US Presidential Election Esakal
ग्लोबल

US Presidential Election: कमला हॅरिस विरूद्ध डोनाल्ड ट्रम्प

US Presidential Election 2024: हॅरिस यांना वाढता पाठिंबा मिळत असून, निवडणुकीसाठी त्यांनी तब्बल 540 दशलक्ष डॉलर्सचा निधी उभा केला आहे. दुसरीकडे स्वतः अब्जाधीश असूनही ट्रम्प आजवर केवळ 269 दशलक्ष डॉलर्स निधी उभा करू शकलेत.

विजय नाईक,दिल्ली

गेल्या आठवड्यात शिकागोला डेमॉक्रॅटिक पक्षाच्या 19 ते 22 ऑगस्ट दरम्यान झालेल्या सम्मेलनात उप-राष्ट्राध्यक्ष कमला हॅरिस यांचे अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी पक्षाच्या अधिकृत उमेदवार म्हणून शिक्कामोर्तब झाले. त्यांना माजी अध्यक्ष बराक ओबामा त्यांची पत्नी मिशेल ओबामा, माजी अध्यक्ष बिल क्लिंटन व पत्नी हिलरी क्लिंटन यांनी जोरदार पाठिंबा दिला. सम्मेलनाला पाच हजार ते सात हजार समर्थक उपस्थित होते. हॅरिस यांना वाढता पाठिंबा मिळत असून, निवडणुकीसाठी त्यांनी तब्बल 540 दशलक्ष डॉलर्सचा निधी उभा केला आहे. दुसरीकडे स्वतः अब्जाधीश असूनही ट्रम्प आजवर केवळ 269 दशलक्ष डॉलर्स निधी उभा करू शकलेत. त्यांच्यावर त्यांच्याच रिपब्लिकन पक्षातील नेते नाराज असून, हॅरिस यांच्या सम्मेलनाला सहा रिपब्लिकन नेत्यांनी लावलेली उपस्थिती बरेच काही सांगून जाते.  

``अमेरिकेच्या अलीकडील इतिहासात येती निवडणूक अत्यंत अटीतटीची ठरणार आहे,’’ हे माजी अध्यक्ष बराक ओबामा यांनी आपल्या भाषणात सांगितले. ते म्हणाले, ``काही राज्ये अशी आहेत, की तिथं काहीही होऊ शकते.’’ याचा अर्थ, मिळाला तर निसटते यश मिळू शकते अथवा पराभवही होऊ शकतो. ``म्हणूनच, येत्या 69 दिवसात पक्षाच्या समर्थकांनी अगदी जोमाने काम केले पाहिजे. अमेरिकेत जबरदस्त धृवीकरण झाले आहे. त्यातून कमला हॅरिस व टिम वाल्झ यांना निवडून देण्यासाठी पक्षाची भूमिका अगदी तळागाळापर्यंत पोहोचविणे महत्वाचे आहे.’’

``द न्यू यार्क टाइम्स’’मध्ये प्रकाशित झालेल्या `कुक पॉलिटिकल रिपोर्ट’नुसार, ``अमेरिकेच्या 51 राज्यांपैकी  पेनसिल्वानिया, जॉर्जिया, नॉर्थ कॅरोलिना, मिशिगन, अरिझोना, विस्कॉन्सिन व नेवाडा या राज्यांमध्ये खऱ्या अर्थाने दोन्ही पक्षात जोरदार चुरस होईल. या सात राज्यांनी जोसेफ बायडन यांना 2020 च्या अध्यक्षीय निवडणुकात साथ दिली होती. पण, आता समर्थनासाठी कमला हॅरिस व डोनाल्ड ट्रम्प यांना मतदारांना आपापल्याकडे वळविण्यासाठी जबरदस्त प्रयत्न करावे लागतील. हॅरिस यांना जिंकण्यासाठी या `टॉस अप’ राज्यात 44 इलेक्टोरल मते मिळवावी लागतील, तर ट्रम्प यांना 51 इलेक्टोरल मतांची आवश्यकता आहे. या व्यतिरिक्त मिनेसोटा, नेब्रास्का, न्यू हॉम्पशायर, मेन, व्हर्जिनिया ही राज्ये डेमॉक्रॅटिक पक्षाकडे, तर टेक्सास, फ्लॉरिडा ही रिपब्लिकन पक्षाकडे झुकलेली आहेत.

