गणेश चतुर्थीला घरोघरी मोदकांची तयारी सुरू होते. आंबेमोहोर तांदळाची सुवासिक पिठी दळून आणली जाते. जास्तीचे नारळ आणून खोबरे खोवले जाते. चांगला पिवळाधमक गूळ, वेलदोडे, बेदाणे, काजू, बदाम, खसखस, जायफळ अशी शाही तयारी केली जाते. खमंग सारण तयार होतं. त्यात गुलकंद किंवा खवा घातला तर काय... सोने पे सुहागा! हे सारण फार कोरडं नको किंवा पातळही नको. मऊ पाहिजे, जेणेकरून मोदक फुटणार नाही. आफ्टर ऑल गणपतीबाप्पांचं आगमन होणार असतं. अन् पहिल्याच नैवेद्याला एकवीस उकडीच्या मोदकांचं ताट सजवायचं असतं! उकडीचे मोदक ही काही जाता-येता करायची गोष्ट नाही. त्यासाठी कौशल्य आणि चिकाटी लागते. आधी तांदळाच्या पिठीची उकड काढायची. किती पिठाला किती पाणी घ्यायचं, हे ठरलेलं असतं. त्यात थोडं तेल आणि मीठ घालायचं. चांगली दमदार वाफ काढायची. उलथन्याच्या टोकानं ढवळायची. गरम असतानाच ती मळून घ्यायची. उकडीचा उंडा तयार करून तूप लावलेल्या बोटांनी दाबत दाबत पातळ वाटी तयार करायची. त्यात सारण भरायचं. हळुवार हातांनी पाकळ्या तयार करायच्या. या पाच, अकरा, अगदी एकवीससुद्धा असतात. मग अंगठा आणि तर्जनी यांच्या मध्ये सगळ्या पाकळ्या एकत्र करायच्या. एकत्र करता करता त्यांना छान टोक आलं की नाक मिटायचं. म्हणजे त्या पाकळ्या चिमटायच्या. झाला मोदक तयार! मोदकपात्राच्या चाळणीत ओलं पातळ पांढरं स्वच्छ फडकं किंवा केळीच्या पानाचा तुकडा घालायचा आणि त्यावर मोदक ठेवून उकडायला लावायचे. केळीच्या पानामुळं एक वेगळाच स्वाद येतो. उकडलेला छान वास आला, की थोडे थंड होऊ द्यायचे. म्हणजे उकलत नाहीत. काही सुगरणी तर एकावर एक असे दोन किंवा तीन मोदक करतात. ती एक कला आहे.
पूर्वी घरोघरी तांब्याचं मोदकपात्र असे. त्यात बसणारी चाळणी आणि वर पक्ष्याच्या आकाराची मूठ असणारं झाकण. फार छान मोदक होतात यात. आता बाजारात मोदकाचे साचे मिळतात. नॉनस्टिक मोदकपात्र मिळतं. तयार मोदकही मिळतात. पण आपल्या हातानं सुबक मोदक करून ते छानशा चांदीच्या ताटात किंवा हिरव्यागार केळीच्या पानावर ठेवून त्यावर साजूक तूप अन् तुळशीपत्र घालून गणपतीला नैवेद्य दाखवताना मिळणारा आनंद मोजता नाही येणार. उकडीचे मोदक हे मोठं राजस पक्वान्न आहे. दिसायला देखणं, खायला मुलायम, पचायला हलकं आणि भरपूर ‘न्यूट्रीशनल व्हॅल्यू’ असणारं! सुकुमार मोदकावर चांगलं मोठा चमचाभर तूप घालून गरम गरम खावा. उकडीचा आणखी एक वेगळाच मस्त पदार्थ कोकणात करतात. उकड शेवेच्या सोऱ्यात घालून बाउलमध्ये शेवेचा चवंगा घालायचा. त्यावर नारळाचं दूध आणि गूळ घालून खायचं. यावर ओलं खोबरंही घालतात. ही चवही मोदकाच्या जवळ जाणारी; पण आपलं