European countries leaning towards Russia and China  Sakal
ग्लोबल

China-Russia: रशिया व चीनकडे झुकणारे युरोपीय देश

China-Russia: स्लोव्हाकियाचे पंतप्रधान रॉबर्ट फिको (59) यांच्यावर 15 मे रोजी हँडलोव्हा या शहरात प्राणघातक हल्ला झाला. हा लेख लिहित असताना ते बानस्किया बिस्ट्रिका शहरातील रूग्णालयात मृत्यूशी झगडत आहेत.

- विजय नाईक

China-Russia: स्लोव्हाकियाचे पंतप्रधान रॉबर्ट फिको (59) यांच्यावर 15 मे रोजी हँडलोव्हा या शहरात प्राणघातक हल्ला झाला. हा लेख लिहित असताना ते बानस्किया बिस्ट्रिका शहरातील रूग्णालयात मृत्यूशी झगडत आहेत. गेल्या वर्षी झालेल्या निवडणुकानंतर ते स्लोव्हाकियाचे पंतप्रधान झाले. या आधी 2006 ते 2010 व 2012 ते 2018 दरम्यान दोन वेळा पंतप्रधानपदी होते. 1 जानेवारी 1993 रोजी पूर्वाश्रमीच्या चेकोस्लोव्हाकियाचे विभाजन होऊन दोन स्वतंत्र गणराज्ये प्रस्थापित झाली.

त्यातील एक चेक गणराज्य व दुसरे स्लोव्हाकिया हे गणराज्य. हे विभाजन कोणताही रक्तपात न होता झाल्याने त्याला `वेल्व्हेट रिव्होल्यूशन (मखमली क्रांती)’ असे म्हणतात. `स्मिअर (दिशा)’ हा फिको यांचा राजकीय पक्ष. त्याचे धोरण रशियाकडे झुकणारे व अमेरिकेला विरोध करणारे.

सत्तेवर येताच त्यांनी युक्रेनला होणारा शस्त्रास्त्र पुरवठा बंद केला. त्यामुळे जनतेत इतका रोष पसरला, की हजारो लोकांनी या धोरणाविरुद्ध निदर्शने केली. त्यांची स्थलातंरितांविरोधी भूमिका, समलिंगी प्रथेला असलेला विरोध व वृत्तपत्र स्वातंत्र्यची गळचेपी, ही जनरोषाची प्रमुख कारणे असून, प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, त्यांनी गुन्हेगारांची एक टोळी निर्माण करून सत्तेचा दुरूपयोग करणे सुरू केले. 2018 मध्ये त्यांचे सरकार पदच्युत होण्याचे प्रमुख कारण स्लोव्हाकियातील शोधक पत्रकार कुसियाक व त्याची प्रेयसी यांचे खून केल्याचे आरोप, हे होते.

स्लोव्हाकिया हा युरोपीय महासंघाचा सदस्य आहे. महासंघातील बव्हंश सदस्य राष्ट्रे ही अमेरिकेची मित्रराष्ट्र आहेत, परंतु, स्लोव्हाकिया, सर्बिया हे देश वेगाने रशिया व चीनच्या गोटाकडे सरकू लागल्याचे गेल्या आठवड्यात स्पष्ट झाले. चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांनी ज्या तीन युरोपीय देशांचा दौरा केला, त्यात हंगेरी, सर्बिया व फ्रान्स यांचा समावेश होतो.

त्यापैकी हंगेरीचे अध्यक्ष व्हिक्टर ओर्बान यांच्याबरोबर झालेल्या भेटीनंतर दोन्ही देशांचे संबंध व्यूहात्मक पातळीवर प्रस्थापित झाल्याचे जाहीर करण्यात आले. आर्थिक व सांस्कृतिक पातळीवर संबंध अधिक मजबूत करण्याचे ठरविण्यात आले. अनेक कराररांवर स्वाक्षऱ्या झाल्या. विशेष म्हणजे, हंगेरी व चीन दरम्यान राजदूतीय संबंध प्रस्थापित होऊन 75 वर्षे झाल्याने समारंभ होत असताना हंगेरी व चीन अधिक निकट आल्याचे चित्र दिसले.

