Bolivia Coup Attempt  
ग्लोबल

Bolivia Coup Attempt : बोलिव्हियात सत्ता उलथविण्याचा प्रयत्न! सैनिक जनरलना अटक; अध्यक्षीय प्रासादात रणगाडे, सैन्य घुसले

Bolivia Coup Attempt News : अर्थात सरकार ताब्यात घेण्याच्या प्रयत्न अपयशी ठरल्यानंतर जनरल कमांडर जुआन जोस झुनिंगा यांना पोलिसांनी अटक केली.

सकाळ वृत्तसेवा


ला पाज (बोलिव्हिया), ता. २७ (पीटीआय): आर्थिक अडचणीचा सामना करणाऱ्या बोलिव्हियात सैनिकांकडून सत्ता उलथण्याचा अयशस्वी प्रयत्न झाला.दक्षिण अमेरिकी देश बोलिव्हियाची राजधानी ला पाज येथील अध्यक्षीय प्रासादालयावर बुधवारी रणगाड्यांसह सैनिकंनी हल्ला करत मुख्य दरवाजा तोडण्याचा प्रयत्न केला. अध्यक्ष लुईस आर्से यांना ताब्यात घेण्याचा अयशस्वी प्रयत्न केला. तीन तासांच्या आतच बंडखोरांना अटक करण्यात आली.

बोलिव्हियाच्या दूरचित्रवाणीवरून त्याचे प्रक्षेपण करण्यात आले. सूत्राने दिलेल्या माहितीनुसार, बोलिव्हियाच्या सुरक्षा दलाने मुख्य चौकाला घेरले आणि नंतर सैनिकी वाहने अध्यक्षांच्या निवासस्थानाकडे रवाना झाले. यावेळी सैनिकांनी भवनात घुसण्याचा प्रयत्न केला.

अध्यक्षीय भवनात मंत्र्यांच्या गराड्यात अडकलेले अध्यक्ष आर्से यांनी व्हिडिओ जारी करत म्हटले, ‘‘ देश सत्ता उलथून टाकण्याच्या प्रयत्नांचा मी सामना करत आहे. कासा ग्रांड येथे सैन्यांकडून होणाऱ्या दमनशाहीचा सामना करण्यासाठी आम्ही सक्षम आहोत आणि बोलिव्हियातील जनतेला संघटित करण्याची गरज आहे. ’’

अर्थात सरकार ताब्यात घेण्याच्या प्रयत्न अपयशी ठरल्यानंतर जनरल कमांडर जुआन जोस झुनिंगा यांना पोलिसांनी अटक केली. काल सकाळी सैनिकी बळावर सत्ता उलथून टाकण्याचा प्रयत्न केल्यानंतर सायंकाळी सशस्त्र वाहने आणि सैनिक हे ला पाज येथील अध्यक्षांच्या भवनातून माघारी फिरले. अध्यक्ष आर्से यांनी या प्रकाराचा निषेध केला आहे आणि नागरिकांनी ऐक्य दाखवत लोकशाहीचे संरक्षण करावे, असे आवाहन केले. त्यांनी नव्या सैनिकी प्रमुखांची घोषणा केली आणि त्यांनी सैनिकांना परत जाण्याचे आवाहन केले.

आर्से म्हणाले, मी आपला कर्णधार असून मी आपल्या सैनिकांना माघारी जाण्याचा आदेश देतो आणि हा आदेश मोडण्याची परवानगी कदापि देणार नाही. तत्पूर्वी सैनिकांनी जनरल झुनिंगा यांच्या नेतृत्वाखाली सरकारी मुख्यालयाबाहेर प्लाझा मुरिलोकडे कुच केली आणि जुने सरकारी मुख्यालय, पॅलेसियो क्युमाडो येथे जबरदस्तीने प्रवेश केला. लष्करीशाहीच्या बळावर सत्ता बदलण्याचा प्रयत्न अपयशी ठरल्यानंतर आर्से यांनी जनतेचे आभार मानले. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर बोलिव्हियाच्या अध्यक्षांनी सैनिकांच्या काही गटांनी नियम मोडल्याबद्दल निषेध व्यक्त केला आणि लोकशाहीचा आदर करायला हवा, अशी अपेक्षा केली. नवनियुक्त सैन्यप्रमुख जोस सांचेझ यांनी सर्व सैनिकांना माघारी जाण्याचे आदेश दिले आणि सध्या रस्त्यावर जे घडत आहे, ते कोणालाही पाहण्याची इच्छा नाही, असे ते म्हणाले.

