किव्ह : युक्रेनचे अध्यक्ष व्होलोदिमीर झेलेन्स्की यांनी देशाच्या प्रत्येक भागात सैन्य भरतीसाठी जबाबदार असलेल्या अधिकाऱ्यांना भ्रष्टाचाराच्या आरोपांवरून हटविले आहे. सैन्य अधिकाऱ्यांवरील असे आरोप देशद्रोह ठरु शकतो, असा इशारा त्यांनी दिला आहे.
‘‘आम्ही सर्व विभागीय सैन्य अधिकाऱ्यांना बडतर्फ करीत आहोत,’ अशी पोस्ट त्यांनी सोशल मीडियावर केली आहे. सैन्यदलातील वरिष्ठ नेतृत्वाशी झालेल्या बैठकीनंतर त्यांनी हे पाऊल उचलले. ‘युद्ध म्हणजे नेमके काय हे माहीत असलेल्या लोकांनी ही व्यवस्था चालवली पाहिजे. युद्धाच्या वेळी लाचखोरी आणि संशय हा देशद्रोह ठरू शकतो, असेही ते म्हणाले.
रशियाने ताब्यात घेतलेला भूभाग परत मिळविण्यासाठी त्यांच्या फौजांवर प्रतिहल्ले करण्याच्या उद्देशाने युक्रेनने आक्रमण तुकडीत भरती सुरू केली आहे. पण या विभागीय भरती केंद्रांच्या तपासणीदरम्यान कायद्याची अंमलबजावणी करणाऱ्या संस्थांनी भ्रष्टाचाराची प्रकरणे उघडकीस आणली.
युक्रेनमध्ये सैन्याची भरती हा एक महत्त्वाचा भाग असून त्यात चूक होत असल्याचे चौकशी पथकाच्या निदर्शनास आले होते. हे युक्रेनच्या राष्ट्रीय सुरक्षेला धोका पोहोचवणारे आहे आणि देशातील यंत्रणेवरील विश्वास उडण्यासारखे आहे, असेही झेलेन्स्की यांनी म्हटले आहे.
सैन्य भरती प्रक्रिया आणि युद्धकाळात नागरिकांना देशाबाहेर पाठविण्यात युक्रेनमधील अधिकाऱ्यांकडून अनियमितता झाली, असल्याचे देशात केलेल्या एका पाहणीत उघड झाले आहे. युद्ध सुरू झाले तेव्हा अपवाद वगळता पुरुषांना देश सोडण्यास मनाई होती.
पण आदेश डावलून काही जणांना देशाबाहेर पडण्यास मदत करण्यात आली होती, असे झेलेन्स्की यांनी स्पष्ट केले. भरती मंडळाच्या अधिकाऱ्यांवर लाच घेतल्याच्या संशयावरून ११२ खटले दाखल करण्यात आले आहेत. हा युद्धकाळात झालेला भ्रष्टाचार असल्याचेही त्यांनी सांगितले.
पाश्चिमात्य संघटना आग्रही
युरोपिय समुदायासारख्या पाश्चिमात्य संघटनांनी युक्रेनच्या सैन्यदलात सुधारणा करण्याची आग्रही भूमिका घेतलेली आहे. सैन्यातील भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी युक्रेनचे प्रयत्न हा त्याचाच एक भाग असल्याचे सांगितले जात आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.