हिंदू धर्मात पवित्र मानणारा गणेश चतुर्थीचा सण दोनच दिवसांवर आला आहे. घरोघरी बाप्पाच्या स्वागताची तयारी सुरू आहे. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वच लोक बाप्पा घरी येणार म्हणून उत्साही आहेत. महिलावर्गही वेगवेगळ्या पदार्थांच्या रेसिपी शोधल्या जातात.
गणपती बाप्पाला आवडणारे मोदक अनेक प्रकारे बनवले जातात. तुम्ही तांदळाचे,गव्हापासून मोदक बनवले असतील. पण, तुम्ही बाप्पासाठी आज वेगळ्या पद्धतीचे मोदक बनवू शकता. म्हणजे, बाप्पासाठी सत्यविनायकाच्या प्रसादाचे मोदक बनवा. ते कसे बनवायचे हे पाहुयात.
साहित्य -
सव्वा पावशेर खवा, सव्वा पावशेर पिठीसाखर, ७-८ वेलदोड्यांची पूड, सव्वा पावशेर बारीक रवा, पीठ भिजवण्याकरता दूध, २ टे. स्पून कडकडीत तेल, तळण्याकरता तूप
कृती
खवा हाताने मोकळा करून कढईत मंद आचेवर गुलाबी रंगावर भाजावा. कोमट असताना हाताने मळून पिठीसाखर मिसळावी व वेलदोडा पूड घालावी. हे सारण झाले.
सव्वा पावशेर बारीक रखा २ टे. स्पून कडकडीत तेलाचे मोहन घालून दूधात घट्ट भिजवावा व तासभर झाकून ठेवावा.
तासाभराने पीठ घट्ट वाटले तर दूधाच्या हाताने मळावे अथवा पाट्यावर वरवंट्याने कुटावे व छोट्या छोट्या लाट्या कराव्यात.
छोटी पुरी पोळपाटावर लाटून मुखऱ्या पाडाव्या व खव्याचे सारण भरून मोदकाचे तोंड बंद करावे. मंद आचेवर सर्व बाजूंनी गुलाबी रंगावर तळावेत.
महत्त्वाची टिप
मोदकाचे तोंड दुधाच्या हाताने बंद करावे. तळणीत मोदक फुटता कामा नये. नाहीतर खवा तळणीत पसरून बाकी मोदकावर काळपट डाग येतात. जर मोदक फुटला तर तूप परत फडक्याने गाळून बाकीचे मोदक तळावेत.
प्रसादाचे मोदक असल्याने अगदी लहान लहान करावेत म्हणजे प्रसाद म्हणून मोदक अर्धा करून देण्यापेक्षा सबंध मोदक दिलेला चांगला असतो.
(संबंधित रेसिपी सौ.जयश्री देशपांडे यांच्या हमखास पाककृती या पुस्तकातून घेण्यात आली आहे)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.