ढाका : बांगलादेशातील अराजकतेच्या पार्श्वभूमीवर भारत सरकारने तेथील उच्चायुक्तालय आणि वाणिज्य दूतावासातील अतिरिक्त कर्मचाऱ्यांना मायदेशी बोलाविण्याचा निर्णय घेतला आहे. येथील १९० कर्मचारी हे मायदेशी परतले असून चारशेहून अधिक नागरिकांनाही भारतात आणण्यात आले आहे. केंद्र सरकारने स्थानिक अल्पसंख्याकांच्या सुरक्षेच्या अनुषंगाने काही मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. अनेक भागांमध्ये हिंदूंच्या घरांवर हल्ले होऊ लागल्याने चिंता व्यक्त होत आहे.
येथे अडकून पडलेल्या भारतीयांना मायदेशी आणण्यासाठी एअर इंडिया आणि इंडिगो या विमान कंपन्यांनी विशेष सेवा सुरू केली आहे. या विमानातून चारशेपेक्षाही अधिक नागरिकांना मायदेशी आणण्यात आले. एअर इंडियाचे विमान आज सकाळी २०५ नागरिकांना घेऊन मायदेशी परतले. हिंसाचाराचे सत्र कायम असून हजारो आंदोलक रस्त्यांवरच ठाण मांडून बसल्याचे चित्र आहे. हसीना यांच्या अवामी लीग पक्षाच्या वीस नेत्यांची आंदोलकांनी हत्या केल्याची धक्कादायक बाब उघड झाली.
कलाकार राहुल आनंद लक्ष्य
बांगलादेशात समाजकंटकांनी तेथील मंदिरे, घरे आणि हिंदूंच्या व्यावसायिक आस्थापनांना लक्ष्य केले. हसीना यांच्या अवामी लीगशी संबंधित दोन हिंदू नेत्यांची देखील संतप्त जमावाने हत्या केल्याचा प्रकार उघड झाला आहे. स्थानिक लोककलाकार राहुल आनंद यांच्या घराची जमावाने नासधूस करत त्याला आग लावली होती. राहुल आणि त्यांच्या कुटुंबीयांनी अज्ञातस्थळी धाव घेतली आहे. संतप्त जमावाने राहुल आनंद यांच्या घरातून अनेक मौल्यवान वस्तू आणि संगीत साहित्य चोरून नेल्याचा प्रकार उघड झाला आहे. ज्यावेळी जमावाने त्यांच्या घराला आग लावली तेव्हा त्या वास्तूमध्ये तीन हजार संगीत वाद्ये होती असे ‘डेली स्टार’ने प्रसिद्ध केलेल्या वृत्तात म्हटले आहे.
हिंदूंची घरे, मंदिरांवर हल्ले
देशात अल्पसंख्याकांवर होणारे हल्ले हे विद्यार्थी चळवळीच्या मूलभूत तत्त्वांच्याविरोधातील असून स्थानिक प्रशासकीय यंत्रणेने अल्पसंख्याक समुदायातील कुटुंबे आणि त्यांच्या संपत्तीचे संरक्षण करावे असे आवाहन ‘ट्रान्सपरन्सी इंटरनॅशनल बांगलादेश’कडून करण्यात आले आहे. देशभरातील दहा ठिकाणांवरील मंदिरांची जाळपोळ करण्यात आली असून यावर भारतातील अनेक साधू महंतांनी चिंता व्यक्त केली आहे. ढाक्यात राहणाऱ्या प्रिनोथी चॅटर्जी यांनी जमावाच्या हल्ल्यात माझ्या वडिलांचा मृत्यू झाला असून मी आणि माझी आई गंभीर जखमी झाले असल्याचे म्हटले आहे. पंतप्रधान शेख हसीना यांच्याविरोधातील जन उद्रेकानंतर हिंदूंची अनेक घरे आणि मंदिरांची देखील जाळपोळ करण्यात आली. आतापर्यंत देशात विविध ठिकाणांवर झालेल्या हिंसाचारामध्ये चारशेपेक्षाही अधिक लोक मरण पावले आहेत.
हॉटेलची जाळपोळ
पश्चिमी जोशोर प्रांतामध्ये आंदोलकांनी अवामी लीगच्या नेत्यांशी संबंधित हॉटेलची जाळपोळ केल्याचा प्रकार उघड झाला आहे. तुरुंगातून सुटका करण्यात आलेल्या माजी पंतप्रधान खालिदा झिया यांना नवा पासपोर्ट देण्यात आला आहे. त्यांच्या पक्षाकडूनच ही माहिती देण्यात आली. खालिदा झिया (वय ७९) यांना २०१८ मध्ये भ्रष्टाचाराच्या प्रकरणामध्ये सतरा वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली होती. बांगलादेश नॅशनल पक्षाचे अध्यक्ष असलेल्या झिया यांना मुक्त करण्याचे आदेश अध्यक्ष मोहंमद शहाबुद्दीन यांनी दिले होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.