इस्लामाबाद - हिंसाचार, मतपेट्या पळविणे, निवडणूक अधिकाऱ्यांना दमदाटी, मोबाईल इंटरनेट बंदी आणि मतमोजणीला लागलेला प्रचंड विलंब या कारणांमुळेच मुख्यत: गाजत असलेल्या पाकिस्तानमधील सार्वत्रिक निवडणुकीत इम्रान खान यांच्या पाकिस्तान तेहरीके इन्साफ (पीटीआय) पक्षाने पुरस्कृत केलेले अपक्ष उमेदवार आघाडीवर असून पाकिस्तान मुस्लिम लीग (नवाज गट) आणि बिलावल भुट्टो यांच्या पाकिस्तान पीपल्स पार्टी (पीपीपी) या दोन बड्या पक्षांना त्यांनी पिछाडीवर टाकले आहे. मुस्लिम लीगने मात्र विजय मिळण्याबाबत विश्वास व्यक्त केला असून अनेक अपक्ष उमेदवार संपर्कात असल्याचा दावा केला आहे.
अनेक अडथळे पार केल्यानंतर पाकिस्तानमध्ये आठ फेब्रुवारीला निवडणूक जाहीर झाली होती. ही निवडणूकही पुढे ढकलावी लागण्याची चिन्हे असताना अखेर त्याच दिवशी मतदान घेण्यात निवडणूक आयोगाला यश आले. मतदानातही प्रचंड गोंधळ झाल्यानंतरही निवडणुकीचे नाट्य संपले नाही. मतमोजणीला अपेक्षेपेक्षा अधिक विलंब होत आज पहाटे तीन वाजता निकाल जाहीर होण्यास सुरुवात झाली.
सुरक्षेच्या कारणास्तव निवडणूक आयोगाने मोबाईल इंटरनेटवर बंदी घातल्याने नागरिकांना निकाल समजण्यात अडचणी येत होत्या. सध्या तुरुंगात असलेले इम्रान खान यांच्या पक्षाचे अनेक उमेदवार आघाडीवर असल्याचे चित्र निर्माण झाल्याने इम्रान समर्थकांनी जल्लोष करण्यास सुरुवात केली होती. इम्रान यांच्या पाकिस्तान तेहरीके इन्साफ पक्षाचे चिन्ह गोठविले असल्याने त्यांचे उमेदवार अपक्ष म्हणून उभे होते.
पाकिस्तानच्या नॅशनल असेंब्लीच्या २६६ जागांसाठी निवडणूक होत असून विजयासाठी किमान १३३ जागा जिंकणे आवश्यक आहे. निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, ‘पीटीआय’ला ९२, पाकिस्तान मुस्लिम लीगला ६३ आणि ‘पीपीपी’ला ५० जागा मिळाल्या होत्या.
सिंध प्रांतात पाकिस्तान पीपल्स पार्टीचे आणि पंजाबमध्ये पाकिस्तान मुस्लिम लीगचे प्राबल्य दिसून येत असून खैबर पख्तुन्ख्वामध्ये इम्रान समर्थक उमेदवारांनी बाजी मारल्याचे आतापर्यंतच्या निकालांवरून दिसून येत आहे. दोन्ही पक्षांनी निवडणुकीत विजय मिळाल्याचा दावा केला आहे.
प्रमुख घडामोडी
मतमोजणी केंद्रांवर ताबा मिळविण्याचे प्रकार
अनेक ठिकाणी मतपत्रिका पळविल्या
मोबाईल इंटरनेट सेवा बंद ठेवल्याने नागरिकांचा संताप
हिंसाचारात पंधराहून अधिक जणांचा मृत्यू
विदेशी निरीक्षकांची निवडणूक प्रक्रियेवर टीका
मतमोजणीला विलंब
पाकिस्तानमध्ये आजच संपूर्ण निकाल जाहीर होणे आवश्यक असताना रात्री उशिरापर्यंत मतमोजणी सुरू होती. अत्यंत कूर्मगतीने सुरू मतमोजणी सुरू असल्याने त्यात गैरप्रकार होत असल्याची शंका व्यक्त होत आहे. मात्र, मतमोजणी केंद्रावरील निकाल केंद्रीय कक्षाला कळविण्यासाठी विकसित केलेल्या ॲपमध्ये बिघाड झाल्याने निकाल जाहीर होण्यास उशीर लागत असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
प्रमुख विजयी
नवाज शरीफ, शाहबाज शरीफ, हमजा शरीफ, मरियम शरीफ या शरीफ कुटुंबातील सर्वांचा विजय झाला आहे. इम्रान खान आणि महंमद कुरेशी या दोन प्रमुख नेत्यांना निवडणूक लढण्यास बंदी केल्यानंतर ‘पीटीआय’चे अघोषित नेतृत्व करत असलेल्या गौहार अली खान आणि असद कैसर यांचाही विजय झाला आहे.
दिवंगत पंतप्रधान बेनझीर भुट्टो यांचे पती आणि पाकिस्तान पीपल्स पार्टीचे नेते असिफ अली झरदारी आणि त्यांचे पुत्र बिलावल भुट्टो यांचाही विजय झाला आहे. कुख्यात दहशतवादी हाफीज सईद याचा मुलगा ताल्हा सईद याचा पराभव झाला.
प्रांतिक निवडणुकांचेही निकाल
नॅशनल असेंब्लीच्या निवडणुकीबरोबरच पाकिस्तानमध्ये प्रांतिक निवडणुकाही झाल्या. या निवडणुकीत सिंध विधानसभेसाठीच्या ५३ जागांपैकी ४५ जागांवर ‘पीपीपी’पुरस्कृत अपक्ष उमेदवार आघाडीवर होते. खैबर पख्तुन्ख्वा प्रांतात (५० जागा) ‘पीटीआय’ ४५ जागांवर, तर पंजाबमध्ये मुस्लिम लीगने ३९ जागांवर विजय मिळविला आहे. येथेही इम्रान समर्थक ३३ अपक्ष आघाडीवर आहेत. बलुचिस्तान प्रांतातील सहा जागांचे निकाल रात्री उशिरापर्यंत जाहीर झाले नव्हते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.