अमेरिकेत प्रचाराची धुमश्चक्री सुरू झाली आहे. डोनाल्ड ट्रम्प यांच्या प्रचाराने ताळतंत्र सोडले आहे. हॅरिस व वाल्झ यांच्यावर ते खालच्या पातळीवर जाऊन आरोप करीत आहे. खोटी माहिती पसरवित आहेत. त्यामुळे गेल्या आठवड्यात काही मवाळ रिपब्लिकन नेते त्यांना सोडून गेले. येत्या 10 सप्टेंबर रोजी `अमेरिकन ब्रॉडकास्टींग कार्पोरेशनच्या (एबीसी)’ वाहिनीवर या दोघांची समोरासमोर चर्चा होण्याची शक्यता असल्याने हॅरिस यांना चितपट करण्यासाठी ट्रम्प यांनी हवाईच्या माजी हिंदू सिनेटर तुलसी गॅबार्ड यांचे साह्य घेतले आहे. यापूर्वी हॅरिस यांच्याबरोबर गॅबार्ड यांची जाहीर चर्चा  झाली होती, त्यात गॅबार्ड यांचे पारडे जड झाले होते.

हॅरिस या भारतीय वंशाच्या अमेरिकन, तर गॅबार्ड या हिंदू धर्म स्वीकारलेल्या सामोआ अमेरिकन. 2022 पर्यंत त्या डेमॉक्रॅटिक पक्षाच्या  होत्या. परंतु, राष्ट्रीय सुरक्षेच्या प्रश्नावरून मतभेद होऊन ऑक्टोबर 2022 मध्ये त्यांनी पक्षाला रामराम ठोकला व आपण स्वतंत्र असल्याचे घोषित केले. प्रचाराच्या अयैन धामधुमीत गॅबार्ड यांनी दाखविलेल्या पाठिंब्याने ट्रम्प यांना चांगला टेकू मिळालाय. ट्रम्प यांनी तत्काळ गॅबार्ड व रॉबर्ट एम केनेडी यांना अध्यक्षीय संक्रमण गटाचे उपाध्यक्ष म्हणून नेमूनही टाकले. गॅबार्ड यांनी या पूर्वी चार वेळा डेमॉक्रॅटिक पक्षाच्या सिनेटर म्हणून हवाईचे प्रतिनिधित्व केले होते.

`मेक अमेरिका ग्रेट अगेन (एमएजीए- मागा)’ ही घोषणा देणारे ट्रम्प हे ``कमला हॅरिस या डावीकडे झुकलेल्या  कम्युनिस्ट आहेत,’’ असा प्रचार करीत आहेत. याच प्रकारचा प्रचार बराक ओबामा यांच्याबाबतीत झाला होता. पण अध्यक्ष झाल्यावर रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन व उत्तर कोरियाचे अध्यक्ष किंम जोंग उन या कट्टर कम्युनिस्टांच्या गळ्यात गळे घालणारे खुद् ट्रम्प हेच होते. त्यामुळे, त्यांच्या प्रचारातील खोटेपणा स्पष्ट होतो. 

हॅरिस यांच्या समर्थकांनी काढलेली दोन व्यंगचित्रे 27 ऑगस्ट रोजी `द टाईम्स ऑफ इंडिया’मध्ये प्रसिद्ध झालीत. एकात ``प्रॉसेक्यूटर (अभियोक्ता- फिर्यादी) व्हर्सेस द फेलन (अपराधी)’’ असे शब्द असून, ``द फाईट फॉर अमेरिका’’ या मथळ्याखाली आक्रमक पवित्र्यात उभ्या असलेल्या तरूण कमला हॅरिस व वार्धक्याकडे झुकलेले डोनाल्ड ट्रम्प दिसतात. दुसऱ्या चित्रात, ट्रम्प हे कोंबडा असून त्यांच्या हातात असलेल्या फलकावर ``आय एम अफ्रेड ऑफ कमला’’ असा फलक दिसत आहे.

