बीजिंग: नव्वद दिवसांची अंतराळ मोहीम यशस्वी करणारे चीनचे तीन अंतराळवीर आज पहाटे सुखरूपरित्या परतले. नी हाइशेंग, लियू बोमिंग आणि टँग होंगबो हे अंतराळवीर स्थानिक वेळेनुसार दुपारी दीड वाजता म्हणजेच भारतीय प्रमाणवेळेनुसार पहाटे ५.३० वाजता शेनझोऊ-१२ यानातून गोबी वाळवंटात उतरल्याची माहिती चायना मॅनड स्पेस एजन्सी (सीएमएसए) ने दिली.
सरकारी दूरचित्रवाणी सीसीटीव्हीने अंतराळयानाचे पॅराशूटिंगचे फुटेज प्रसारित केले. १७ जून रोजी अंतराळ मोहीम सुरू झाली होती. मोहिमेचे प्रमुख नी हाइशेंग आणि लियू बोमिंग व टँग यांनी स्पेसवॉकही केला. त्यांनी अध्यक्ष शी जिनपिंग यांच्याशी व्हिडिओ कॉलवरून संवाद देखील साधला आणि अंतराळ कार्यक्रमाची माहिती दिली. येत्या वर्षात चीनचे अंतराळ स्थानक काम सुरू करेल, अशी अपेक्षा सीएमएसएने व्यक्त केली आहे. हे तिघे अंतराळवीर गुरुवारी सकाळी अंतराळ स्थानकातून रवाना झाले होते.
चौदा अंतराळवीरांची पाठवणी
चीनने २००३ पासून आतापर्यंत चौदा अंतराळवीरांना अवकाशात पाठवले आहे. त्याचबरोबर स्वतंत्रपणे अंतराळ स्थानक उभारणारा चीन हा पूर्वीचा सोव्हिएत संघ आणि अमेरिकेनंतरचा जगातला तिसरा देश ठरला आहे. चीनच्या अवकाश कार्यक्रमाची गुप्तता आणि सैनिकांसाठी होणारा वापर लक्षात घेता अमेरिकेने चीनच्या अंतराळ कार्यक्रमास आक्षेप घेतला होता. त्यामुळे आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानक कार्यक्रमातून चीन बाहेर पडल्यानंतर स्वत:चेच अंतराळ स्थानक उभारणीचा कार्यक्रम अमलात आणला.
पुढील मोहिमेची माहिती नाही
चीनच्या सैनिक व्यवस्थापनाकडून अंतराळ मोहिमेचे संचलन होते. यासंदर्भात जुजबी माहिती देण्यात आली आहे. अंतराळवीरांना पुन्हा ९० दिवसांच्या मोहिमेवर पुढील दोन वर्षात अंतराळ स्थानकावर पाठवण्यात येणार आहे. पुढील वर्षी अंतराळस्थानक कार्यान्वित होईल अशी अपेक्षा आहे. शेनझोऊ-१३ चे लॉचिंग कधी होणार, हे मात्र सांगितले नाही. तसेच अन्य कोणत्या अंतराळवीरांना यांच्यासमवेत पाठवण्यात येणार आहे, हे देखील गोपनीय ठेवले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.