Donald Trump Esakal
ग्लोबल

Donald Trump: ट्रम्प यांच्यावर हल्ल्याला जबबादार अमेरिकेची बंदुक संस्कृती

Attack On Donald Trump : गोळी दोन सेंटीमीटर्सने सरकली असती, तर ते तेथल्या तेथे गतप्राण झाले असते. ``वेळ आली होती, पण काळ आला नव्हता.’’

विजय नाईक,दिल्ली

Reason Behind Attack On Donald Trump: रिपब्लिकन पक्षाचे अमेरिकेच्या अध्यक्षपदाचे उमेदवार व माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (78) यांच्यावर 14 जुलै रोजी पेनस्ल्व्हानियातील बटलर येथील प्रचार सभेत प्राणघातक हल्ला झाला. त्यांच्या कानाला घासून गेलेली गोळी दोन सेंटीमीटर्सने सरकली असती, तर ते तेथल्या तेथे गतप्राण झाले असते. ``वेळ आली होती, पण काळ आला नव्हता.’’

त्यांच्यावर ज्याने गोळीबार केला तो 20 वर्षीय थॉमस मॅथ्यू क्रुक्स या तरूणाला अंगरक्षकांनी तेथल्या तेथे ठार केल्याने हल्ल्यामागे नेमके कोण होते? तो मनोरूग्ण होता, की ट्रम्प पुन्हा अध्यक्ष होण्याची शक्यता असल्याने त्यांना त्यापूर्वीच ठार करावे, या उद्देशाने त्याने गोळीबार केला? हे लगेच कळायला मार्ग नाही. परंतु, अमेरिकेत बोकाळलेल्या बंदुक संस्कृतीचा हा परिपाक आहे, याबाबत कुणाचेही दुमत नाही.

विशेष म्हणजे, अध्यक्षपदी बराक ओबामा होते त्या आठ वर्षात व नंतर जो बायडेन अध्यक्ष झाल्यापासून गेल्या चार वर्षात बंदुक संस्कृतीला पायबंद घालण्यासाठी बरेच प्रयत्न झाले व होत आहेत. परंतु, खुद्द ट्रम्प यांचा मात्र या संस्कृतीला पाठिंबा असल्याने ते अध्यक्ष झाल्यास ती अधिक फोफावेल, यात शंका उरलेली नाही.

--

भारतात `व्हॉट्सअप’मध्ये मात्र एक नामी विनोद फिरतोय. त्यात एका किरकोळ दुकाना बाहेर जाहिरात केली आहे, ``हमारे यहॉं मशीन (गन) द्वारा कान मे छेद किये जाते है. वुई मेक होल इन द इयर्स वुइथ गन ( We make hold in the ears with gun)’’ त्याखाली कानाचे व कानाला छिद्र पाडण्याच्या बंदुकीसारख्या दिसणाऱ्या उपकरणाचे छायाचित्र आहे. आमच्या एका स्नेह्याने हे चित्र `व्हॉट्सअप’वर टाकून त्याखाली खुमासदार टिप्पणी केली, ``ट्रम्प्स शूटर वॉज ट्रेन्ड बाय धिस गाय!’’ अलंकारासाठी अथवा जन्मतःच बाळाचे कान टोचण्याची प्रथा आपल्याकडे तिला ट्रम्प वरील हल्ल्याबाबत अशी फिरकी देण्यात आली.

