लाहोर : देशद्रोहाचा खोटा आरोप लावून मला दहा वर्षांसाठी तुरुंगात डांबायचा लष्कराचा कट आहे, अशी टीका आज माजी पंतप्रधान इम्रान खान यांनी केली. या बदमाशांच्या टोळीविरोधात शरीरातील रक्ताच्या अखेरच्या थेंबापर्यंत मी लढेन, असेही इम्रान यांनी सांगितले.
इम्रान यांच्याविरोधात दाखल झालेल्या दहशतवादाच्या गुन्ह्यासंदर्भात लाहोर उच्च न्यायालयात सुनावणीसाठी ते आणि त्यांची पत्नी बुशरा बिबी हे हजर झाले होते. अल कादीर ट्रस्ट गैरव्यवहार प्रकरणी इम्रान यांना मागील आठवड्यात अटक झाल्यानंतर त्यांच्या समर्थकांनी देशभर हिंसाचार केला होता.
या हिंसाचाराबद्दल इम्रान यांच्याविरोधातही दहशतवादाचा गुन्हा दाखल झाला होता. त्याची सुनावणी आज झाली. इम्रान यांनी याप्रकरणी जामीनासाठी अर्ज केला. या अर्जावर उद्या (ता. १६) सुनावणी घेणार असल्याचे न्यायालयाने सांगितले.
इम्रान यांच्याविरोधात १४० हून अधिक गुन्हे नोंद आहेत, तर बुशरा बिबी यांच्यावरही अल कादीर ट्रस्ट आणि तोशाखाना या प्रकरणांमध्ये गैरव्यवहार केल्याचा आरोप आहे. न्यायालयाने बुशरा बिबी यांना २३ मे पर्यंत अटकेपासून संरक्षण दिले आहे.
न्यायालयात जाण्यापूर्वी पाकिस्तान तेहरीके इन्साफ पक्षाचे प्रमुख इम्रान खान यांनी ट्विटरच्या माध्यमातून पाकिस्तानातील लष्करावर हल्लाबोल केला. ‘सर्व कट उघडकीस आला आहे. हिंसाचाराचे कारण पुढे करून मी तुरुंगात असतानाच ते स्वत:च न्यायाधीश झाले, आदेश दिले आणि अंमलबजावणीही केली.
माझ्या पत्नीला तुरुंगात टाकून मला अवमानित करायचे आणि देशद्रोहाचा आरोप ठेवून मला दहा वर्षांसाठी तुरुंगातही टाकायचे, असे त्यांचे नियोजन आहे,’ अशी टीका इम्रान खान यांनी केली. माझ्यावरील कारवाईवर जनतेची प्रतिक्रिया उमटू नये म्हणून लष्कराने केवळ माझ्या पक्षाच्याच कार्यकर्त्यांना मारहाण केली नाही तर सामान्यांवरही अत्याचार केले. याबरोबरच त्यांनी माध्यमांवरही दहशत ठेवली, असा आरोपही इम्रान यांनी केला.
न्यायालयाविरोधात निदर्शने
इस्लामाबाद : इम्रान खान यांना झुकते माप देत त्यांना हवे तसे निर्णय न्यायालय देत असल्याची टीका करत पाकिस्तानमधील सत्ताधारी आघाडीच्या नेत्यांनी आज सर्वोच्च न्यायालयाबाहेर निदर्शने केली. इम्रान म्हणजे सर्वोच्च न्यायालयालचा ‘लाडला’ असून त्यांना वारंवार अटकेपासून संरक्षण पुरविले जात आहे, अशी टीका या पक्षांनी केली.
निदर्शने करणाऱ्या पक्षांमध्ये पाकिस्तान मुस्लिम लीग, जमैत उलेमा ए इस्लाम फझल, पाकिस्तान पीपल्स पार्टी यांचा समावेश होता. दरम्यान, इम्रान खान यांचे इस्लामाबाद उच्च न्यायालयातून अपहरण करण्यात आल्याचा दावा करत पाकिस्तान तेहरीके इन्साफ पक्षाने नॅशनल अकाउंटेबिलीटी ब्युरोविरोधात याचिका दाखल करण्याचा निर्णय घेतला आहे.
माझ्या शरीरातील रक्ताच्या अखेरच्या थेंबापर्यंत मी खऱ्या स्वातंत्र्यासाठी लढत राहिल. बदमाश लोकांची गुलामी सहन करण्यापेक्षा मी मृत्यू पत्करेन.
- इम्रान खान, माजी पंतप्रधान
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.