काबूल : अफगाणिस्तानातील सत्तासूत्रे तालिबानने हाती घेतल्यापासून येथील नागरिकांना विविध समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावरुन मिळणाऱ्या मदतीचा ओघ कमी झाल्यामुळे आर्थिकदृष्ट्या अडचणी आलेल्या अफगाणिस्तानातून अजून एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. संयुक्त राष्ट्रांच्या ‘युनिसेफ’ या संस्थेने वर्तवलेल्या अंदाजानुसार यावर्षी पाच वर्षाखालील ११ लाख बालकांना कुपोषणाचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे.
तालिबानच्या हाती अफगाणिस्तानचा कारभार गेल्यापासून या देशाचे आणि जगाचे राजकीय संबंध तुटले आहेत. दहशतवाद्यांच्या हातात सूत्रे असलेल्या देशाला मदत करण्यास फारसे कोणीही तयार नाही. त्यामुळे अमेरिका आणि इतर देशांच्या मदतीवरच चालणाऱ्या या देशात आता आर्थिक चणचण निर्माण झाली असून अन्नधान्याची मोठी कमतरता भासत आहे. चार वर्षांपूर्वीही अफगाणिस्तानमध्ये कुपोषणाला सामोरे जावे लागत असलेल्या बालकांचे प्रमाण मोठे होते. आता मात्र त्यात दुपटीने वाढ होऊन पाच वर्षांखालील ११ लाखांहून अधिक बालकांसमोर कुपोषणाचा धोका निर्माण झाला आहे. अफगाणिस्तानात भूकबळी आणि कुपोषणामुळे इस्पितळात दाखल होणाऱ्या बालकांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याची माहिती संयुक्त राष्ट्रांतर्फे देण्यात आली आहे.
मदत करणेही अवघड
अफगाणिस्तानात तालिबानी राजवट आल्यापासून निर्माण झालेल्या अराजकतेमुळे या स्वयंसेवी संस्थांना मदतकार्य करणे दिवसेंदिवस अवघड होत चालले आहे. रशिया-युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर अन्न-धान्यांच्या वाढत्या किमती, आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरुन कमी झालेला मदतीचा ओघ यामुळे अफगाणिस्तान भोवतीचा कुपोषणाचा हा विळखा अधिक आवळला जात आहे. गेल्या वर्षीच्या आकडेवारीनुसार, अफगाणिस्तानातील लोकसंख्येच्या ५० टक्के लोक हे दारिद्र्यरेषेखाली जगत असून तेथील आर्थिक परिस्थीती अशीच ढासळत राहिल्यास यावर्षी हे प्रमाण ९७ टक्क्यांवर जाण्याची शक्यता आहे. या सर्व पार्श्र्वभूमीवर कुपोषीत बालकांसाठी युनिसेफच्या वतीने येथे एक हजार उपचार केंद्र चालवली जात आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.