पुढच्या वर्षी सार्वत्रिक निवडणूक
२०२५ मध्ये बोलिव्हियात सार्वत्रिक निवडणूक होत असताना तणाव वाढला आहे. डाव्या विचारांचे माजी अध्यक्ष इव्हो मोरालेस यांनी आपले जुने सहकारी आर्से यांच्याविरुद्ध निवडणूक लढण्याची तयारी केली आहे. त्यामुळे सत्ताधारी समाजवादी पक्षात फूट पडण्याची स्थिती निर्माण झाली आहे. शिवाय राजकीय अस्थिरतेचे ढग निर्माण झाले आहेत. दुसरीकडे बोलिव्हियातील असंख्य लोकांना मोरालेस नकोत. त्यांनी २००६ ते २०१९ या काळात सत्ता गाजविली आहे. मात्र त्यांना तीव्र विरोध केल्यानंतर काढून टाकण्यात आले. त्यांच्या जागी परंपरावादी हंगामी सरकार स्थापन केले. २०२० मध्ये अर्से यांनी निवडणूक जिंकली.

अध्यक्षांनीच हल्ला करायला सांगितल्याचा आरोप
सैनिकी कमांडरला अटक करण्यापूर्वी त्यांनी आपल्याला अध्यक्ष आर्से यांनीच हल्ला करण्यास सांगितले, असा दावा केला. ते म्हणाले, मी अध्यक्षांशी देशाच्या स्थितीवर चर्चा केली आणि हा आठवडा सरकारसाठी महत्त्वाचा असल्याचे ते मला म्हणाले होते. अशावेळी जनतेचा पाठिंबा मिळवणे गरजेचे आहे. हल्ला केल्यास लोकप्रियता वाढेल, असे ते मला म्हणाले. परंतु त्या दाव्याला दुजोरा मिळू शकला नाही. मात्र माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार जनरल झुनिंगा यांना मागच्याच आठवड्यात पदावरून हटविले. त्यांनी माजी अध्यक्ष मोरालेस यांच्याबाबत आक्षेपार्ह मत मांडले होते. त्यामुळे सरकारने त्यांना हटविण्याचा निर्णय घेतला. अध्यक्षाच्या निवासस्थानात सैन्य घुसल्यानंतर काही काळ जुनिंगा हे पॅलेसमध्ये दिसले. त्यांच्या सुरक्षेसाठी बुरखाधारी गार्ड होते. मात्र जनरलना अटक केल्यानंतर सरकारने या घटनेत सामील असलेल्या अन्य अधिकाऱ्यांची चौकशी सुरू केली आहे.
--------

२०० वर्षांत १९० वेळा सत्ता उलथवण्याचा प्रयत्न
बोलिव्हियात सत्ता उलथविण्याचा प्रयत्न नवा नाही. गेल्या २०० वर्षांत १९० वेळेस सत्ता उलथून टाकण्याचा प्रयत्न केला आहे. बोलिव्हियात १.२० कोटी जनता आहे. बोलिव्हियाची अर्थव्यवस्था ढासळत चालली आहे. अध्यक्ष आर्से यांनी लोकशाहीविरोधात अनेक निर्णय घेतले असल्याचा आरेाप केला जात आहे. त्यांनी विरोधी पक्ष नेते लुईस फर्नांडो आणि माजी अध्यक्ष जिनिन आनेज यांना अटक केली. या विरोधकांना सोडण्याची मागणी निलंबित कमांडरने उठावाच्या वेळी केली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune News : राहुल गांधी यांनी दोन डिसेंबरला न्यायालयात हजर राहावे; पुणे प्रथमवर्ग न्यायालयाचा आदेश

Pune News : मविआच्या काळात महाराष्ट्राच्या विकासाचा वेग मंदावला; केंद्रीय मंत्री गजेंद्र सिंह शेखावत

IPL Auction साठी पर्थ कसोटीवेळीच 'हा' कोच संघाला सोडणार अन् ऑस्ट्रेलियातून सौदी अरेबियात पोहचणार

Paranda Assembly Election : महाराष्ट्राच्या विधानसभेमधून निधी आणण्यासाठी धमक लागते - प्रा. डॉ. तानाजी सावंत

Parli Assembly constituency 2024 : परळी विधानसभेच्या इतिहासात पहिल्यांदाच: ना सभा,ना रँली गाठीभेटीने संपला परळी विधानसभेचा प्रचार

SCROLL FOR NEXT