वॉशिंग्टन : इराणच्या चाबहार बंदराचे कामकाज दहा वर्षांसाठी चालविण्याचा करार भारताने केला आहे. भारत आणि इराण यांच्यातील चांगले संबंध टिकून आहेत, हे या करारावरून स्पष्ट झाले आहे. अमेरिकेने या करारावरून भारताला अप्रत्यक्ष इशारा दिला. इराणबरोबर व्यापार करणाऱ्या कोणत्याही देशाने निर्बंधांना सामोरे जाण्याची तयारी ठेवावी, असे म्हटले आहे.
इंडिया पोर्ट्स ग्लोबल लिमिटेड आणि इराणची पोर्ट्स अँड मेरीटाइम ऑर्गनायझेशन या कंपन्यांमध्ये सोमवारी झालेल्या या करारावेळी भारतातर्फे बंदरे, जहाजबांधणी आणि जलमार्ग मंत्री सर्वानंद सोनोवाल यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळ उपस्थित होते.
इराणच्या आग्नेय टोकाला असलेल्या चाबहार बंदराच्या काही भागाच्या विकासाचे काम भारताकडून आधीपासूनच सुरू आहे. याद्वारे इराण, अफगाणिस्तान आणि मध्य आशियातील देशांशी व्यापार वाढविण्याचा भारताचा प्रयत्न आहे. नव्या करारामुळे पाकिस्तानला टाळून इराणमार्गे दक्षिण आशिया आणि मध्य आशियाबरोबरील व्यापारासाठीचा मार्ग भारताला खुला होणार आहे.
अफगाणिस्तान व मध्य आशियातील देशांबरोबर व्यापार करण्यासाठी भारताला इराणद्वारे रस्ते आणि रेल्वे मार्गांचाही वापर करता येणार आहे. अमेरिकेने या कराराबद्दल नाराजी व्यक्त केली. ‘भारत व इराणदरम्यान झालेल्या कराराची आम्हाला कल्पना आहे. भारताने याबाबतचे त्यांचे धोरण स्पष्ट करण्याची आम्ही वाट पाहू. इराणवरील आमचे निर्बंध कायम आहेत व त्यामुळे इराणबरोबर करार करणाऱ्यांनी निर्बंधांना सामोरे जाण्याची तयारी ठेवावी,’ असे अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते वेदांत पटेल यांनी म्हटले आहे.
भारताचे यश
अमेरिका आणि इराण यांच्यात कट्टर शत्रुत्व आहे. तरीही, अमेरिकेचा अत्यंत जवळचा भागीदार देश असलेल्या भारताबरोबर दहा वर्षे इतक्या दीर्घ कालावधीसाठीचा करार करण्याची तयारी इराणने दाखविली आहे. या करारानुसार भारत या बंदराच्या विकासासाठी १२ कोटी डॉलर गुंतवणार आहे. तसेच, दोन्ही देशांना फायदेशीर ठरणाऱ्या प्रकल्पांसाठीही २.५ कोटी डॉलरची मदत भारताने इराणला देऊ केली आहे.
अमेरिकेचे शत्रुत्व असलेल्या इराण, रशियाबरोबरच नव्हे, तर इराणचे शत्रुत्व असलेल्या इस्राईलबरोबरही भारताचे चांगले संबंध आहेत, हे भारताचे राजनैतिक यश मानले जात आहे. युक्रेन युद्धानंतरही रशियाकडून तेलखरेदी करण्यास अमेरिकेने भारताला विरोध केला होता.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.