सुरक्षाधिकाऱ्यांनी प्रसंगावधान राखून ट्रम्प यांना त्याक्षणी वाकायला लावले त्यामुळे ते वाचले. पण जवळच असलेल्या त्यांच्या एका समर्थाकाचे आणखी एक गोळी लागून प्राण गेले. या घटनेचा ट्रम्प यांना फायदा होणार, हे निश्चित. विद्यमान अध्यक्ष जो बायडन यांना चांगलेच म्हातारण आल्याने व ट्रम्प यांच्याबरोबर टीव्हीवर झालेल्या जाहीर वक्तृत्वात त्यांना योग्य शब्द न आठवता उडालेल्या भंबेरीने त्यांनी अध्यक्षपादाच्या स्पर्धेतून बाहेर पडावे, असा जाहीर दबाव त्यांच्याच डेमॉक्रटिक पक्षाकडून आला आहे. परंतु, या वयोवृद्ध अध्यक्षांना वास्तवाचे भान राहिलेले नाही. त्यामुळे, झालेल्या गोळीबारामुळे ट्रम्प यांच्याकडे मतदारांची सहानुभूती वळणार, यात ही शंका राहिलेली नाही. अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी तीन महिने उरले आहेत, हा काळ प्रचारासाठी अगदी कमी आहे. त्यामुळे बायडन यांनी वेळीच दूर झालेले बरे, असा दबाव माजी अध्यक्ष बराक ओबामा व बायडन यांचे खंदे समर्थक व निवडणूक निधी गोळा करणारे हॉलिवुडचे प्रसिद्ध अभिनेते जॉर्ज क्लूनी यांनीही त्यांना पत्र लिहून ``अध्यक्षपदाची निवडणूक लढू नका, वेळीच दूर व्हा,’’ असा सल्ला दिला आहे. तथापि, बायडन यांनी हा अद्याप हेकटपणा सोडलेला नाही. ते दूर झाले, तर उप राष्ट्राध्यक्ष कमला हॅरिस यांना पक्षातर्फे उमेदवारी दिली जाईल व प्रचारासाठी त्यांना वेळ मिळेल, असे मानले जाते.

निवडणुकीत यश मिळावे म्हणून ट्रम्प यांनी केलेल्या आणखी एका खेळीत ओहाययोचे सिनेटर जेम्स डेव्हिड व्हान्स यांचे नाव उपराष्ट्राध्यक्ष पदासाठी घोषित केले. त्यांची पत्नी उषा चिलुकुरी या भारतीय व मूळच्या आंध्र प्रदेशच्या असल्याने ट्रम्प यांच्या अमेरिकास्थित भारतीय मतदारांना ट्रम्प यांना निवडणून देण्याचे आणखी एक कारण मिळाले आहे. या घटनांकडे पाहिले, की भारतीय महिलांनी अमेरिकेच्या राजकारणात किती मोठी भरारी मारली आहे, हे ध्यानात येते.

अध्यक्षपदाच्या निवडणुकीत उमेदवार म्हणून प्रथम उतरणाऱ्या व आता ट्रम्प यांना पाठिंबा देणाऱ्या निकी हेले या ही भारतीय वंशाच्या. प्रथम उमेदावारी जाहीर करणारे व नंतर माघार घेणारे विवेक रामस्वामी हे ही भारतीय वंशाचे. या आधी लुइसियानाचे गव्हर्नर बॉबी जिंदल हे अध्यक्षपदाच्या निवडणुकीत उतरले होते. याचा अर्थ भोज्जाला शिवून हे नेते मागे फिरले आहेत. त्याला अमेरिकेच्या श्वेतवर्णियांचा मतदारांवर असलेला दबाव कारणीभूत होय. पण, याचा अर्थ भविष्यात तेथील एखादा नामवंत भारतीय अमेरिकेचा राष्ट्रपती होण्याची शक्यता डावलता येत नाही. भारतीय वंशाचे ऋषि सुनक हे ब्रिटनचे अलीकडे पंतप्रधान झाले होतेच.

``ट्रम्प यांच्यावरील हल्ल्याला जबाबदार अमेरिकेची बंदुक संस्कृती’’ हे जे प्रारंभी म्हटले आहे, त्याला असंख्य पुरावे आहेत. तिचे थेट लक्ष्य अमेरिकचे अध्यक्ष झाले आहेत. त्यातील प्रमुख होत, अध्यक्ष अब्राहम लिंकन (1865), जेम्स गारफील्ड (1881), विल्यम मॅकिन्ले (1901), थिओडोर रूझव्हेल्ट (1912), जॉन एफ केनेडी (1963) रोनाल्ड रीगन (1981) व माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (2024).