वॉशिग्टनहून चिदानंद राजघट्टा यांच्या बातमीत म्हटले आहे, की एच डब्ल्यू बुश व जॉर्ज डब्ल्यू बुश या रिपब्लिकन अध्यक्षांच्या व मिट रोमनी व जॉन मॅकेन यांच्याबरोबर काम करणाऱ्या तब्बल 200 उच्चाधिकाऱ्यांनी कमला हॅरिस यांना पाठिंबा देणाऱ्या निवेदनावर सह्या केल्या आहेत.

अध्यक्ष पदाच्या चुरशीतील गेल्या निवडणुकीतील डेमॉक्रॅटिक पक्षाचे उमेदवार बर्नी सॅंडर्स यांनी एका इ-मेलमध्ये म्हटले आहे, ``ट्रम्प हे पॅथॉलॉलिजक लायर ( खोटार्डे मनोरूग्ण) आहेत. त्यामुळे ही निवडणूक सामान्य नसेल. ट्रम्प यांच्यावर 34 गुन्ह्यात `अपराधी’ म्हणून ठपका आहे. त्यात लैंगिक अपराधांसह उद्योगपती म्हणून केलेल्या गैरव्यवहांचे तब्बल 4 हजार खटले त्यांच्यावर दाखल झालेत. त्यांच्यात शून्य विश्वासार्हता आहे. ``मिशिगन येथे झालेल्या हॅरिस-वाल्ड्झ यांच्या रॅलीला कुणी आले नाही,’’ असे ट्रम्प म्हणतात. परंतु, तिचे प्रसारण सर्व वाहिन्यांवरून झाल्याने त्यांचे पितळ उघडे पडले.

हॅरिस यांनी शिकागो सम्मेलनात केलेल्या भाषणात, ``अमेरिकेतील लोकशाही व व्यक्तिस्वातंत्र्य टिकवून ठेवणे,   मध्यम वर्गाला सर्वाधिक प्राधान्य देणे, त्यांच्या दैनंदिन गरजा भागविणे, आरोग्य सेवा व गृहनिर्माण करणे  बेरोजगारी घटविणे, सीमासुरक्षेसाठी कायदा करणे, अमेरिका हा स्थलांतरितांचा देश असल्याने त्यांना प्रोत्साहन देणे, जागतिक सुरक्षेसाठी अमेरिकेला शस्त्रसिद्ध करणे, नाटो, युक्रेन व इस्त्राइल यांना पाठिंबा देतानाच गाझामध्ये शांततेच्या दृष्टीने समझोता घडवून आणण्यासाठी मी कटीबद्ध राहीन,`` अशी आश्वासने दिली. त्याचबरोबर महिलांना आपल्या शारिरिक स्वास्थ्याचे स्वातंत्र्य देण्यावर भर दिला.

ट्रम्प सत्तेवर आल्यास काय होईल याबाबत इशारेही दिले. त्या म्हणाल्या, ``ट्रम्प यांना पुन्हा व्हाईट हाऊसमध्ये पाठविल्याचे देशावर व जगावर गंभीर परिणाम होतील. त्याची परिणती बेबंदशाही, एकाधिकारशाहीत होईल. गेल्यावेळी त्यांचा पराभव झाला, तेव्हा त्यांनी चिथावणी देऊन समर्थकांना कॅपिटोल हिलवर शसस्त्र हल्ला करण्यास प्रोत्साहन दिले होते. ट्रम्प यांच्या निकटवर्तियांनी तयार केलेल्या प्रॉजेक्ट 2025 नुसार, अमेरिकेला भूतकाळाकडे नेले जाईल, सामाजिक व आरोग्य विषयक सुरक्षा धोक्यात येईल. मध्यमवर्गावरील कर वाढतील व त्याचा लाभ ट्रम्प यांच्या अब्जाधिश मित्रांना होईल. श्रीमंताना देण्यात येणाऱ्या करसुटीमुळे अमेरिकेवर तब्बल 5 ट्रिलियन (महापद्म) डॉलर्स कराचा बोजा वाढेल. विक्रीकर वाढेल व वर्षाकाठी त्याचा किमान चार हजार डॉलर्सचा बोजा मध्यमवर्गीय कुटुंबांना सहन करावा लागेल. ट्रम्प महिलांचा गर्भपातविषयक अधिकार काढून घेतील. बंदुकधाऱ्यांचा हिंसाचार अधिक वाढेल. उलट महिलांना जननक्षमतेविषयी अधिकारांना कायम करण्यासाठी मी विधेयक आणीन,’’असे आश्वासन हॅरिस यांनी दिले.

