- रवींद्र गाडगीळ, ब्रिटन
सार्वजनिकरीत्या साजरा करण्यात येणाऱ्या उत्सवातील विधायक बाजू समोर येणे गरजेचे आहे. पूर्वी सार्वजनिक उत्सवापासून दूर राहणाऱ्या महिलांचा आता सहभाग वाढत चालला आहे. ढोल-ताशा पथक हे त्याचे मूर्तिमंत उदाहरण असून, या गोष्टी उत्सवाचा आनंद द्विगुणीत करणाऱ्या आहेत.
स्वातंत्र्यप्राप्तिबरोबर गणेशोत्सवाचा मूळ हेतू बाजूला पडला. भारताने विकसनशील भांडवलशाहीची कास धरली. संघटना न संघटन कौशल्य या गोष्टी सोडल्या तर बाकी सर्व हेतू व कार्य गरजेनुसार मागे पडले. भांडवलशाहीमुळे पैसा व त्याबरोबर येणारी इतर साधन सामग्री यांनी सार्वजनिक गणेश उत्सवात प्रवेश केला. ही होणे साहजिक, अपरिहार्य आणि नैसर्गिक होते. हे चूक किंवा बरोबर आहे हा वाद आता निरर्थक आहे.
याच काळात छपाई तंत्रज्ञान, विद्युत तंत्रज्ञान, राजकीय बांधिलकी याचा जबरदस्त प्रभाव उत्सवामध्ये ठळकपणे दिसू लागला. स्पर्धा आणि स्वत:चे वैशिष्ट्य, वेगळेपण दाखवण्यात जास्त भर दिसून येऊ लागला. आता इष्टकार्याबरोबर काही अनिष्ट गोष्टींनी पण या गणेश उत्सवामध्ये प्रवेश केला. या अनिष्ट गोष्टींचा प्रवेश का, कसं झाला, तो थांबवता आला असतं का, कोणी थांबवण्याचा प्रयत्न केला का, हा या लेखाचा उद्देश नाही.
देश स्वतंत्र झाल्यावर या उत्सवामध्ये एक गोष्ट प्रकर्षाने आणि ठळकपणे दिसून आली, ती म्हणजे सार्वजनिक गणेश उत्सवामध्ये महिलांची अनुपस्थिती. याची कारणे अनेक असू शकतील आणि आता ही गोष्ट घडून गेली आहे, त्यामुळे जुने चंदन उगळण्यामध्ये काही अर्थ नाही आणि उपयोग तर अजिबात नाही. कदाचित समकालीन समाज रचना,अनिष्ट गोष्टींचा प्रादुर्भाव ही काही प्रमुख करणे असू शकतील.
प्रगल्भ महाराष्ट्राची नवीन ओळख
बदल हा अनिवार्य आणि सातत्यपूर्ण असतो हे त्रिकाल सत्य आहे. गेल्या दोन तीन दशकांमध्ये सार्वजनिक गणेश उत्सवाचे चित्र झपाट्याने बदलत आहे. हजारो महिला, मुली एकत्र येऊन अथर्वशीर्ष पठन ते ढोलताशा पथकामध्ये सहभागी होत आहेत, ही स्वागतार्ह बाब आहे आणि प्रगल्भ महाराष्ट्राची नवीन ओळख जगापुढे समर्थपणे मांडत आहे. महाराष्ट्र सामाजिक बदल व नावीन्यपूर्ण उपक्रम यासाठी गाजत होता, तीच परंपरा महिलांचा गणेश उत्सवामधील सहभागामधून दिसत आहे.
ढोल ताशा पथकांमधून गेल्या दोन तीन दशकांमध्ये महिलांचा पुढाकार, हिरिरीने सहभाग ही विलक्षण घटना आहे. अतिशय शिस्तबद्ध नियोजन,आखणी व सादरीकरण ही या पथकांचे मानबिंदू आहेत. सार्वजनिक ठिकाणी शोभेल व समाज मर्यादा जपल्या जातील, अशी वेशभूषा, समरस होऊन नियोजन ते वादन यामध्ये तल्लीन होऊन पुरुष व महिला एकत्रपणे कला सादर करत आहेत.
खासकरून सुशिक्षित मुली आणि तरुणी यांच्या सुप्त कलगुणांना योग्य दिशा मिळत आहे. तरुणींचा पोशाख अतिशय यथायोग्य आणि सार्वजनिक ठिकाणी साजेसा असतो. त्यांचा वावर आणि अभिनय सहज असून व कुठेही आक्षेपार्ह हावभाव करताना दिसत नाही. त्यांची सार्वजनिक कार्यक्रमात सहभागी होण्याची सुप्त इच्छा या उत्सवाच्या रूपांनी पूर्ण होत आहे. त्यांची इच्छा असूनही वर्षानुवर्षे त्या यापासून दूर होत्या. आता त्यांचा सहभाग हे दृश्य विलोभनीय आहे.
