लंदन : युक्रेनच्या दोन राज्यांना स्वतंत्र घोषित केल्यानंतर फुटीरतावाद्यांच्या मदतीसाठी रशियाने सैन्य पाठवण्याची घोषणा केली. यामुळे रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन हे अमेरिका आणि युके यांच्यासह इतर सहकारी देशांच्या रडारवर आले आहेत. ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी रशियाच्या ५ बँका आणि ३ अब्जाधीशांवर बंदी घातली आहे. बंदी घालण्यात आलेल्या बँकांमध्ये रोसिया, आय़एस बँक, जनरल बँक, प्रॉम्सव्याज बँक, ब्लॅक सी बँक यांचा समावेश आहे.
तीन अब्जाधीशांवरही कारवाई करण्यात आली आहे. यामध्ये गेनेडी टिमचेंको, बोरिस रोटेनबर्ग आणि आयगर रोटेनबर्ग यांची संपत्ती जप्त केली आहे. त्यांना ब्रिटनमध्ये प्रवेश करण्यापासून रोखलं जाणार आहे. जॉन्सन यांनी केलेल्या घोषणेनंतर काही खासदारांनी म्हटलं की, इतकी कारवाई पुरेशी नाही. यावर जॉन्सन यांनी परिस्थिती बिघडल्यास आणखी निर्बंध लादले जातील असंही म्हटले.
अमेरिकेनं आता फुटिरतावाद्यांच्या ताब्यात असलेल्या लुहान्स्क आणि डोनेत्स्कमध्ये अमेरिकन नागरिकांच्या व्यवसायावर निर्बंध लादले आहेत. अद्याप काही अमेरिकन कंपन्या या क्षेत्रात सक्रीय आहेत. जर रशियाने हल्ल्याची तयारी केली तर कडक निर्बंध लागू केले जातील असंही अमेरिकेनं म्हटलं आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांनीही दोन बँकांविरोधात बंदीची कारवाई केली. यात त्यांनी रशियाविरोधात निर्बंध हा पहिला टप्पा असल्याचं म्हटलं. तर बायडेन यांनी दोन मोठ्या बँका व्हीईबी आणि रशियन लष्करी बँकेशी संबधित व्यापारावर बंदी घालणं आणि रशियन अर्थव्यवस्थेला होणार अर्थपुरवठा बंद करण्याबाबतची घोषणा केली होती.
रशियाला आर्थिकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाची असलेली रशिया व जर्मनीदरम्यानची नॉर्ड स्ट्रिम २ पाइनलाइन योजना अनिश्चित काळासाठी स्थगित केल्याचे घोषणा जर्मनीचे चॅन्सलर ओलाफ शूल्झ यांनी मंगळवारी केली. नॉर्ड स्ट्रिम २’पाइपलाइनची लांबी एकूण बाराशे किलोमीटर इतकी आहे. बाल्टिक सागरामार्गे पश्चिम रशियातून उत्तर-पूर्व जर्मनीपर्यंत हा मार्ग असून या योजनेवर ८३ हजार कोटी रुपये खर्च झाला आहे. गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये काम पूर्ण झाले असून अद्याप काही मंजुरी मिळणे बाकी असल्याने उद्घाटन झालेलं नाही. जर्मनीला रशियाकडून ५५ अब्ज घन मीटर नैसर्गिक वायूचा पुरवठा होतो. सध्या रशियाची या क्षेत्रातील बलाढ्य कंपनी गॅझप्रोमकडे प्रकल्पाची मालकी आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.