ग्लोबल

Israel Palestine Conflict : पॅलेस्टाईन-इस्त्राईल वादाचे नक्की परिणाम काय होणार ?

विनोद राऊत

पॅलेस्टाईनची दहशतवादी संघटना ‘हमास’ने आज पहाटे इस्राईलवर हल्ला केला. गेल्या ३० वर्षांत इस्राईलवर एवढा सुनियोजित हल्ला झाला नाही. यासंदर्भात इस्राईलच्या बेन गुरियन विद्यापीठात विझिटिंग प्रोफेसर खिंवराज जांगिड आणि आंतरराष्ट्रीय अभ्यासक सुधिंद्र कुलकर्णी याच्याशी संवाद साधून, इस्राईल-पॅलेस्टाईन संघर्षाचे पुढचे चित्र काय असेल ते जाणून घेतले आहे.

इस्राईलवरचा हा हल्ला भीषण का मानला जातो?

गेल्या २० ते २५ वर्षांत इस्राईलवर या प्रकारचा अभूतपूर्व आणि सुनियोजित हल्ला झाला नाही. या वेळी इस्लामिक जिहाद आणि हमास या दोन सघटनांनी एकत्र येऊन हा हल्ला केला आहे. त्यासाठी इराणकडून मदत मिळाली आहे. आतापर्यंत पॅलेस्टाईनकडून डागले जाणारे रॉकेट आर्यन डोमच्या माध्यमातून नष्ट केले जात होते.

मात्र पहिल्यांदा हमास समुद्री आणि रस्ते मार्गे थेट इस्राईलच्या सीमेत घुसला आहे. गेल्या २० वर्षांत इस्राईलच्या अभेद्य सीमेत पहिल्यांदा कुणी तरी लष्करी वाहनांसह घुसखोरी केली आहे. दक्षिण इस्राईलमध्ये थेट घुसून त्यांनी १०० च्या वर नागरिकांना ठार केले. शेकडोंना जखमी केले. याशिवाय मृतदेह आणि शेकडो इस्राईल नागरिकांना त्यांनी ताब्यात घेतले आहे.

या हल्ल्यामागची कारणे

सौदी अरेबिया आणि इस्राईलमध्ये संबंध पुनर्प्रस्थापित करण्याचा करार अंतिम टप्प्यात होता. यापूर्वी संयुक्त अरब अमिरात, जॉर्डन, कतार, इजिप्तपासून सर्वांनी इस्राईलसोबत राजनैतिक संबंध प्रत्यक्ष, अप्रत्यक्षपणे प्रस्थापित केले आहेत. सौदी अरेबिया आणि इस्राईलचे संबंध सामान्य होण्यात सत्ताधारी पक्ष असलेल्या ‘फताह’ने प्रमुख भूमिका बजावली. सौदी-इस्राईलचा शांतता करार झाला असता पॅलेस्टाईनच्या हमास, इस्लामिक जिहाद या संघटनेचे अस्तित्व, हेतू समाप्त झाला असता. शिवाय, इराणची अडचण झाली असती. त्यामुळे इराणने हिजबुल्लाच्या माध्यमातून हे घडवून आणले.

इस्राईलसाठी हा हल्ला धक्का का आहे?

आपल्या सीमा अभेद्य ठेवणाऱ्या आणि २४ तास लष्करी तयारी असणाऱ्या इस्राईलसारख्या देशात हा हल्ला होणे ही गंभीर बाब मानली जाते. हल्ल्याला काही तास उलटून गेलेत; मात्र नेमके किती नागरिक मृत्युमूखी पडले, किती जखमी आणि किती लोकांचे अपहरण झाले, याचा अंदाजही इस्राईलच्या सुरक्षा यंत्रणांना अजून आलेला नाही. इस्राईलमध्ये धार्मिक सुट्ट्या सुरू आहेत. शिवाय, पंतप्रधान बेंजामीन नेतान्याहू यांच्याविरोधातील असहकार आंदोलनामुळे लष्करात वॉलिंटियर सेवा देण्याचे प्रमाणही अर्ध्यावर आले आहे. त्यामुळे ही अभूतपूर्व परिस्थिती उद्भवली. मोसादसारख्या गुप्तचर यंत्रणेचे हे अपयश आहे. शिवाय, हल्लेखोरांना तोंड देऊ शकले नाही हे लष्कराचे अपयश आहे.

