कॅलिफोर्नियाला अमेरिकेतील `गोल्डन स्टेट’ म्हणतात. जगाच्या अनेक देशातील तरूणांची धाव असते, ती सिलिकॉन व्हॅली असलेल्या सॅन होजे, पालो अल्टो, माऊन्टन व्ह्यू या उपनगरांकडे. आधुनिक तंत्रज्ञान क्षेत्रातील सुमारे शंभरापेक्षा अधिक कंपन्या कॅलिफोर्नियात आहेत. त्यातील प्रमुख होत, वॉल्ट डिस्ने, टाको बेल, गॅप, सेफवे, ओरॅकल, वेल्सफारगो, अएपल, इन्टेल, गुगल, रॉस, सिस्को, हेवेट पॅकार्ड, शेवरॉन, टेस्ला, पांडा एक्सप्रेस, द चीजकेक फॅक्टरी, क्वालकॉम, पॅसिफिक गॅस अँड इलेक्ट्रिक कंपनी, अडोब, फेसबुक, सेफोरा, लेव्ही स्ट्रास, मेटा, व्हिसा आदी. कॅलिफोर्निया राज्याची लोकसंख्या सुमारे 4 कोटी आहे. तथापि, जुलै 2020 ते जुलै 2021 दरम्यान ती 1 लाख 73 हजाराने कमी झाली. एकूण लोकसंख्येपैकी निरनिराळ्या देशातून आलेले 1 कोटी 10 लाख लोक आज कॅलिफोर्नियात राहात आहेत.
`लॉस एन्जेलेस टाइम्स’ नुसार लोकसंख्या कमी होण्याची तीन प्रमुख कारणे आहेत. स्थलांतरणाचे बदलते प्रवाह, घटणारे जन्मप्रमाण व कोविड-19 ची साथ ही ती होत. कोविड साथीमुळे 55 हजार लोक मरण पावले. तेथे येणाऱ्या आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांची संख्या 53 हजाराने घटली. अन्य राज्यातून कॅलिफोर्नियात येणाऱ्यांची संख्या 27 हजारांनी घटली. कॅलिफोर्निया राज्याच्या अर्थ खात्याचे प्रमुख वॉल्टर श्वार्म यांच्या मते, ``गेल्या दहा ते पंधरा वर्षात कॅलिफोर्नियाच्या प्रगतीला तेथे स्थलांतर केलेले निरनिराळ्या क्षेत्रातील अत्यंत गुणवान, उच्चशिक्षित व तज्ञ जबाबादार आहेत. कॅलिफोर्नियाच्या मध्य खोऱ्यातील 20 कौन्टीमध्ये तसेच सॅक्रॅमॅन्टो खोरे व इनलँड एम्पायर (दक्षिण कॅलिफोर्नियातील लॉस एन्जेल्सला लागून असलेले रीव्हर साईड व सॅन बर्नार्डिनो) येथे लोकसंख्या वाढली. परंतु, गोल्डन गेट पुलानजिकच्या नऊ कौन्टीमधील लोकसंख्या घटत आहे.