वेगळेपण राखणारी भन्नाट असते. गव्हाच्या कणकेच्या पारीत सारण भरून उकडूनही मोदक करतात. रव्या-मैद्याचे किंवा कणकेचे तळून खुसखुशीत मोदक करतात. यात सुक्या खोबऱ्याचं सारण असतं. हे तसेच खायचे. ज्यांना चावत नाही, त्यांनी दुधात भिजत घालून मऊ करून खावेत. मस्त लागतात. खव्याचे मोदक मिठाईच्या दुकानात मिळतात. त्यात मँगो, चॉकलेट, अंजीर, काजू असे फ्लेवर मिळतात. स्पेशल चॉकलेटचे मोदकही अलीकडे अनेक घरांत केले जातात. गणपती उत्सवाखेरीज मोदक केळवण, डोहाळेजेवण, मंगळागौर, रुखवताचं किंवा मातृभोजनाचं जेवण यावेळीही करतात.अंगारकी किंवा अगदी प्रत्येक संकष्टीला मोदक करणारेही खूप लोक आहेत. गणपतीवरच्या श्रद्धेला आणि हौसेला मोल नसतं, हेच खरं. मोदकाची उकड उरली, तर तिच्यात जिरे, मिरची, आलं, हिंग, कोथिंबीर, मीठ घालून चांगली मळावी. तिच्या छोट्या छोट्या पापड्या थापून तेलाचा हात लावून मोदकपात्रात उकडून घ्याव्यात. थंड झाल्यावर गोड लिंबाच्या लोणच्याबरोबर तूप किंवा तेल घालून खाव्यात. चटकदार लागतात. माझ्या नणंदेकडे मोदकाची आमटी करतात. कणकेची पारी करून त्यात ओलं खोबरं, कोथिंबीर, आलं, लसूण, मिरचीची जाडसर पेस्ट आणि थोडे भाजलेले तीळ घातलेलं सारण भरून त्याचे मोदक करायचे. तुरीच्या डाळीची जिरे-खोबरं वाटून घालून अगदी पातळ आमटी करायची. ती उकळत असताना हे मोदक त्यात सोडायचे. चांगले शिजले की भात, भाकरी, पोळी... कशाबरोबरही खायचे किंवा नुसतेच बाउलमध्ये घेऊन तूप सोडून खायचे. खूप चवदार आणि चमचमीत पदार्थ आहे हा. शिवाय करायला अगदी सोपा.
जपानमध्ये किंवा आपल्याकडे ईशान्य भारतात ‘मोमोज’ मिळतात. हेही मोदकच. कधी त्यात गूळ-खोबऱ्याचं सारण भरतात, तर कधी तिखट भाजीचं. कधी कचोरीचं सारण भरूनही मोमोज करतात. तांदळाच्या उकडीऐवजी मैद्याचेही मोमोज करतात. त्याला घातलेली मुरड इतकी देखणी असते, की पाहतच राहावं. कधी त्यावर फुला-पानाचं सुंदर डिझाईनही करतात. आपणही आपल्या मोदकांबाबत अशी सौंदर्यदृष्टी ठेवू शकतो. आमच्या गुजरात ट्रीपमध्ये एका हॉटेलमध्ये आम्हाला ‘पोटली सूप’ चाखायला मिळालं. पातळ मिक्स व्हेज सूपमध्ये कणकेचे तिखट सारण भरलेले मोदक सोडले होते. या मोदकांच्या पाकळ्या चिमटून बंद न करता त्याभोवती कणकेची पट्टी गुंडाळली होती. त्यामुळे ते एखाद्या थैलीसारखे दिसत होते. म्हणून हे पोटली सूप. हे सुद्धा फार चवदार लागते. नागपंचमीला केलं जाणारं दिंडं.. याची कृतीसुद्धा साधारण मोदकासारखी असते. फक्त त्यात पुरण भरतात. ही गरम-गरम दिंडं साजूक तूप घालून खायला छान लागतात. दर्दी खवैय्या हवा.सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.