नोबेल पुरस्कार विजेती पाकिस्तानी मानवाधिकार कार्यकर्ता मलाला युसुफझाई हिच्यावर नऊ वर्षांपूर्वी पाकिस्तानी-तालिबानी दहशतवाद्याने जीवघेणा हल्ला केला होता. याच दहशतवाद्याने यंदा कोणतीही चूक होणार नाही, अशा शब्दांत मलाला ट्विटरवरुन जीवे मारण्याची धमकी दिली आहे.
धमकीच्या या मेसेजनंतर ट्विटरने हे ट्विट आणि संबंधित दहशतवाद्याचे अकाउंट दोन्ही कायमचं डिलिट केलं आहे. या धमकीबाबत स्वतः मलालाने ट्विट करुन माहिती दिली. मलालाने पाकिस्तानचे लष्करप्रमुख आणि पंतप्रधान इम्रान खान या दोघांना प्रश्न विचारला आहे की, "माझ्यावर हल्ला करणारा एहसानुल्लाह एहसान हा दहशतवादी सरकारी कोठडीतून कसा काय फरार झाला?"
सुरक्षा एजन्सीच्या घरातून गेला होता पळून
एहसानुल्लाह एहसान याला सन 2017 मध्ये अटक करण्यात आली होती. मात्र, पाकिस्तानच्या सुरक्षा एजन्सीने त्याला कैदेत ठेवलेल्या एका कथित सुरक्षित घरातून तो जानेवारी 2020 मध्ये पळून गेला होता. यावरुन एहसानुल्लाह एहसान याची अटक आणि फरार होणं या दोन्ही घटनांबाबत संशय व्यक्त केला जात आहे.
इम्रान खान सरकारचे ट्विटरला आदेश
एहसानुल्लाह पळून गेल्यानंतर त्याची एक मुलाखत प्रसिद्ध झाली होती. पाकिस्तानी पत्रकारांसोबत त्याने आपल्या ट्विटर अकाउंटवरुन संपर्क साधला होता. यामध्ये उर्दू भाषा संकटात असल्याचं त्यानं म्हटलं होतं. त्याचे एकापेक्षा अधिक ट्विटर अकाउंट होते. हे सर्व अकाउंट्स बंद करण्यात आले आहेत. मलालाला आलेल्या धमकीनंतर पंतप्रधान इम्रान खान यांचे सल्लागार रावोफ हसन यांनी म्हटलं की, "सरकार धमक्यांची चौकशी करत आहे. तसेच तात्काळ ट्विटरला हे अकाउंट बंद करण्याचे आदेश देण्यात आले आहेत."
मलालाला अशी दिली धमकी
एहसानुल्लाह एहसान हा तहरीक-ए-तालिबान या पाकिस्तानी-तालिबानी दहशतवादी संघटनेचा जुना सदस्य आहे. धमकी दिलेल्या ट्विटमध्ये एहसान याने मलालाला धमकी दिली की, "तीने आपल्या घरी परत यावं कारण मला तुझा आणि तुझ्या वडिलांचा हिशोब चुकता करायचा आहे. यावेळी कोणतीही चूक होणार नाही."
पाकिस्तानी सैन्याच्या शाळेवर केला होता हल्ला
एहसानुल्लाह एहसानवर पाकिस्तानी सैन्याच्या पब्लिक स्कूलवर 2014 मध्ये भीषण हल्ला केल्याचा आरोप आहे. या हल्ल्यामध्ये 134 मुलांचा मृत्यू झाला होता. मृत्यू झालेल्या मुलांमध्ये बहुतेक मुलं ही पाच वर्षे वयाची होती. त्याचबरोबर एहसान याच्यावर स्वात खोऱ्यात मलाला युसुफझाईवर हल्ला केल्याचा आरोपही आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.