घरांच्या वाढणाऱ्या व अव्वाच्या सव्वा झालेल्या किमती, सॅन फ्रान्सिस्कोमधील उंचावलेले राहाणीमान, प्रत्येक गोष्टीसाठी मोजावी लागणारी किंमत तसेच, कोविडच्या काळात काम करण्याची कमालीची बदलेली पद्धत ही महत्वाची कारणे होत. प्रत्येकाने आता ऑफिसमध्ये जाऊनच काम करण्याची गरज उरलेली नाही. कोविड साथीच्या काळात घरात बसून कोट्यावधी लोक काम करू लागले. कंपन्यांची मोठमोठी कार्यालये अथवा इमारतीची असण्याची गरज वेगाने कमी झाली व होत आहे. कर्मचारी घऱातून काम करीत असेल, तर कंपनीचे वीज, घऱभाडे व इंधन आदींवरील होणारा खर्च कमी होतो. जगाच्या कोणत्याही कोपऱ्यात असलेली व्यक्ती केवळ इंटरनेटची सोय असेल, तर कुठूनही काम करू शकते. हे शक्य झाल्यानेही लोक कॅलिफोर्नियातून टेक्सास, ओरेगॉन, वॉशिंग्टन, एरिझोना, नेवाडा, मेक्सिकोच्या बाजा कॅलिफोर्निया येथे स्थलांतरित होत आहेत. तेथे घरांच्या किंमती कमी असून, राहाणीमान खिशाला परवडणारे असल्याने लोक स्थलांतर करू लागलेत. उलट, कॅलिफोर्नियात सर्वसाधारण दोन खोल्यांच्या घराला महिन्याला 2800 डॉलर्स घरभाडे असून, राष्ट्रीय प्रमाण 1800 डॉलर्स आहे. लॉस एन्जेल्समध्ये दोनतृतीअंश जमिनीनर बांधण्यात आलेली घरे एक किंवा दोन खोल्यांची असून भाडी वाढतं आहेत. कॅलिफोर्नियामध्ये अधुनमधून होणाऱ्या आंदोलनांमुळे जनजीवन विस्कळीत होते, हे एक कारण होय. तेथे घरून काम करणाऱ्या लोकांचे प्रमाण 43 टक्के झाले आहे. बेघरांची संख्या दीड लाखावर पोहोचलीय. त्यात भर पडली आहे, ती मादकपदार्थांच्या आहारी जाणाऱ्या वाढत्या लोकसंख्येची.
`अमेरिकन कम्युनिटी सर्व्हे’ नुसार 2007 ते 2016 दरम्यान 50 लाख लोक कॅलिफोर्नियात आले व 60 लाख लोक कॅलिफोर्निया सोडून गेले. गेल्या वर्षी 7 लाख लोक कॅलिफोर्निया सोडून गेले. ज्या कुटुंबात अधिक मुले आहेत, ते शिक्षणावरील वाढणाऱ्या खर्चामुळे सॅनफ्रान्सिस्को, लॉस एन्जेल्स, सॅन मातेओ, सॅन्टा क्लारा सोडून जात आहेत. वाढणारी गुन्हेगारी, अव्वाच्या सव्वा कर ( सध्या 13.3 टक्के आयकराचा दर असून तो 17 टक्के करावा, अशी मागणी होत आहे)
राजकीय नेत्यांचे लक्ष केवळ मोठ्या शहरांच्या विकासाकडे आहे. त्यांना लागून असलेल्या उपनगरांकडे त्यांचे लक्ष नसल्याने त्यांच्या पायाभूत रचनांकडे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे त्या भागातील नागरी सेवा महाग झाल्यात. बेरोजगारी, व्यक्तिगत सुरक्षा, सामाजिक व आर्थिक समस्या, वारंवार जंगलांना लागणाऱ्या आगी, त्यातून होणारी मालमत्ता व मनुष्यहानी यांचा परिणाम होत होतोय. उदा. ऑक्टोबर 2020 पर्यंत कॅलिफोर्नियामध्ये 8500 आगी लागल्या. त्यातून 20 लाख हेक्टर जमीन जळून गेली. हजारो घरे खाक झाली. या सर्व समस्यांमुळे ``चला गावांकडे’’ हा विचार जनतेत बळावला आहे.
उलट, भारतातील मुंबई, कोलकता, दिल्ली, बेंगरूळू, चेन्नई ही प्रमुख शहरे व इंदूर, भोपाळ, पुणे, नाशिक वा प्रत्येक राज्यात वेगाने वाढणाऱ्या शहरांना गावाकडून येणाऱ्या लोकसंख्येच्या लोंढ्यांची समस्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे, शहरांच्या पायाभूत रचनेवर कमालीचा ताण पडत आहे. घरे, रस्ते, पाणी आदी जीवनावश्यक गोष्टींची दुर्मिळता भासत आहे. याचे कारण ग्रामीण भागात गेल्या अर्ध शतकात शेती शिवाय रोजगाराची अन्य साधने उपलब्ध झाली नाही. रस्ते, शिक्षणसंस्था, आरोग्य क्षेत्रातील रूग्णालय, डॉक्टर्स आदी सोयी पोहोचल्या नाही. त्यामुळे, कॅलिफोर्नियातील उलट्या स्थलांतरणासारखी स्थिती भारतात येत्या काही दशकात तरी निर्माण होण्याची शक्यता दिसत नाही
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.