शी जिनपिंग यांच्या शिष्टमंडळात तब्बल 400 जणांचा समावेश होता, याचा विशेषोल्लेख करणे गरजेचे आहे. तब्बल वीस वर्षानंतर चीनच्या अध्यक्षाने हंगेरीला भेट दिली. हंगेरी बरोबर आर्थिक, संरक्षणात्मक व व्यापारी संबंध वाढविण्यावर भर देण्यात आला. सर्बिया बरोबर भविष्यात सहकार्य करण्याचे ठरले आहे. नाटो व युरोपीय महासंघ ज्या प्रमाणे पूर्वेकडे आपला प्रभाव वाढवत आहे, त्याला उत्तर म्हणून चीनने युरोपात केलेला शिरकाव, या नजरेने पाहावे लागेल.

युरोपीय संसदेने 2022 मध्ये प्रसिद्ध केलेल्या एका अहवालात हंगेरीचे वर्णन `हायब्रीड रिजीम ऑफ इलेक्टोरल ऑटॉक्रसी’ असे केले आहे. 2010 पूर्वी केवळ काही चीनी कंपन्यांनी हंगेरीमध्ये गुंतवणूक केली होती. त्यापैकी वानहुआ या कंपनीने 2011 मध्ये बोर्सोदकेम या खनिज तेलाच्या व्यवसायातील हंगेरियन कंपनी 1.2 अब्ज डॉलर्सला विकत घेतली.

चीनच्या `बेल्ट अँड रोड’ या महत्वाकांक्षी प्रकल्पाचा 2015 मध्ये हंगेरी सदस्य झाला. हंगेरीच्या अनेक क्षेत्रात भांडवल उभ्या करणाऱ्या चार ते पाच चीनी बँकांची कार्यालये बुडापेस्टमध्ये आहेत.

8 मे रोजी सर्बिया ला दिलेल्या भेटीत शी जिनपिंग यांनी अध्यक्ष अलेक्झांडर व्हुसिक यांच्याबरोबर बेलग्रेड येथे वाटाघाटी केल्या. मध्यपूर्व युरोपातील सर्बिया हा चीनचा पहिला सर्वसमावेशक व्यूहात्मक भागीदार असल्याचे शी जिनपिंग यांनी दुतर्फा झालेल्या वाटाघाटी दरम्यान जाहीर केले.

बेलग्रेड-बुडापेस्ट रेल्वेमार्ग लौकरच कार्यान्वित करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे येत्या 1 जुलै रोजी चीन व सर्बिया दरम्यान मुक्त व्यापार करार करण्यात येईल. या दोन्ही राष्ट्रांची चीनबरोबर वाढलेली जवळीक ही युरोपीय महासंघ व नाटोची डोकेदुखी वाढविणारी असून चीनच्या प्रभावला रोखण्याचे महत्वाचे आव्हान महासंघापुढे राहाणार आहे.

महासंघाच्या दृष्टीने समाधानाची बाब म्हणजे, स्लोव्हाकिया चीनच्या जवळ सरकत असला, तरी त्याचे पूर्वाश्रमीचे भावंड चेक रिपब्लिक मात्र ठामपणे युरोपीय महासंघ व पर्यायाने अमेरिकेबरोबर सौहार्दपूर्ण संबंध राखून आहे. 3 ते 17 ऑक्टोबर 1996 दरम्यान मी राष्ट्रपती शंकर दयाल शर्मा यांच्याबरोबर ओमान, पोलंड, स्लोव्हाकिया, चेक गणराज्य व इटली या देशांना भेटी दिल्या.

