नवी दिल्ली- २०२३ वर्ष अनेक अर्थाने महत्वाचे ठरले. जागतिक पातळीवर अनेक घडामोडी घडल्या ज्यांचा परिणाम भारतावर प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे पडला. कॅनडा आणि अमेरिकेने केलेले गंभीर आरोप यामुळे भारताचे परराष्ट्र धोरण गाजलं.
तसेच, इस्राइल आणि हमासमध्ये सुरु झालेलं युद्ध केवळ जागतिकच नाही तर भारताच्या धोरणांवर दूरगामी परिणाम करणारं ठरणार आहे. भारताच्या दृष्टीकोणातून जागतिक पातळीवर कोणत्या पाच घटना महत्त्वाच्या होत्या हे आपण पाहूया... ( 5 major global international events news in 2023 which will have a direct and indirect impact on India)
कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांनी खलिस्तानी नेता हरदिप सिंग निज्जर याची हत्या भारतीय गुप्तचर यंत्रणांनी केल्याचा गंभीर आरोप केला. त्यामुळे एकच खळबळ उडाली होती. भारताने ट्रुडो यांनी केलेले आरोप फेटाळून लावले. त्यानंतर कॅनडियन नागरिकांना व्हिसा बंदी करण्यात आली. शिवाय भारतात असलेल्या कॅनडाच्या राजदुतांची संख्या कमी करण्यास सांगण्यात आलं.
काही दिवसांनी भारत सरकारने व्हिसा बंदी उठवली आहे. पण, भारत-कॅनडा संबंध सध्या ताणले गेलेले आहेत. निज्जर याची हत्या भारतीय यंत्रणेकडून झाल्याची माहिती अमेरिकेनेच कॅनडाला पुरवली असल्याचं सांगितलं जातं.
कॅनडानंतर अमेरिकेनेही भारत सरकारवर गंभीर आरोप केला. अमेरिकन-कॅनडियन नागरिक गुरपतवत सिंग पन्नू याच्या हत्येचा कट एका भारतीय व्यक्तीने आणि सरकारी अधिकाऱ्याने रचल्याचा आरोप करण्यात आला.
अमेरिकेच्या आरोपांना भारताने गांभीर्याने घेतले आहे. पंतप्रधान मोदी म्हणालेत की, पुरावे मिळाल्यास याबाबत पुढील कार्यवाही करु. आरोपी निखील गुप्ता हे सध्या झेक रिपब्लिक देशात तुरुंगवासात आहेत.
अशा काही घटनांमुळे भारत आणि अमेरिकेच्या संबंधात बिघाड होऊ शकत नाही, असं मोदी म्हणाले होते. मात्र, अध्यक्ष ज्यो बायडेन यांनी प्रजासत्ताक दिनानिमित्त भारतात येण्याचे टाळलं आहे. त्यादृष्टीने बायडेन यांच्या न येण्याकडे पाहिलं जात आहे.
७ ऑक्टोंबर रोजी हमासने इस्राइलवर हल्ला केला. जवळपास ५ हजार मिसाईल हमासकडून डागण्यात आल्याचं सांगितलं जातं. हमासच्या या हल्ल्यात १२०० पेक्षा जास्त इस्राइली नागरिकांना मृत्यू झाला, तर जवळपास २३० जणांना हमासच्या अतिरेक्यांकडून बंधक बनवण्यात आलं.
इस्राइलने हमासला दिलेले प्रत्युत्तर अधिक भीषण आहे. इस्राइलने हमासवरील हल्ला अजूनही सुरुच ठेवलाय. बेंजामिन नेतान्याहू यांच्या वक्तव्याकडे पाहिल्यास हे युद्ध थांबण्याचे चिन्ह नाहीत. या हल्ल्यात आतापर्यंत २० हजारांपेक्षा जास्त गाझातील लोकांचा मृत्यू झालाय.
भारताने सुरुवातील हमासच्या हल्ल्यांचा निषेध केला होता. त्यानंतर इस्राइलला चर्चेतून मार्ग काढण्याचे आवाहन केले आहे. भारताने इस्राइल आणि पॅलेस्टाईनबाबतही आपली भूमिका कायम ठेवली आहे. मात्र, या युद्धाचा भारतावरील परिणाम आता दिसून येऊ लागला आहे.
गुजरातच्या किनारपट्टीलगत एका व्यापारी जहाजावर ड्रोन हल्ला करण्यात आलाय. तसेच लाल समुद्रात व्यापारी जहाजांना हुथी बंडखोर लक्ष्य करत आहेत. त्याचा परिणाम जागतिक व्यापारावर होताना दिसत आहे. त्याचा फटका भारताला बसू लागला आहे. इंधन आणि इतर काही वस्तूंच्या किंमती येत्या काळात आणखी वाढण्याची शक्यता आहे.
मालदिवमध्ये सत्ताबदल झाला असून चीन समर्थक मोहम्मद मुइझू हे सत्तेत आले आहेत. भारत विरोधी नेता म्हणून मुइझू यांना ओळखलं जातं. सत्तेत आल्यानंतर त्यांनी भारताने मालदिवमधून सैन्य परत बोलवावं अशी औपचारिक विनंती केंद्र सरकारकडे केलीये.
तसेच त्यांनी 'वॉटर सर्वे' करार बंद करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. त्यांच्या कार्यकाळात चीनला जास्त प्राधान्य मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेजारी राष्ट्र विरोधी भूमिकेत गेल्याचा भारताला तोटा होऊ शकतो.
दिल्लीत आयोजित करण्यात आलेली जी-२० परिषद अनेक अर्थाने भारतासाठी महत्त्वाची ठरली. जी-२० परिषदेचे अध्यक्षपद पहिल्यांदाच भारताकडे आले होते. जी-२० परिषदेमध्ये आफ्रिकन युनियनचा देखील समावेश करण्यात आला आहे. या परिषदेत जागतिक नेत्यांचे एकमत करण्यात भारताला यश आले.
ग्लोबल साऊथ देशांचं नेतृत्त भारत करु शकेल असा आशावाद या परिषदेतून निर्माण झाला आहे. भारताच्या अलिप्ततावाद भूमिकेसारखीच ही संकल्पना आहे. भारत-पश्चिम आशिया- यूरोप इकॉनॉमिक कॉरिडोर बनवण्यास देखील या परिषदेत मंजुरी मिळाली आहे. चीनच्या बेल्ट अँड रोड इनेशिएटिव्हला हे समांतर असणार आहे. (Latest Marathi News)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.