नवी दिल्ली- चीनबरोबरील तणाव कमी करण्यासाठी भारताकडून सातत्याने प्रयत्न केले जात आहेत. पण चीन मात्र आपल्या अडेलतट्टू भूमिकेवर ठामच असल्याचे दिसून येत आहे. चीनने पूर्व लडाखमधील हॉट स्प्रिंग्स, गोगरा आणि देपसांग येथील तणाव असलेल्या भागातून सैनिकांना मागे हटवण्यास नकार दिला आहे. मागील आठवड्यात दोन्ही देशांमध्ये 11 व्या चर्चेच्या फेरीदरम्यान 13 तासांपर्यंत बैठक चालली. यामध्ये चीनने या परिसरातून मागे हटण्यास नकार दिला आहे.
'हिंदुस्थान टाइम्स'ने याबाबतचे वृत्त दिले आहे. एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, पिपल्स लिबरेशन आर्मीने (पीएलए) गोगरा-हॉट स्प्रिंग्स परिसरात एप्रिल 2020 पूर्वीच्या स्थितीवर परत जाण्यास नकार दिला आहे. परत जाण्याऐवजी त्यांनी भारतीय सैन्यदलाला विचार करण्यासाठी काही प्रस्ताव दिले आहेत. या परिसरातून सैनिकांना संपूर्णपणे मागे हटवण्यासाठी आणखी काही वेळ लागेल.
दरम्यान, भारतीय सैन्य दलाने एलएसीजवळ पेट्रोलिंग पॉईंट 15 आणि 17 ए वर त्यांची नवी स्थिती स्वीकार करावी, असे चीनचे म्हणणे आहे. त्याचबरोबर या परिसरात एप्रिल 2020 पूर्वीची स्थिती कायम राहण्यासाठी चीनकडून चालढकल सुरु आहे.
आणखी एका अधिकाऱ्याने सांगितले की, गोगरा-हॉट स्प्रिंग्स परिसरात चीनचे सुमारे 60 सैनिक एप्रिल 2020 च्या स्थितीत आहेत. जेव्हा चीन आपले सर्व सैनिक इथून हटवेल, तेव्हाच हा परिसर रिकामा करण्याची प्रक्रिया पूर्ण झाली असे मानण्यात येईल. जेव्हा हा टप्पा पूर्ण होईल, त्यानंतर देपसांग परिसरात भारतीय लष्कराच्या पेट्रोलिंग अधिकाराचा मुद्दा पुढे केल जाईल. हा मुद्दा वर्ष 2013 पासून निर्माण झालेला आहे.
दरम्यान, हा परिसर भारत आणि चीन या दोघांसाठी रणनीतिक दृष्ट्या अत्यंत महत्त्वाचा आहे. चिनी सैन्य गोगरा, हॉट स्प्रिंग आणि कोंगका ला परिसरात तैनात असलेल्या आपल्या सैनिकांना मोठ्या प्रमाणात रसद पुरवतात. दहाव्या टप्प्यातील सैन्य वार्ता 20 फेब्रुवारी रोजी झाली होती. दोन्ही देशांची लष्करे पेंगाँग तलावाच्या उत्तर आणि दक्षिण किनाऱ्यावरुन आपापल्या सैन्यदलांना मागे हटवण्यास राजी झाले होते. परंतु, आता चीन याबाबत दुर्लक्ष करत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.