India–Russia sakal
ग्लोबल

India–Russia : बाँबच्या आवाजात शांतता अशक्य;मोदींची स्पष्टोक्ती, पुतीन यांच्याशी चर्चा

‘‘भारताने कायमच शांततेची बाजू घेतली आहे. एका बाजूला बाँबफेक आणि गोळीबार होत असताना शांतता चर्चा होऊ शकत नाही,’’ असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रशियाचे अध्यक्ष व्लादीमिर पुतीन यांना ठामपणे सांगितले.

सकाळ वृत्तसेवा

मॉस्को : ‘‘भारताने कायमच शांततेची बाजू घेतली आहे. एका बाजूला बाँबफेक आणि गोळीबार होत असताना शांतता चर्चा होऊ शकत नाही,’’ असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रशियाचे अध्यक्ष व्लादीमिर पुतीन यांना ठामपणे सांगितले. रशिया हा भारताचा सार्वकालिक मित्रदेश असून पुतीन यांच्याकाळात ही मैत्री अधिक दृढ झाली असल्याचेही मोदी यांनी आपल्या रशिया दौऱ्यादरम्यान सांगितले.

भारत-रशिया यांच्यातील वार्षिक बैठकीसाठी मोदी सोमवारी (ता. ८) रशियात दाखल झाले. युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेसह पाश्‍चिमात्य देशांनी रशियाला एकटे पाडण्याचे धोरण स्वीकारले असताना आणि त्यांच्याशी संबंध न ठेवण्याबाबत इतर देशांवर दबाव आणला जात असताना हा दबाव झुगारत मोदी सोमवारी रशियात दाखल झाले आणि त्यांनी पुतीन यांच्याबरोबर द्वीपक्षीय चर्चाही केली. मागील दहा वर्षांम ध्ये मोदी आणि पुतीन यांची १६ वेळा भेट झाली आहे. दोघांमधील अखेरची भेट २०२२ मध्ये झाली होती.

पुतीन यांनी सोमवारी मोदींसाठी त्यांच्या निवासस्थानी खासगी मेजवानीचे आयोजन केले होते. यानंतर आज दोघा नेत्यांमध्ये द्विपक्षीय चर्चा केली. यावेळी मोदी म्हणाले,‘‘कोरोना आणि विविध संघर्षांमुळे मागील पाच वर्षे जगासाठी अत्यंत आव्हानात्मक होती. या काळात अन्न, इंधन आणि खतांचा प्रचंड तुटवडा जाणवत असतानाही भारत-रशिया मैत्रीमुळे भारतातील शेतकऱ्यांना खतांची कमतरता भासली नाही. आम्ही शेतकऱ्यांच्या हितासाठी कटिबद्ध आहोत. भविष्यातही शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी रशियाबरोबरील सहकार्य वाढविण्यास आम्हाला आवडेल.’’

या भेटीकडे जगाचे लक्ष

पंतप्रधान मोदी हे रशिया दौऱ्यावर आल्याबद्दल पुतीन यांनी आनंद व्यक्त केला. त्यांनी आपल्या निवासस्थानाच्या आवारात इलेक्ट्रीक मोटारीतून मोदींना फेरफटका मारत अनौपचारिक गप्पाही मारल्या. पुतीन यांच्याबरोबरील आजच्या चर्चेमध्ये याचा उल्लेख करताना मोदी म्हणाले,‘‘आपल्या या भेटीकडे संपूर्ण जगाचे लक्ष आहे. या भेटीतून प्रत्येक जण वेगवेगळा अर्थ काढत आहे. काल (सोमवारी) तुम्ही मला तुमच्या घरी आमंत्रित केले. आपण जवळच्या मित्रांप्रमाणे चार-पाच तास गप्पा मारल्या. युक्रेन युद्धाबाबतही तुम्ही खुलेपणाने चर्चा केली आणि या मुद्द्यावर आपण एकमेकांची मते जाणून घेतली.’’ बाँब, बंदुका आणि गोळीबार यांच्या आवाजात शांतता चर्चा होऊ शकत नाही, असे मोदींनी पुतीन यांना सांगितले. ‘नव्या पिढीच्या उज्ज्वल भविष्यासाठी शांतता आवश्‍यक आहे. भारत हा कायम शांततेच्याच बाजूने असेल, हे मी तुम्हाला आणि जगालाही स्पष्टपणे सांगतो,’ असे मोदी चर्चेवेळी म्हणाले. पुतीन यांनीही त्यांच्या बोलण्यात शांततेची गरज असल्याचे सांगितले. हे ऐकून आशा निर्माण झाली असून हे ‘शक्य आहे’ एवढेच मी सांगतो, अशी प्रतिक्रिया मोदींनी दिली. या दौऱ्यानंतर मोदी हे ऑस्ट्रियाच्या दौऱ्यावर रवाना झाले आहेत. या देशाला भेट देणारे ते चाळीस वर्षांतील पहिलेच पंतप्रधान आहेत. यापूर्वी फक्त पंडित नेहरू आणि इंदिरा गांधी यांनी या देशाचा दौरा केला होता.

मोदींना सर्वोच्च नागरी सन्मान

पंतप्रधान मोदी यांना आज अध्यक्ष पुतीन यांच्या हस्ते ‘ऑर्डर ऑफ द सेंट अँड्‌य्रू द अपोस्टल’ या रशियाच्या सर्वोच्च नागरी सन्मानाने सन्मानित करण्यात आले. याबद्दल मोदींनी पुतीन यांचे आभार व्यक्त करत, हा भारताच्या १४० कोटी जनतेचा सन्मान असल्याची भावना व्यक्त केली. तसेच, हा भारत आणि रशिया यांच्यातील अनेक शतकांपासून चालत असलेल्या संबंधांचाही सन्मान आहे, असे मोदी म्हणाले.

मोठा अपेक्षाभंग : झेलेन्स्की

पंतप्रधान मोदींच्या दौऱ्यावर युक्रेनचे अध्यक्ष व्होलोदीमिर झेलेन्स्की यांनी स्पष्ट नाराजी व्यक्त केली. ‘‘हा प्रचंड मोठा अपेक्षाभंग असून शांततेसाठी सुरू असलेल्या प्रयत्नांना मोठा धक्का बसला आहे. जगातील सर्वांत मोठ्या लोकशाही देशाचा नेता जगातील सर्वांत क्रूर गुन्हेगाराची गळाभेट घेतो, हे पाहून दु:ख झाले,’’ अशी प्रतिक्रिया झेलेन्स्की यांनी ‘एक्स’वर व्यक्त केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar : रोहित तू थोडक्यात वाचलास.. वाकून नमस्कार करणाऱ्या रोहित पवारांना अजित दादांचा मिश्किल टोला

दाऊदने मला जीवे मारण्याची धमकी दिली, म्हणून...; Lalit Modi यांचा धक्कादायक खुलासा; म्हणाले, शाहरुख खान...

TRAI New Rules : मोठी बातमी! 1 डिसेंबरपासून OTP बंद होणार? ग्राहकांचा फायदा की नुकसान, नेमकं प्रकरण वाचा

Share Market Opening: शेअर बाजारात मोठी वाढ; निफ्टी 24,200च्या पार, सेन्सेक्स 1300 अंकांनी वर, कोणते शेअर चमकले?

Latest Maharashtra News Updates : नाना पटोले यांनी दिला काॅंग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा

SCROLL FOR NEXT