरच गौरीचे पाणी भरून आणत असतात.

गणपती विसर्जन करण्यासाठी गावाशेजारी बांधण्यात आलेल्या तळीवर मूर्तीचे विसर्जन करण्यात येते. त्यामुळे नदीपात्रात विसर्जन करण्याच्या अनुभवापासून देखील प्रकल्पग्रस्तांची आताची पिढी वंचित राहिली आहे. आता पैसा मोठा झाला असला, तरी सणासुदीची ती जुनी मजा सोन्याहून मौल्यवान होती, अशी भावना प्रकल्पग्रस्त व्यक्त करत आहेत.

आमच्या गावापासून दोन किलोमीटरवर दुसऱ्या गावात गणेश मूर्ती बनवली जायची. तेथून मूर्ती आणण्यासाठी आम्हाला पायी प्रवास करून जावे लागत असे. त्याठिकाणी जाताना वाटेत ओढा मिळायचा. पावसाच्या दिवसात त्या ओढ्याला मोठे पाणी असायचे; मात्र मूर्ती आणणे अत्यावश्यक असल्याने गावातील सर्वजण छाताडभर पाण्यात उतरून ओढा पार करून जायचो.

मूर्ती घोंगडीत लपेटून डोक्यावर घेऊन पुन्हा त्या ओढ्याच्या पाण्यातून घेऊन येत असायचो. ओढा पार करीत असताना डोकीवर मूर्ती घेतलेल्या व्यक्तीच्या दोन्हीं बाजूनी दोघेजण रहायचे. त्याचा तोल जाऊ नये याची पूर्णतः काळजी घेत ओढ्याच्या दुसऱ्या काठावर पोहोचवत असत आणि शेतातून चिखल तुडवीत तुडवीत काळजीपूर्वक मूर्ती घरी आणावी लागत असे.

- माणिकराव देसाई, प्रकल्पग्रस्त, तिलारी धरण

गणपतीची मूर्ती पूजन ज्या जागी केले जाते, त्या जागेच्या वर लाकडाची एक चौकट बांधली जाते. त्या चौकटीमध्ये रानातील वेगवेगळ्या झाडांची फुले, फळे बांधली जातात. त्याला माटोळी असे म्हटले जाते. जंगलातील हे सामान आणण्यासाठी गणेश चतुर्थीच्या आधी चार दिवस आम्हीं ग्रामस्थ रानात जाऊन ही सर्व फळ, फुलावळ गोळा करायचो.

वेगवेगळी झाडांची फुले, फळे भर पावसात शोधून काढावी लागायची. अन्य साहित्याची देखील जमवाजमव आधी करून ठेवावी लागत असे. परंतु, धरण झाल्याने गावांचे पुनर्वसन झाले. या ठिकाणी अशी लगबग नाही. जुन्या गावात जे जंगलातून आणावे लागायचे, ते आता बाजारपेठेत उपलब्ध होत आहे. त्यामुळे गणेश उत्सवाच्या त्या जुन्या आठवणी आता दरवळत आहेत.

- सुधीर नाईक, प्रकल्पग्रस्त, तिलारी धरण

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: मावळ विधानसभा मतदारसंघातून सुनील शेळके यांना ९९७० मतांची आघाडी

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: वांद्रे पूर्व विधानसभेत वरुण सरदेसाईंची मुसंडी

नुकतीच पार पडलेली ब्राइड टू बी पार्टी; आता बॅचलर पार्टीसाठी थायलंडला पोहोचली मराठी अभिनेत्री; पाहा झक्कास फोटो

Winter Diet: आहारात 'या' 5 पदार्थांचा करा समावेश, हिवाळ्यात राहाल निरोगी

Assembly Election 2024 Result : चर्चांना उधाण! विधानसभेचे एक्झिट पोल खरे ठरणार का? ठिकठिकाणी उमेदवारांच्या विजयाचे ‘बॅनर वॉर’

SCROLL FOR NEXT