भारताच्या चांद्रयान ३ च्या यशस्वी मोहिमेनंतर आता ऑस्ट्रेलियाही आपलं यान चंद्रावर पाठवण्याच्या तयारी आहे. नासाच्या आर्टेमिस चांद्र मोहिमेसोबत ऑस्ट्रेलिया आपलं रोवर चंद्रावर पाठवणार आहे. ही मोहीम २०२६ पर्यंत पूर्ण होईल, असा अंदाज आहे. हा एक रोबोटिक रोवर असेल. या रोवरच्या माध्यमातून चंद्राच्या पृष्ठभागावरच्या मातीचा अभ्यास केला जाईल. ऑस्ट्रेलियन अंतराळ संशोधन संस्थेने ही घोषणा केली आहे.
ऑस्ट्रेलियन अंतराळ संशोधन संस्था अर्थात ASA ने नासासोबत भागीदारी करत ही मोहीम पूर्ण कऱण्याचं नियोजन केलं आहे. ऑस्ट्रेलिया आपल्या रोवरचं डिझाईन स्वतः करेल, निर्मितीही स्वतः करेल. ऑस्ट्रेलिया संपूर्ण जगामध्ये आपल्या रिमोट कम्युनिकेशन सिस्टीमसाठी ओळखला जातो. त्यामुळे ते रोवरपासून थेट संपर्क करण्याचाही प्रयत्न करेल.
या रोवरला इलॉन मस्कची कंपनी स्पेस एक्सच्या स्टारशीपच्या मदतीने किंवा फॉल्कन हेवी रॉकेटच्या साहाय्याने चंद्रावर पाठवलं जाईल. मातीचं सॅम्पल घेतल्यानंतर नासा याच्यापासून ऑक्सिजन मिळवण्याचा प्रयत्न करेल. जेणेकरून भविष्यात चंद्रावर जेव्हा माणूस जाईल तेव्हा तो मातीपासून ऑक्सिजन मिळवू शकेल.
ऑस्ट्रेलियाने अजून आपल्या रोवरचं नाव ठेवलेलं नाही. पण त्यांनी लोकांना या रोवरचं नाव ठेवण्यास सांगितलं आहे. त्यांनी ट्विट करून नावं मागवली आहेत. फक्त अट इतकीच की तुम्ही ऑस्ट्रेलियाचे नागरीक असावं. यासाठीची स्पर्धाही सुरू झाली आहे. नाव सुचवण्याची शेवटची तारीख २० ऑक्टोबर २०२३ ही असून ६ डिसेंबर २०२३ रोजी निवडलेल्या नावाची घोषणा केली जाईल.
NASA चं काय आहे नियोजन?
नासा या दशकाच्या शेवटापर्यंत चंद्रावर माणसांचा अधिवास निर्माण करण्याच्या प्रयत्नात आहे. चंद्राचा जो काही अभ्यास केला जाईल, त्याचा वापर नंतर मंगळावर मानवी अंतराळ मोहिमा पाठवण्यासाठी केला जाईल. नासाने गेल्या वर्षी आपली अर्टेमिस १ ही मोहीम यशस्वीरित्या लाँच केली होती. आता नासा अर्टेमिस २ मिशनच्या अंतर्गत चार अंतराळवीरांना चंद्रावर पाठवण्यास इच्छुक आहे. हे मिशन पुढच्या वर्षीच्या शेवटापर्यंत होईल, अशी शक्यता आहे.
त्यानंतर अर्टेमिस ३ मोहीम सुरू होईल. ही मोहीम चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर जाण्यासाठी असेल. ही मोहीम २०२५ किंवा २०२६ पर्यंत जाईल, अशी शक्यता आहे. नासा सध्या अनेक आंतरराष्ट्रीय करार आणि भागीदारी करत आहे. या मोहिमेमध्ये त्यांनी भारतालाही सहभागी करून घेतलं आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.