न्यूयॉर्क - प्रसिद्ध उद्योगपती आणि सर्वांत श्रीमंत व्यक्तींपैकी एक असलेल्या एलॉन मस्क यांच्या टेस्ला कंपनीने बिटकॉइन या क्रिप्टोकरन्सीमध्ये दीड अब्ज डॉलरची गुंतवणूक केल्याने बिटकॉइनचे मूल्य १५ टक्क्यांनी वाढले. या वादग्रस्त चलनातील ही आतापर्यंतची सर्वोच्च वाढ आहे.
बिटकाइनच्या मागे आपले बळ उभी करणारी टेस्ला ही आता सर्वांत मोठी कंपनी ठरली आहे. टेस्लाने आपल्या विवरणपत्रामध्ये बिटकॉइनमध्ये दीड अब्ज डॉलरची गुंतवणूक केल्याचे उघड करताच या चलनाचे मूल्य प्रथमच ४४ हजार डॉलरवर गेले. आपल्या इलेक्ट्रिक मोटारीची खरेदी करणाऱ्यांकडून बिटकॉइनच्या स्वरुपात पैसे स्वीकारण्यास सुरुवात करणार असल्याचे ‘टेस्ला’ने म्हटले आहे. आर्थिक गैरव्यवहारांचा स्रोत बनू शकणाऱ्या आणि त्यामुळे अनेक अर्थतज्ज्ञांनी आणि देशांनी बहिष्कार घातलेल्या बिटकॉइनच्या मागे ‘टेस्ला’ने आपले आर्थिक बळ उभे केल्याने आंतरराष्ट्रीय बाजारात नवा संदेश गेला आहे. ‘एलॉन मस्क यांच्यासारखी व्यक्ती त्यांच्या कंपनीतील दीड अब्ज डॉलर बिटकॉइनमध्ये गुंतवत असेल तर या क्रिप्टोकरन्सीला मिळत असलेल्या मान्यतेचा अंदाज बांधता येतो. मस्क यांनी नवा मार्ग दाखवून दिला आहे,’ अशी प्रतिक्रिया लंडनमधील ‘नेक्सो’ कंपनीचे सहसंस्थापक अँटनी ट्रेन्चेव्ह यांनी दिली आहे. मस्क यांच्या या निर्णयाचा आदर्श ठेवत पुढील वर्षापर्यंत अनेक कंपन्या बिटकॉइनमध्ये गुंतवणूक करतील, असा अंदाजही त्यांनी व्यक्त केला.
बिटकॉइनच्या किमतीत वाढ झाली असली तरी हा फुगा लवकरच फुटेल, असाही अंदाज काही तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. मात्र, मस्क यांच्यासारख्या उद्योगपतींनी केलेली गुंतवणूक हा इतर लहान गुंतवणूकदारांसाठी आधार ठरण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
या कंपन्यांनीही केली गुंतवणूक
बिटकॉइनमध्ये आणखीही काही कंपन्यांनी मोठी गुंतवणूक केली आहे. मायक्रोस्ट्रेटेजी कंपनीने १.१ अब्ज डॉलर, तर स्क्वेअर कंपनीने ५ कोटी डॉलर बिटकॉइनमध्ये गुंतवले आहेत. ही केवळ सुरुवात असून आगामी काळात बिटकॉइन हेच आंतरराष्ट्रीय बाजारातील चलन असेल, असा अंदाज काही तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.