इस्त्राइल आणि दहशतवादी संघटना हमास यांच्यात मागील काही दिवसांपासून युद्ध सुरू आहे. या संघर्षात आतापर्यंत ७०० हून अधिक इस्त्राइली नागरीक आणि ४५० पेक्षा अधिक पॅलेस्टेनियन नागरिकांचा मृत्यू झाला आहे. तर हजारो लोक जखमी आणि बेघर झाले आहेत. यादरम्यान इस्त्राइलचे पंतप्रधान बेंजमिन नेतन्याहू यांनी राष्ट्राला संबोधित करताना हमासला गंभीर इशारा दिला.
हमासने युद्ध सुरू केलं, आता त्यांना युद्धाचे परिणाम भोगावे लागतील, हमास ही आयएसआयएस असून ज्या प्रकारे संपूर्ण जगाने आयएसआयएसला संपवले त्याच पद्धतीने आम्ही त्यांचा नायनाट करू अशा इशारा नेतन्याहू यांनी हमासला दिला आहे.
ते पुढे बोलताना म्हणाले की, आमच्या भागात अजूनही अनेक अतिरेकी आहेत आणि आम्ही त्यांना नष्ट करण्यासाठी काम करू, तसेच लेबनॉन आणि वेस्ट बँकला लागून असेल्या आमच्या सीमा मजबूत करण्यासाठी काम करू. यासोबतच युद्धात मोठ्या फरकाने विजय मिळण्यासाठी आम्हाला आंतरराष्ट्रीय समर्थनाची आवश्यकता असल्याचेही नेतन्याहू यावेळी म्हणाले.
युद्धाचा सामना करत असलेल्या इस्त्राइली जनतेला संबोधित करताना नेतन्याहू यांनी विरोधी पक्षाच्या नेत्यांना आणीबाणीच्या काळात आपत्कालीन आघाडी सरकार (Emergency Unity Government) स्थापन करण्याचे आवाहन देखील केलं. तसेच हमास ज्या ठिकाणाहून कार्य करते तो भाग नष्ट करण्यात येईल असे त्यांनी इस्त्राइली जनतेला सांगितलं.
इस्रायलमधील अंतर्गत विभागणी ही भूतकाळातील बाब असून गाझा पट्टीच्या आजूबाजूच्या शहरांमधून अतिरेक्यांचा खात्मा करणे हे आमचे पहिले पाऊल होते अशी माहिती देखील नेतन्याहू यांनी दिला. यावेळी त्यांनी इस्रायलला मिळालेल्या अभूतपूर्व आंतरराष्ट्रीय पाठिंब्याबद्दल आभार देखील व्यक्त केले.
इस्रायलमध्ये अजूनही अनेक पॅलेस्टिनी अतिरेकी आहेत. आम्ही आमच्या शत्रूंसोबत जे करू ते येणाऱ्या पिढ्या देखील लक्षात ठेवतील असा इशारा देखील त्यांनी दहशतवाद्यांना दिला. तसेच नेतन्याहू यांनी अपहरण झालेल्या आणि बेपत्ता असलेल्या नागरिकांसाठी सर्व ती मदत करणार असल्याचे देखील यावेळी सांगितले. आमच्यासमोर सध्या कठीण प्रसंग आला असून आम्ही जिंकण्याचा निर्धार केला असल्याचे देखील इस्त्राइलचे पंतप्रधान नेतन्याहू यावेळी म्हणाले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.