Imran Khan sakal
ग्लोबल

मोदी, बायडेन फोन करत नाहीत; विरोधी नेत्या मरीयमची इम्रानवर टीका

‘मोदी फोन उचलत नाहीत, बायडेन तर फोनही करीत नाहीत’, परराष्ट्र धोरण अपयशी झाल्याचा ठपका

सकाळ वृत्तसेवा

फैसलाबाद ः ‘आयएसआय’ प्रमुखांच्या नियुक्तीवरून लष्कराशी पंगा घेतलेले पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांना घेरण्यासाठी विरोधक सज्ज झाले आहेत. परराष्ट्र धोरणाबाबत इम्रान सपशेल अपयशी ठरले असून नरेंद्र मोदी त्यांचा फोन उचलत नाहीत, तर ज्यो बायडेन फोनही करीत नाहीत, असा दावा विरोधी नेत्या मरीयम नवाझ यांनी केला.

पाकिस्तान डेमोक्रॅटिक मूव्हमेंट (पीडीएम) या सरकारविरोधी युतीने शनिवारी फैसलाबादमधील धोबी घाट परिसरात एक सभा घेतली. त्यात पाकिस्तान मुस्लीम लीगच्या (नवाझ) उपाध्यक्ष आणि माजी पंतप्रधान नवाझ शरीफ यांची कन्या मरीयम यांनी इम्रान यांच्यावर कडाडून टीका केली. त्यांनी नागरिकांना सरकारच्या विरोधात साद घालण्याचा प्रयत्न केला.

मरीयम म्हणाल्या की, सारे जग कोरोनाचा सामना करीत आहे, पण पाकिस्तानच्या जनतेला डेंगीने त्रस्त केले आहे. इम्रान यांचे सरकार या साथीचा सामना करण्यात अपयशी ठरले आहे. इम्रान यांनी मताच्या पावित्र्याचा कसा अनादर केला हे देशवासीयांना कळून चुकले आहेले.

इम्रान यांनी राष्ट्रीय उत्तरदायित्व आयोगाची ढाल पुढे करून राजकीय विरोधकांचा सूड घेतला आणि स्वतःवर उत्तरदायित्वाची वेळ आली तेव्हा कायद्यात दुरुस्ती केली, असा आरोपही मरीयम यांनी केला.

पँडोरा पेपर्स प्रकरणाबद्दल त्या म्हणाल्या की, ‘इम्रान यांच्या पीटीआय पक्षाचा (पाकिस्तान तेहरीक-ए-इन्साफ) पँडोरा पेपर्समध्ये अव्वल क्रमांक आहे, पण या गैरव्यवराहात इम्रान यांचे नाव नाही असे साऱ्या देशाला सांगण्यात आले.‘ चोरांच्या टोळीचा म्होरक्या प्रामाणिक असतो असे तुम्ही कधी ऐकले आहे का, असा परखड सवाल त्यांनी केला.

महागाईवरूनही टीका

मरीयम यांनी महागाईच्या मुद्द्यावरूनही इम्रान यांच्यावर टीका केली. त्यांनी सांगितले की, नवाझ शरीफ पंतप्रधान असताना साखरेचा दर ५० रुपये किलो इतका होता. हेच तीन वर्षांनी हा दर १२० रुपयांवर गेला आहे. वीजेचा दर प्रति युनिट १०-११ रुपयांवरून २५ रुपयांपर्यंत गेला आहे.

लोकशाही आघाडीचाही हल्लाबोल

पाकिस्तान डेमोक्रॅटिक मूव्हमेंट (पीडीएम) या लोकशाही आघाडीचे प्रमुख मौलाना फझलूर रेहमान यांचेही या सभेत भाषण झाले. इम्रान यांनी जनतेला खोटी आणि अवास्तव आश्वासने दिली, असा आरोप करून ते म्हणाले की, एक कोटी नोकऱ्या देऊ अशी गर्जना इम्रान यांनी केली. प्रत्यक्षात त्यांनी पाकिस्तानची अर्थव्यवस्था उद्ध्वस्त केली आणि लाखो नागरिकांना बेरोजगार बनविले.

या महिन्याच्या प्रारंभी मौलाना फझलूर यांनी सरकारविरोधी युती अत्यंत गांभीर्याने काम करीत असून इम्रान यांचे सरकार पाडण्याचे ध्येय साध्य करण्यासाठी भक्कम बनत आहे, असे जाहीर केले होते.

अकार्यक्षम शासकांनी देशाचे नुकसान केले आहे. सत्ताधारी नकारात्मक घोषणा देण्यात गुंतली आहेत. उत्तरदायित्वाचे नाटक संपले आहे आणि पीडीएम याचा तर्कशुद्ध शेवट करेल, असेही त्यांनी नमूद केले.

विरोधकांनी सभा घेण्याऐवजी आपले काम करावे अन्यथा देशवासीयांची निराशा होईल आणि त्याची परिणती रक्तपातात होईल असा इशाराही त्यांनी दिला.

आम्ही वेगळ्या ग्रहावरचे नाहीत

पेट्रोल, गॅसच्या किमती वाढण्यावरून सरकारवर होत असलेल्या टीकेला उत्तर देण्यासाठी माहिती मंत्री फवाद अहमद चौधरी यांनी अजब वक्तव्य केले. आम्ही मंत्री जणू काही पृथ्वीपासून वेगळ्या ग्रहावर राहातो आहोत, अशा पद्धतीने दरवाढीवरून अपप्रचार केला जातो, असे ते म्हणाले. अनुदान देऊन संपूर्ण देश चालविता येत नाही, असेही त्यांनी नमूद केले. जगभर पेट्रोल, गॅसच्या किमती वाढतात तेव्हा पाकिस्तानातही वाढ होते. जगात या किमती कमी झाल्यावर पाकिस्तानमध्येही होतील, असे सांगून त्यांनी, एक देश म्हणून साऱ्या जनतेने समस्यांचा सामना करावा, असे आवाहन केले.

"परदेशाच्या एका प्रमुखाने भेट म्हणून दिलेले महागडे घड्याळ इम्रान यांनी विकले. त्यांच्याइतका लोभी आणि मूर्ख माणूस मी माझ्या आयुष्यात पाहिला नाही."

- मौलाना फझलूर रेहमान

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shah-Yogi Maharashtra Rally : शहा अन् योगी महाराष्ट्रासाठी जीवाचं रान करणार! कोल्हापुरात मुक्काम, दुसऱ्या दिवशी चार सभा

Patan Assembly Election : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे महाविकास आघाडीच्या नेत्यांना खुले आव्हान, ते म्हणाले...

Parliament Session: संसदेचे हिवाळी अधिवेशन 25 नोव्हेंबरपासून, 'या' मुद्द्यांवरुन होणार घमासान

Olympic 2036 च्या आयोजनासाठी भारत सज्ज; IOC कडे पत्र पाठवून व्यक्त केली यजमानपदाची इच्छा

Latest Marathi News Updates live : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अंबाबाईचे दर्शन घेऊन सभेला करणार सुरुवात

SCROLL FOR NEXT