त्या औपचारिक भेटीत शर्मा यांच्या वाटाघाटी चेक गणराज्याचे अध्यक्ष व्हॅकलाव हॅवेल यांच्याबरोबर प्राग येथे झाल्या, तर ब्रातिस्लावा (स्लोव्हाकियाची राजधानी) येथे त्यांनी अध्यक्ष व्हॅकलाव क्लाऊस यांच्याबरोबर वाटाघाटी केल्या.

त्यावेळी चेक गणराज्य व स्लोव्हाकिया या दोन्ही देशात परस्परांबाबत आदर, रक्तपातहीन विभाजन, याबाबत असलेले समाधान व्यक्त होत होते. दोन्हीकडे शांतता होती. सोव्हिएत युनियन महासत्ता असताना प्रागमध्ये रणगाडे घुसवून केलेला कब्जा व जनतेची झालेली ससेहोलपट व त्या विरूद्ध हॅवेल व स्वातंत्र्य सेनानी अलेक्झांडर दुबचेक यांनी देशाला दिलेले नेतृत्व यांच्या आठवणी ताज्या होत्या.

1991 मध्ये रशियाचे अध्यक्ष मिखैल गोर्बाचेव यांच्या कारकीर्दीत सोव्हिएत युनियची शकले होऊन चेकोस्लाव्हाकिया सह रशियाच्या अधिपत्यखाली असलेल्या अनेक युरोपीय देशांचे साम्यवादाकडून लोकशाहीकडे झालेले परिवर्तन युरोपच्या इतिहासाला कलाटणी देणारे ठरले.

तथापि, रशियाने युक्रेनवर लादलेल्या युद्धानंतर युरोपात पुन्हा एकदा मतभेदांचे चित्र दिसत असून, त्याचा लाभ उठविण्यात अर्थातच रशिया व चीन पुढे आले आहेत. हंगेरी व सर्बिया हे देश त्यांच्या गळाला लागले असून, आणखी कोणते मासे (देश) साम्यवादाकडे झुकणार, हे भविष्यात पाहावयास मिळणार आहे. चीन व रशियाला `थेंबे थेंबे तळे साचे’ याचे समाधान मिळणार आहे.

दोन दिवसांपूर्वी रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी चीनला दिलेली भेट व अध्यक्ष शी जिनपिंग यांच्या बरोबर केलेल्या वाटाघाटी या अमेरिका व युरोप यांची चिंता वाढविणाऱ्या आहेत. युक्रेनमधील युद्ध जिंकण्यासाठी चीन ऱशिया कळीचे साह्य देत आहे.

तथापि, ``शस्त्रांत्रांचा पुरवठा करीत नाही,’’ याबाबत अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री एंथनी ब्लिंकन यांनी समाधान व्यक्त केले, हीच काय ती दिलासा देणारी बाब होय. युक्रेनवर युद्ध लादल्यापासून अमेरिका व युरोपने रशियावर लादलेल्या जाचक बंधनांना चीनशी जवळीक करून पुतिन यांनी दीर्घकालीन उत्तर शोधण्याचे प्रयत्न केले आहेत, हे नक्की.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde: शिंदे विरुद्ध दिघे! उद्धव ठाकरेंची खेळी; ठाणे जिल्ह्यात आठ जणांना दिली संधी

MVA Seat Sharing Formula: मविआत कोणीही मोठा किंवा छोटा भाऊ नाही! जागा वाटपांचा फॉर्म्युला जाहीर

Thackeray Group List: ठाकरे गटाची पहिली यादी जाहीर; एकनाथ शिंदेंविरोधात केदार दिघेंना उमेदवारी

Zimbabwe ने रचला इतिहास; Gambiaविरूद्ध केल्या ट्वेंटी-२० क्रिकेटमधील सर्वाधिक धावा

Latest Maharashtra News Updates Live: भाजपचे नाराज दिनकर पाटील यांचा मनसेमध्ये प्रवेश

SCROLL FOR NEXT