सोशल मीडियावर अशा ढोल ताशा पथकांच्या हजारो चित्रफिती बघायला मिळत आहेत. यामध्ये कुठे ही अक्रस्ताळे हावभाव, अंगविक्षेप दिसून येत नाही. अनिष्ट गोष्टी या ढोल ताशा पथके, अथर्वशीर्ष सहस्त्रावर्तन यापासून दूर झाल्या आहेत. याच बरोबर महिला, मुलींना एक हक्काचे , मानाचे व सुरक्षित व्यासपीठ मिळाले आहे. देशभक्ती, महाराष्ट्र भक्ती , सामाजिक जाणीव व बांधिलकी याचे उत्तम उदाहरण यामध्ये दिसून येते.
आपल्या राष्ट्रपुरुषांचा, संतांचा व देशाचा जयजयकार पुरुष व महिला एकत्रपणे करत आहेत, हा प्रगल्भ बदल काही नवीन शुभसंकेत देत आहे. समाजातील निम्मा वर्ग सार्वजनिक उत्सवामध्ये समाविष्ट झाला आहे. त्यामधून अनेक नेते, समाजसुधारक घडतील. महिलांच्या सहभागामुळे सार्वजनिक ठिकाणी तरी अनिष्ट गोष्टी होताना दिसणार नाहीत. अर्थात अनिष्ट गोष्टी घडणारच नाहीत याची खात्री कोणीच देऊ शकत नाही.
नवीन चळवळीची सुरुवात
सध्याच्या स्पर्धात्मक जगात या गोष्टी अत्यंत आवश्यक आहेत. उत्साही तरुण तरुणी एकत्र आले आहेत, संघटन बनले आहे. याचा योग्य उपयोग करून घेत येईल. आता ढोल ताशा पथके जगभर गाजत आहेत. त्याच बरोबर या तरुण पिढीला योग्य मार्गदर्शन करण्यास महाराष्ट्रात, देशात आणि जगभरात अनेक स्वयंसेवी संस्था कार्यरत आहेत.
उदाहरणदाखल ‘गर्जे मराठी ग्लोबल’ ही संस्था महाराष्ट्रातील तरुण तरुणींना व्यवसाय मार्गदर्शन, प्रोत्साहन देण्याचे कार्य करत आहे. जगभरातील तज्ज्ञ मंडळी यात हिरिरीने सहभागी होत आहेत. अशीच एक संस्था -OMPEG ब्रिटनमध्ये काम करत आहे.
ब्रिटनस्थित असलेल्या मराठी माणसांना व्यवसाय, उद्योगधंदा करण्यास परावृत्त करण्याचे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेऊन ही संस्था काम करत आहे. ही दोनही उदाहरणे या संस्थांची जाहिरात करण्यासाठी नसून, संघटनासोबत असेल तर काय सध्या करता येते ही सांगणे हा आहे.
एका नवीन चळवळीची सुरुवात झाली आहे ही नक्की. याला योग्य दिशा देऊन त्यामधून तरुण पिढीला आपले कलागुण निर्भीड, निःसंकोचपणे व त्यांना पटेल अशा रीतीने त्यांचे सुप्त कलागुण सादर करण्यास नवीन व्यासपीठ मिळाले. त्या भक्कम पायावर संपन्न, समृद्ध व सशक्त तरुण पिढी या देशाचे भविष्य घडवायला सज्ज होईल, यात शंका नाही.
अपप्रवृत्ती कितीही नाही म्हणले तरी समाजामधून नष्ट होणे ही फक्त कवी कल्पना आहे. शुभ्र रंग सोबत गडद रंग ही असणारच. किंबहुना गडद रंगामुळे शुभ्र रंगाचे महत्त्व जास्त जाणवते. त्याचप्रमाणे इष्ट गोष्टी, रुढी, जीवनपद्धती हेच सध्याच्या वाईट प्रवृत्तींना सणसणीत उत्तर आहे. महाराष्ट्र व त्यामधील तरुण पिढी एक नव आदर्श, उदाहरण प्रस्थापित करत आहे. ही आपल्या राज्याच्या इतिहासाला धरून आहे. सुरवात उत्तम झाली आहे, यशाचा आणि कीर्तीचा कळस नक्कीच चढेल याची खात्री आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.