Donald Trump

अमेरिकेतील बंदुक संस्कृती थेट तळागाळापर्यंत पोहोचली आहे. अलीकडे प्रसिद्ध झालेल्या आकडेवारीनुसार, ``40 टक्के अमेरिकन नागरिकांच्या घरी बंदुका, पिस्तुले आहेत. बंदुकीचा घेणाऱ्यांची संख्या वाढत आहे. बंदुक हल्ल्यात दर वर्षी हजारो लोक ठार होत आहेत. शंभर लोकांमागे 120 बंदुका आहेत. जगातील कुठल्याही देशापेक्षा हे प्रमाण सर्वाधिक आहे. या उलट भारतात शंभर व्यक्तिंमागे फक्त 5.3 बंदुका आहेत. 2020 मध्ये बंदुकीच्या हिंसाचारात तब्बल 43,500 लोक अमेरिकेत ठार झाले. अमेरिकेतील 57 टक्के लोक बंदुकी बाळगण्याच्या कायद्याविरूद्ध आहेत. तर 42 टक्के लोकांचे `घरी बंदुक असावी,’ असे मत आहे.

घटनेच्या दुसऱ्या कलमान्वये, बंदुक बाळगण्याचा हक्क नागरिकाला देण्यात आला आहे. अमेरिकेतील शाळा, कॉलेजातून विद्यार्थ्यांनी विद्यार्थ्यांवर वा एखाद्या माथेफिरूने शाळेतील विद्यार्थ्यांवर वा जमावावर, अथवा श्वेतवर्णीय पोलिस अधिकाऱ्याने कृष्णवर्णीयावर गोळीबार करून त्यांना ठार मारल्याच्या असंख्य घटना घडत आहेत. त्यांना अद्याप कोणीही प्रतिबंध करू शकलेले नाही.

अमेरिकेतील प्रसिद्ध `प्यू रिसर्च सेन्टर’ने केलेल्या अध्ययनात म्हटले आहे, की बंदुक ही अमेरिकन समाजाशी समरस झालेली बाब आहे. ``कुणी हल्ला केल्यास स्वतःला वाचविण्यासाठी बंदुक हवी, हे सर्वात अधिक महत्वाचे कारण सांगितले जाते. काहींना बंदुक शिकारीसाठी हवी असते, काहींना क्रीडास्पर्धांसाठी, तर काहींना नोकरीचे साधन म्हणून हवी असते.’’ 2017 मध्ये झालेल्या एका पाहाणीत ``स्वसंरक्षणासाठी बंदुक हवी,’’ हे प्रमुख कारण असल्याचे सांगितले गेले. अमेरिकेतील बंदुक निर्मिती करणाऱ्या कंपन्यांची मोठी लॉबी आहे. तिला कुणी छेदू शकलेले नाही. ``शाळेवर झालेल्या हल्ल्याबाबत 19 टक्के पालक अतिचिंतेत आहेत. मानसिक रोग असलेल्यांना बंदुका विकू नये, तसेच वयाच्या 21 वर्ष पूर्ण होण्यापूर्वी कोणत्याही तरूणाला बंदुक खरेदीवर बंदी हवी, असे 88 टक्के रिपब्लिकन्स व 89 टक्के डेमॉक्रॅट्सना वाटते.

2021 मध्ये बंदुक हिंसाचाराच्या 19379 घटना घडल्या. प्रतिवर्ष 3,80,000 बंदुका, पिस्तुले चोरीस जातात. `सेंटर फॉर डिसिज कन्ट्रोल अँड प्रिव्हेन्शन’ या संस्थेने केलेल्या पाहाणीनुसार, ``अमेरिकेतील सर्वात अधिक बंदुक हिंसाचार ( खून, आत्महत्या इ.) मिसिसिपी, लुसियाना, न्यू मेक्सिको, अलाबामा व वायोमिंग या राज्यात होत असून, मॅसॅच्युसेट्स, न्यू जर्सी, हवाई, न्यू य़ॉर्क व र्होड आयलँड या राज्यात या हिंसाचाराचे प्रमाण सर्वात कमी आहे.

या संस्कृतीने समाजात निर्माण झालेले मानसिक असंतुलन कसे संपुष्टात आणायचे, हा प्रश्न जगातील सर्वात श्रीमंत व आघाडीचा देश, अमेरिकेपुढे आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT