नवी दिल्ली : कोरोना विषाणूच्या ओमिक्रॉन (Omicron Variant) या नव्या प्रकाराचा फैलाव जगात वेगाने होऊ लागला आहे. लस न घेतलेल्यांना त्याचा संसर्ग होण्याची शक्यता अधिक असली तरी लसीकरण (Vaccination) झालेल्या लोकांनाही ओमिक्रॉनची लागण होत आहे. असे असले तरी या विषाणूला दूर ठेवण्यासाठी लसीकरणाचा उपाय अजूनही प्रभावी असल्याचे मत जागतिक आरोग्य संघटनेच्या (डब्लूएचओ) मुख्य संशोधक डॉ. सौम्या स्वामिनाथन यांनी बुधवारी (ता.२९) स्पष्ट केले.
अनेक देशांमध्ये ओमिक्रॉनबाधित रुग्णांची संख्या वेगाने वाढत असली तरी तीव्रता अद्याप नव्या पातळीवर पोहोचलेली नाही, असे सांगत त्यांनी लसीकरणावर भर दिला. जर तुम्ही लस घेतलेली नाही तर कृपया लवकर डोस घ्या, असे आवाहन डॉ.स्वामिनाथन यांनी काल एका ट्विटद्वारे केले. ‘डब्लूएचओ’च्या व्हर्च्युअली झालेल्या पत्रकार परिषदेत त्या म्हणाल्या, ‘‘अपेक्षेप्रमाणे ‘टी’ पेशींची प्रतिकारशक्ती ओमिक्रॉनविरोधात खूपच परिणामकारक आहे.
त्यामुळे गंभीर आजारांपासून आपला बचाव होतो. लसीकरण किंवा पूर्वी होऊन केलेल्या कोरोना संसर्गामुळे मानवी शरीरातील ‘टी’ पेशींमधील प्रतिकारकता वाढली आहे.’’ लशींच्या परिणामकारकतेत वेगवेगळ्या लशींनुसार थोडाफार फरक असला तरी ‘‘डब्लूएचओ’ने तातडीच्या वापरासाठी मान्यता दिलेल्या लशींकडून आजारांवर मिळणारे संरक्षण हे उच्चमत असून डेल्टा प्रकारापर्यंत मृत्यूदरही त्यामुळे कमी होता, असेही त्यांनी सांगितले.
क्षीण प्रतिकारक्षमता
डॉ. स्वामिनाथन म्हणाल्या, ‘‘ओमिक्रॉनबद्दल पुरावे गोळा केले जात आहेत. त्यामुळे घाईत कोणताही निष्कर्ष काढणे योग्य होणार नाही. पण बहुतेक सर्व प्रयोगशाळांमधील अभ्यासानुसार ओमिक्रॉनमुळे प्रतिकारक्षमता क्षीण होते, असे दिसून आले आहे. ज्यांचे लसीकरण पूर्ण झाले आहे आणि ज्यांना आधी संसर्ग झाला आहे, अशांना ओमिक्रॉनची लागण होण्याचा धोका जास्त आहे, हे वैद्यकीय चाचण्यांमधून समजले आहे. ओमिक्रॉनचा संसर्ग लस घेतलेल्या आणि न घेतलेल्यांनाही होत असल्याने जगात याचा प्रादुर्भाव वाढत आहे. पण यावर लसीकरण हा एक प्रभावी उपाय असल्याचेही सिद्ध झाले आहे.’’
