डिसेंबर महिना हा जगभरात सुट्ट्यांचा महिना असतो. परदेशात राहणारे अनेक भारतीय ख्रिसमस (christmas) आणि नवीन वर्षाच्या सुटीत (new year) मायदेशी परततात. त्यामुळे याच सुटीच्या दिवशी देशांतर्गत प्रवासी देशाबरोबरच परदेशातही जातात. अशा स्थितीत विमान वाहतूक क्षेत्र आणि पर्यटन क्षेत्राला चांगला फायदा होतो. यामुळेच भारताने अलीकडेच १५ डिसेंबरपासून परदेशातील आंतरराष्ट्रीय उड्डाणे (International flights) सामान्य करण्याची घोषणा केली होती. मात्र, कोरोना विषाणूचा (Corona virus) झपाट्याने पसरणारा नवीन प्रकार ओमिक्रॉनचा (Omicron variant) धोका लक्षात घेऊन हा निर्णय पुढे ढकलण्यात आला आहे.
ओमिक्रॉनच्या पार्श्वभूमीवर हवाई वाहतूक क्षेत्र नियामक नागरी विमान वाहतूक महासंचालनालयने पुढील आदेशापर्यंत देशातून आंतरराष्ट्रीय उड्डाणे सामान्य करण्याचा निर्णय पुढे ढकलला आहे. यापूर्वी १५ डिसेंबरपासून ही उड्डाणे देशात सामान्य होणार होती. जागतिक स्तरावर ओमिक्रॉनचा वाढता धोका लक्षात घेता परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवले जात आहे. विमान वाहतूक क्षेत्रातील सर्व संबंधितांशी बोलून याबाबत योग्य तो निर्णय घेतला जाईल, असे नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने (Directorate General of Civil Aviation) आदेशात म्हटले आहे.
सिंगापूर, हाँगकाँग आणि मॉरिशस सारखे देशांना सुट्ट्यांमध्ये मोठ्या संख्येने भारतीय पर्यटक भेट देतात. दुसरीकडे, ब्रिटन आणि युरोपमधून या सुट्यांमध्ये घरी परतणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांची आणि नोकरी करणाऱ्यांची संख्या लक्षणीय आहे. त्याचबरोबर डिसेंबर महिन्यात ख्रिसमस आणि नवीन वर्षाच्या सुट्टीच्या निमित्ताने गोवा आणि किनारपट्टीच्या राज्यांमध्ये देशांतर्गत पर्यटन वाढते. मात्र, ओमिक्रॉनच्या धोक्यामुळे त्यात घट अपेक्षित आहे. अशा परिस्थितीत प्रवासी क्षेत्राला मोठा तोटा सहन करावा लागू शकतो.
आंतरराष्ट्रीय उड्डाणे दीड वर्षांपासून बंद
कोरोनामुळे २३ मार्च रोजी देशातील नियमित आंतरराष्ट्रीय उड्डाणे बंद करण्यात आली होती. अशा स्थितीत यंदा ख्रिसमस आणि नववर्षाच्या सुट्टीच्या निमित्ताने आंतरराष्ट्रीय उड्डाणे पुन्हा सुरू झाल्यामुळे विमान वाहतूक क्षेत्राला उत्पन्न अपेक्षित होते. मात्र, आता त्याला ब्रेक लागल्याचे दिसत आहे. गृह मंत्रालय, परराष्ट्र मंत्रालय, आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय यांच्याशी चर्चा केल्यानंतर सरकारने हा निर्णय घेतला आहे.
प्रवाशांसाठी कठोर नियम
ओमिक्रॉनमुळे सिक्कीमने अलीकडेच परदेशी प्रवाशांच्या वाहतुकीवर बंदी घातली आहे. त्याचबरोबर केंद्र सरकारने परदेशी प्रवाशांसाठी विशेषत: यूके, दक्षिण आफ्रिका, ब्राझील, बांगलादेश, बोत्सवाना, चीन, मॉरिशस, न्यूझीलंड, झिम्बाब्वे, सिंगापूर, हाँगकाँग आणि इस्राईल या देशांतून येणाऱ्या प्रवाशांसाठी कठोर नियम केले आहेत. याचा परिणाम प्रवासी उद्योगावरही होण्याची शक्यता आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.