प्रचारसभातून ट्रम्प हे हॅरिस यांच्यावर वैयक्तिक हल्ला चढवित असून, ``त्या कशा दिसतात, त्यांच्यापेक्षा मी किती छान दिसतो. एके ठिकाणी ते म्हणाले, ``टाईम’ नियतकालिकाने त्यांचे छायाचित्र असे छापले, की त्या जणू (हॅलिवुडच्या) सोफिया लॉरेन वा एलिझाबेथ टेलर आहेत. त्यांचे स्केच हे माझी पत्नी मेलनियासारखे दिसते. हॅरिस कृष्णवर्णीय आहेत,’’ असा प्रचार ते व  रिपब्लिकन पक्ष करीत असून, श्वेतवर्णियांना चिथाविले जात आहे. ``व्हाईट्स विरूदध ब्लॅक्स’’ असा लढा निर्माण करण्याचा त्यांचा सतत प्रयत्न चालला आहे. आणखी एक प्रश्न आहे, तो काही महिन्यापूर्वी झालेल्या प्राणघातक हल्ल्याची सहानुभूती ट्रम्प यांना मिळेल काय व त्याचे मतात रूपांतर होईल काय? भारतीय वंशाच्या हॅरिस  यांच्यावर टीका करताना त्यांच्या उपाध्यक्ष पदाचे उमेदवार जे.डी व्हान्स यांची पत्नी उषा (चिलुकुरी) व्हान्स याही भारतीय वंशाच्या आहेत, याची जाणीव त्यांना ठेवावी लागेल.

अध्यक्ष असताना त्यांनी आपल्या समर्थकांना सर्वोच्च न्यायालयात न्यायाधीशपदी नेमल्याने ते सत्तेत आल्यास त्यांच्या मनमानीला सीमा राहाणार नाही, असे मानले जाते. ``ते अध्यक्ष झाल्यास त्यांना, अथवा भावी अध्यक्षांना कोणत्याही गुन्ह्यासाठी दोषी ठरविले जाणार नाही,’’ असे अभय सर्वोच्च न्यायालयाने दिल्याने अमेरिकेच्या लोकशाहीसाठी सर्वात घातक पायंडा पडणार आहे. त्याचा गैरफायदा ट्रम्प घेण्याची शक्यता अधिक. म्हणूनच, येत्या निवडणुका अमेरिका व जगासाठी अत्यंत महत्वाच्या ठरणार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manipur Politics: मणिपूरमध्ये भाजप सरकार पडणार? मोठ्या पक्षानं पाठिंबा काढून घेतला, अडचणी वाढल्या!

Viral Video: तू T20 संघात राहण्यासाठी पात्र नाहीस... Babar Azam ला फॅन्सने तोंडावर अपमान करताच राग अनावर

Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंनी पंकजा मुंडेंचे मानले जाहीर आभार ! म्हणाले, तू महाराष्ट्राच्या डोळयावरची पट्टी काढली अन् ...

फायर नहीं वाइल्ड फायर..! बहुप्रतिक्षित Pushpa 2 चा Trailer रिलीज; पण लाँचसाठी पाटणाची निवड का केली?

Baba Siddique Murder Case : बाबा सिद्दीकी हत्याकांडातील आरोपी सलमानभाई वोहरा पोलिसांच्या जाळ्यात

SCROLL FOR NEXT