जेरुसलेम - इस्राईलने गाझापट्टीत जमिनीवरून थेट लष्करी कारवाईला वेग दिला असून शनिवारी रात्रभर येथे इस्रायली रणगाडे अक्षरशः आग ओकत होते. या हल्ल्यामुळे गाझापट्टीत वीज पुरवठा आणि इंटरनेट सेवा देखील ठप्प झाली असून वीस लाखांपेक्षाही अधिक लोकांशी कोणताही संपर्क प्रस्थापित होऊ शकलेला नाही. इस्राईलच्या लढाऊ विमानांनी गाझाच्या जमिनीखालील ‘हमास’च्या दहशतवाद्यांची तब्बल दीडशे ठाणी उद्ध्वस्त केल्याचे कळते.
गाझावर पूर्ण हल्ला करण्याची योजना इस्राईलच्या लष्कराने आखली असून कोणत्याही स्थितीमध्ये ‘हमास’च्या दहशतवाद्यांचा बिमोड करायचाच असा निर्धार इस्रायली लष्कराकडून करण्यात आला आहे. शनिवारी रात्रभर गाझापट्टीवर बाँबहल्ले सुरू राहिल्याने सर्वत्र भीतीचे वातावरण होते. पॅलस्टाईनमध्ये दूरसंचार सेवा पुरविणाऱ्या ‘पाल्टेल’ या समूहाने इस्राईलच्या बाँबहल्ल्यामुळे गाझातील इंटरनेट आणि दूरध्वनी सेवा पूर्णपणे बंद झाल्याचे सांगितले. ही दूरसंचार सेवा बंद झाल्यामुळे मृतांचा आणि जखमींचा आकडा देखील आपल्याला पूर्णपणे समजू शकणार नाही, असे सूत्रांकडून सांगण्यात आले.
‘हमास’चे नेटवर्क लक्ष्य
इस्रायली लष्कराचे प्रवक्ते रिअर ॲडमिरल. डॅनियल हगारी म्हणाले, ‘‘ आमच्या लष्कराने शुक्रवार सायंकाळपासूनच गाझातील हल्ल्याची तीव्रता वाढविली आहे. ‘हमास’चे सगळे नेटवर्कच आमच्या निशाण्यावर असून हे दहशतवादी लोकांमध्ये मिसळून काम करत असल्याने त्यांचे अस्तित्व देखील धोक्यात आले आहे.’’ इस्रायली लष्कराने काही केंद्रे आधीच निश्चित केली असून त्यांच्यावर नियोजबद्धरीतीने मारा सुरू आहे.
मोठ्या जीवितहानीचा दावा
इस्राईलने गाझा सीमेवर मोठ्या प्रमाणावर लष्कराची जमवाजमव केली असून कोणत्याही क्षणी व्यापक हल्ला होऊ शकतो, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. इस्राईलच्या हल्ल्यात गाझातील साडेसात हजार लोकांचा मृत्यू झाल्याचा दावा पॅलेस्टाईनकडून केला जात आहे. मृतांमध्ये साठ टक्के लहान बालके आणि महिला आहेत. ‘हमास’च्या हल्ल्यात आमचे दीड हजार लोक मरण पावल्याचे इस्राईलने म्हटले आहे.
युद्ध अधिक उग्र होणार
गाझात ‘हमास’च्या दहशतवाद्यांनी बोगद्यांमध्येच तळ ठोकल्याचा संशय व्यक्त केला जात असून हे बोगदेच नष्ट करण्याचा विडा इस्रायली लष्कराने उचलला आहे. इस्राईलच्या लष्कराला देखील ‘हमास’कडून तितकाच कडवा प्रतिकार होण्याची शक्यता व्यक्त केली जात असल्याने हे युद्ध आणखी उग्र रूप धारण करू शकते. अन्य अरब देशांनीही या संघर्षात उडी घेण्याचा इशारा दिला आहे.
तज्ज्ञ मार्गदर्शन करणार
या संघर्षामध्ये ज्यांनी आपले जवळचे नातलग गमावले आहेत त्यांना आधार देण्यासाठी फ्रेंच ज्युविश समुहाने एक वेगळी हेल्पलाइन सुरू करण्याची घोषणा केली आहे. या युद्धामुळे लोकांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण झाले असून त्यांना या धक्क्यातून सावरण्यासाठी अनेक मान्यवर तज्ज्ञ त्यांना मार्गदर्शन करणार आहेत. यामध्ये मानसोपचारतज्ज्ञांचा देखील समावेश असल्याचे समजते.
संघर्षाच्या आघाडीवर
इंडोनेशियात युद्धबंदीसाठी यूएनच्या दूतावासाबाहेर निदर्शने
न्यूयॉर्कमध्ये अमेरिकी नागरिकांचे युद्धविरामासाठी आंदोलन
गाझातील अनेक रुग्णालयांतील स्थिती हल्ल्यामुळे बिकट
पत्रकारांच्या सुरक्षेबाबत अमेरिकेच्या प्रेस ग्रुपकडून चिंता
इस्राईलसाठी आम्ही रेडलाईन आखणार नाही : व्हाइट हाउस
पोप फ्रान्सिस यांच्याकडून युद्ध पीडितांसाठी विशेष प्रार्थना
हमासचा हवाईदलप्रमुख ठार झाल्याचा दावा
इस्राईल आणि हमास यांच्यातील संघर्षाचा आजचा २२ वा दिवस होता. आमच्या लष्करी कारवाईमध्ये ‘हमास’च्या हवाईदलाचा प्रमुख इस्साम अबू रुकबेह याला ठार मारण्यात यश आल्याचे इस्रायली लष्कराकडून सांगण्यात आले. ‘हमास’ने ७ ऑक्टोबर रोजी इस्राईलवर केलेल्या हवाई हल्ल्यामागे रुकबेह याचाच हात असल्याचा आरोप केला जातो. पॅराग्लायडिंगच्या माध्यमातून हे दहशतवादी इस्राईलमध्ये उतरले होते, या हल्ल्याचे पूर्ण नियोजन रुकबेहने आखले होते.
लोकांची उपासमार
गाझापट्टीतील वीज पुरवठा ठप्प झाल्याने येथे अंधाराचे साम्राज्य निर्माण झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. घरातील खाद्यपदार्थ आणि अन्नधान्य देखील संपुष्टात आल्याने लोकांची उपासमार होऊ लागली आहे. अनेकांनी पॅलेस्टाईनमधून गाझातील नागरिकांशी दूरध्वनीवरून संवाद साधण्याचा प्रयत्न केला पण त्यातही त्यांना अपयश आले. गाझामध्ये मानवी हक्कांचे उल्लंघन होत असल्याचा आरोप विविध मानवाधिकार संघटनांकडून करण्यात आला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.