ओमिक्रॉनचा प्रसार व बचाव
शरीरातील प्रतिकारशक्तीवर मात करण्याची क्षमता
संरक्षणासाठी उच्च पातळीवरील प्रतिपिंडांची गरज
प्रतिकारशक्ती व रोगप्रतिकारक क्षमतेवर अधिक भर देणे आवश्यक
लशींच्या परिणामकारकता यावरही अवलंबून
वय, रुग्णालयात भरती करावे लागणार गंभीर आजार आदी जैविक घटक
इतर सहव्याधी, ज्यामुळे तुम्हाला संसर्गाची शक्यता जास्त असते
लसीकरण झाल्यानंतर प्रतिकारशक्तीत वाढ
ओमिक्रॉन लवकरच ‘डेल्टा’ची जागा घेणार
सिंगापूर : कोरोना विषाणूचा नवा आणि अधिक संसर्गजन्य प्रकार ओमिक्रॉन हा आगामी आठवडे किंवा महिन्यांत ‘डेल्टा’ची जागा घेईल, असा इशारा सिंगापूरमधील तज्ज्ञांनी दिला आहे. येथे बुधवारी (ता.२९) ओमिक्रॉनचे १७० रुग्ण आढळले आहेत.आफ्रिका वगळता अन्य खंडांमध्ये कोरोनाच्या डेल्टा प्रकाराचा फैलाव झालेला असून आता ओमिक्रॉन वेगाने पसरत आहे, असे डॉ. सेबास्टियन माउरेर-स्ट्रोह यांनी सांगितले. सिंगापूर सरकारच्या मालकीच्या ‘एजन्सी फॉर सायन्स, टेक्नॉलॉजी अँड रिसर्चर्स बायोइन्फर्मेटिक्स इन्स्टिट्यूट’चे चे कार्यकारी संचालक आहेत. गेल्या महिन्यापासून आतापर्यंत ओमिक्रॉनचा फैलावाचे प्रमाण ७ ते २७ टक्के आहे. सध्याच्या उपलब्ध माहितीनुसार ओमिक्रॉनच्या तुलनेत डेल्टाचा प्रसार कमी होण्याची शक्यता डॉ. माउरेर यांनी व्यक्त केल्याचे वृत्त ‘द स्ट्रेट टाइम्स’ने दिले आहे.
कोरोनामुक्त धोरणाबद्दल चिंता
बीजिंग : चीनमधील विविध प्रातांमध्ये कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढू लागल्याने कोरोनामुक्त धोरणाबद्दल चिंता व्यक्त होत आहे. फेब्रुवारीमध्ये होणाऱ्या हिवाळी ऑलिंपिक स्पर्धा लक्षात घेऊन चीनने कोरोनामुक्तीचे धोरण आखले आहे. मात्र देशात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असून अडीच हजारपेक्षा जास्त रुग्ण उपचार घेत आहेत. चीनमधील राष्ट्रीय आरोग्य आयोगाने गुरुवारी दिलेल्या माहितीनुसार कोरोनाचे नवे २०७ रुग्ण काल देशात आढळले. त्यातील १५६ स्थानिक संसर्गातून तर ५१ जणांना बाहेरून संसर्ग झाला आहे. रुग्णालयात दाखल दोन हजार ५६२ रुग्णांपैकी १५ जणांची स्थिती गंभीर आहे.
ब्रिटनमध्ये ॲस्ट्राझेनेका लशीची वर्षपूर्ती
लंडन : कोरोनाच्या संसर्गापासून बचाव करणाऱ्या ऑक्सफर्ड/ॲस्ट्राझेनेका लशीला मंजुरी मिळून एक वर्ष झाले आहे. ही वर्षपूर्ती ब्रिटनने गुरुवारी साजरी केली. भारतातील सीरम इन्स्टिट्यूटलाही कोव्हिशिल्डच्या उत्पादनास या काळात परवानगी देण्यात आली होती. ऑक्सफर्ड विद्यापीठाच्या शास्त्रज्ञांनी निर्माण केलेली आणि ॲस्ट्राझेनेकाने उत्पादित केलेल्या लशीमुळे कोरोनाविरोधात लढा देणे आणि हजारोंचे प्राण वाचविणे शक्य झाले, असे गौरवोद्गार ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी काढले. या दोन्ही संस्थांशिवाय ब्रिटन आणि संपूर्ण जगाला कोरोनाशी दोन हात करणे शक्य झाले नसते, असे ते म्हणाले. या लशीचे पाच कोटी डोस ब्रिटनमध्ये तर १७० देशांत २.५ अब्ज डोस देऊन नागरिकांचा बचाव केला, याचा आम्हाला अभिमान वाटत असल्याचे सांगून जॉन्सन यांनी ॲस्ट्राझेनेकाचे आभार मानले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.