संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेत (UNSC) भारताची गरज असल्याचं मत संयुक्त राष्ट्र महासभेचे अध्यक्ष साबा कोरोसी (UNGA Chief) यांनी व्यक्त केलं. सुरक्षा परिषदेत आणखी चांगल्या प्रतिनिधींची गरज आहे. विशेषतः अशा देशांची, ज्यांच्यावर शांती आणि लोककल्याणाची मोठी जबाबदारी आहे. यामुळेच भारताने या परिषदेचा स्थायी सदस्य होणं आवश्यक असल्याचं ते म्हणाले.
सोमवारी एएनआयला दिलेल्या एका मुलाखतीत त्यांनी हे मत व्यक्त केलं. ते म्हणाले, "सदस्य देशांमध्ये सध्या अशी चर्चा आहे, की सुरक्षा परिषदेवर अधिक प्रभावी प्रतिनिधींची गरज आहे. यामध्ये अशा देशांचा समावेश होतो, ज्यांच्यावर शांतता आणि लोककल्याणाची जबाबदारी आहे. जगाच्या भल्यासाठी आपलं मोठं योगदान देऊ शकेल अशा देशांमध्ये भारताचा नक्कीच समावेश होतो."
सुधारणेची गरज
कोरोसी म्हणाले, की जेव्हा UNSC ची स्थापना झाली, तेव्हा भारत मोठ्या देशांपैकी एक नव्हता. मात्र, सुरक्षा परिषदेमध्ये सुधारणा सुरू आहे. गेल्या १३ वर्षांपासून याबाबत सदस्य देशांमध्ये बोलणी सुरू आहे. ही नक्कीच खूप लांबलेली प्रक्रिया आहे. याची सगळ्यात पहिली चर्चा ४० वर्षांपूर्वी सुरू झाली होती. सुरक्षा परिषदेची कार्यपद्धती, सदस्यता, स्थायी सदस्य, व्हीटो अधिकार अशा अनेक बाबतीत सुधारणा गरजेची आहे. सदस्य देशांमध्ये याबाबत एकमत निर्माण झाले, तर नक्कीच सुरक्षा परिषदेमध्ये सुधारणा केली जाऊ शकते.
भारत सर्वात सक्रिय
सुरक्षा परिषदेमध्ये सुधारणेसाठी आवाज उठवणाऱ्या देशांमध्ये भारत अग्रगण्य आहे, असं कोरोसी यांनी यावेळी सांगितलं. भारत येत्या काही वर्षांमध्येच महासत्ता होऊ शकतो. लोकसंख्या, अर्थव्यवस्था, विज्ञान आणि उद्योग या सर्व गोष्टींमध्ये भारत वेगाने पुढे जात आहे, असं ते म्हणाले.
मोदींवर स्तुतीसुमने
यावेळी कोरोसी यांनी पंतप्रधान मोदींचंही कौतुक केलं. ते म्हणाले, "मी काही दिवसांपूर्वी नवी दिल्लीमध्ये पंतप्रधान मोदींना भेटलो होतो. आमच्या बैठकीदरम्यान माझ्या लक्षात आलं की ते एक दूरदृष्टी असणारे नेते आहेत. आधुनिक भारत कसा दिसायला हवा याबाबत त्यांचं मत अगदी स्पष्ट आणि परखड आहे. मला त्यांना भेटून भरपूर आनंद झाला. संयुक्त राष्ट्रांमध्ये त्यांना भरपूर मान मिळतो. अगदी कमी कालावधीमध्ये ते जगातील सर्वात सन्मानित नेत्यांपैकी एक झाले आहेत. भारत हा नक्कीच जगातील सर्वात मोठा देश आहे."
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.