खारकिव्ह : रशियाला क्रिमियाशी जोडणाऱ्या कर्च रेल्वे पुलावर शनिवारी सकाळी सहा वाजता शक्तीशाली बाँबस्फोट झाला. यानंतर आग लागल्याने पुलाचा काही भाग कोसळला. स्फोटके लादलेल्या ट्रकने हा स्फोट झाला. युक्रेनबरोबर युद्ध सुरू असताना त्यांचा भूभाग असलेल्या क्रिमियाचा ताबा रशियाने नुकताच घेतला आहे. रशियाने जबरदस्तीने केलेल्या या विलिनीकरणाचे प्रतीक म्हणून हा पूल असल्याचे मानले जाते. युद्धसामग्रीचा पुरवठा करण्यासाठी हा पूल रशियासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांचा काल ७० वा वाढदिवस साजरा झाला. त्यानंतर लगेचच आज झालेला हा स्फोट त्यांच्यासाठी चपराक असल्याचे मानले जात आहे. रशियाच्या राष्ट्रीय दहशतवादविरोधी समितीने म्हटले आहे, की एका ट्रक बाँबच्या स्फोटाने इंधन घेऊन जाणाऱ्या रेल्वेच्या सात बोगींना आग लागली. यामुळे रेल्वे व रस्ते अशा दोन भागात विभागलेल्या या पुलाचा काही भाग कोसळला. या स्फोटाबद्दल त्यांनी कोणावर आरोप केला नाही.
युक्रेनच्या अध्यक्षीय कार्यालयातील मुख्य सल्लागार मायखायलो पोडोल्याकी यांनी स्फोटानंतर ट्विट करीत रशियाला इशारा दिला आहे. ते म्हणाले, ‘‘क्रिमिया पूल सुरुवात आहे. युक्रेनची चोरलेली प्रत्येक वस्तू रशियाला परत करावी लागेल. प्रत्येत अवैध गोष्ट नष्ट होईल. ज्याचा ताबा रशियाने घेतला, ते सर्व नष्ट केले जाईल.’’
क्रिमियाच्या या पुलावर आज सकाळी झालेल्या या स्फोटाचा आवाज अनेक किलोमीटरपर्यंत ऐकू आल्याची माहिती स्थानिक नागरिकांनी दिली. स्फोटानंतर सोशल मीडियावर एक व्हिडिओही व्हायरल झाला. त्यावेळी तेथून जाणाऱ्या मालवाहू रेल्वेवरील इंधनाच्या टाक्यांना आग लागली. रेल्वे पुलाशेजारील रस्ते वाहतुकीचा पुलाचा काही भाग समुद्रात कोसळला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.