इस्लामाबाद : पाकिस्तानमध्ये सरकार स्थापनेचा पेच सुटण्याची चिन्हे असून निवडणुकीमध्ये सर्वांत मोठा पक्ष ठरलेल्या पाकिस्तान मुस्लिम लीगने पंतप्रधानपदासाठी शाहबाज शरीफ यांचे नाव जाहीर केले आहे. देशात मंगळवारी रात्रीपासूनच घडामोडींना वेग येऊन पाकिस्तान मुस्लिम लीग, पाकिस्तान पीपल्स पार्टी आणि मुत्तहिदा कौमी मूव्हमेंट पाकिस्तान या पक्षांनी सरकार स्थापण्यासाठी आघाडी करण्याचा निर्णय घेतला आहे. या तिन्ही पक्षांना मिळालेल्या जागांची संख्या बहुमतासाठी आवश्यक असलेल्या १३३ पेक्षा अधिक होत असल्याने या देशात लवकरच सरकार स्थापन होण्याची शक्यता आहे.
पाकिस्तानमध्ये आठ फेब्रुवारीला झालेल्या निवडणुकीत मतदारांनी कोणत्याही पक्षावर पूर्ण विश्वास दाखविला नाही. त्यामुळे त्रिशंकू अवस्था निर्माण झाली होती. इम्रान खान यांच्या पक्षाचे अपक्ष म्हणून लढलेले १०१ उमेदवार निवडून आले असले तरी पक्ष म्हणून ते एक नव्हते. त्यांचेही सरकार स्थापनेसाठी प्रयत्न सुरू असतानाच काल (ता. १३) रात्री शाहबाज शरीफ, ‘पीपीपी’चे असिफ अली झरदारी आणि ‘एमक्यूएम’चे खालिद मकबूल सिद्दीकी यांनी बैठक घेत सरकार स्थापनेबाबत चर्चा केली. या चर्चेनंतर एकूण सहा पक्षांनी आघाडी करण्याचा निर्णय घेण्यात आला.
त्यानुसार, पाकिस्तान मुस्लिम लीगला पंतप्रधानपद देण्याचे मान्य करण्यात आले.
पाकिस्तान मुस्लिम लीगचे नेते आणि आतापर्यंत तीन वेळा पंतप्रधानपद सांभाळलेले नवाज शरीफ यांनाच पुन्हा नेतृत्वाची संधी मिळण्याची शक्यता व्यक्त होत असतानाच शरीफ यांनी आज अचानक त्यांचे बंधू शाहबाज शरीफ यांच्या नावाची शिफारस केली. त्याचवेळी प्रांतिक निवडणुकीत पक्षाला यश मिळालेल्या पंजाब प्रांतात मुख्यमंत्री म्हणून नवाज शरीफ यांनी त्यांची कन्या मरियम शरीफ यांच्या नावाचीही शिफारस केली आहे. निवडणुकीपूर्वी शाहबाज शरीफ यांच्याकडेच देशाचे पंतप्रधानपद होते.
पाकिस्तान मुस्लिम लीग (नवाज गट), पाकिस्तान पीपल्स पार्टी, मुत्ताहिदा कौमी मूव्हमेंट पाकिस्तान, पाकिस्तान मुस्लिम लीग-कैद, इस्तेकाम ए पाकिस्तान पार्टी आणि बलुचिस्तान अवामी पार्टी यांनी मिळून सत्ता स्थापन करण्याचा निर्णय घेतला असून सर्वांनी मिळून १५२ जागा जिंकल्या आहेत. पाकिस्तानच्या नॅशनल असेंब्लीच्या २६६ जागांसाठी निवडणूक झाली असली तरी महिलांसाठी राखीव ६० आणि अल्पसंख्याकांसाठी राखीव १० जागा मिळून संसद सदस्य संख्या ३३६ इतकी आहे. त्यामुळे दोन तृतियांश बहुमतासाठी या आघाडीला २२४ जागांची आवश्यकता आहे.
गैरप्रकार झाल्याने अनेक उमेदवार निवडून आले नसल्याचा आरोप करणाऱ्या इम्रान खान यांना आणखी धक्के बसत आहेत. त्यांच्या पाकिस्तान तेहरीके इन्साफ पक्षाने पुरस्कृत केलेल्या आणि विजयी झालेल्या उमेदवारांपैकी सात जणांनी नवाज शरीफ यांच्या पक्षाला पाठिंबा दिला आहे. त्यामुळे आमची मते चोरली जात असल्याचा आरोप इम्रान खान यांनी केला आहे. (Latest Marathi News)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.