इस्राईल पुढे काय करेल?

या वेळी इस्राईलवर हे युद्ध थोपवले गेले आहे. इस्राईलपुढे काही पर्याय आहेत. त्यात एक म्हणजे पॅलेस्टाईनवर पूर्ण शक्तिनिशी लष्करी हल्ला चढवणे; मात्र हमासने इस्राईलच्या शेकडो नागरिकांना बंदी बनवले आहे. त्यांना सोडवणे ही इस्राईलपुढे प्राथमिकता असणार आहे. शिवाय ‘हमास’ने इस्राईलच्या तुरुंगातील अटकेत असलेल्या सर्व दहशतवाद्यांना सोडण्याची मागणी केली आहे. हे बघता पॅलेस्टाईनवर हल्ला चढवणे एवढे सोपे नाही. इस्राईल नेतृत्वाला पहिले हमासशी बोलणी करावी लागेल. दुसरी बाब म्हणजे वेस्ट बँकप्रमाणे गाझा पट्टी ताब्यात घेण्याच्या पर्यायावार इस्राईलच्या नेतृत्वात विचारमंथन सुरू आहे; मात्र सध्याची परिस्थितीत बघता ते कामही सोपे नाही.

बेंजामिन नेतान्याहू हे मजबूत होतील

न्यायालयीन सुधारणा विधेयकामुळे नेतान्याहू यांनी आपल्या पायावर धोंडा पाडून घेतला आहे. देशात त्यांच्याविरुद्ध अभूतपूर्व असहकार आंदोलन सुरू आहे. या हल्ल्यामुळे ते मजबूत होतील असे अनेकांना वाटते; मात्र इस्राईलमध्ये नेतान्याहू यांना ‘मिस्टर सेक्युरिटी’ असे म्हटले जाते. देशाच्या मजबूत सुरक्षेच्या नावाखाली ते कडवे उजवे सरकार चालवत आहेत. हा हल्ला ते पंतप्रधान असताना झाला आहे. दुसरीकडे इस्राईलचे संरक्षण मंत्री सातत्याने देशांतर्गत फुटीमुळे देशाची सुरक्षा धोक्यात आल्याचे सातत्याने सांगत होते. त्यामुळे या परिस्थितीचा फायदा या वेळी नेतान्याहू यांना होणार नाही. ते मिस्टर खलनायक ठरणार आहेत.

पॅलेस्टाईनवरच्या प्रतिहल्ल्याचे परिणाम

एक तर हमासच्या या हल्ल्यामुळे सामान्य इस्रायली नागरिकांच्या मानसिकतेवर प्रंचड आघात झाला आहे. त्यांना आपण पहिल्यासारखे सुरक्षित नसल्याचे वाटते. दुसरी बाब म्हणजे पॅलेस्टाईनमध्ये या वेळी अधिक रक्तपात झाला तर मध्यपूर्वेतील सौदी अरेबिया, इजिप्त, कतारसह अनेक देशांना इस्राईलशी शांतता करार अबाधित ठेवणे कठीण होईल. यामध्ये हमास, इस्लामिक जिहाद आणि हिजबुल्ला या संघटना पुन्हा प्रबळ होण्याची भीती आहे. शिवाय, हे युद्ध लांबल्यास जगभरातील जिहादी संघटना यामध्ये उतरण्याची शक्यता आहे.

या वादावर कायस्वरूपी तोडगा काय?

जोपर्यंत ‘टू स्टेस्ट सोल्युशन’ अर्थातच पॅलेस्टाईनचे स्वतंत्र देश म्हणून अस्तित्व मान्य केले जात नाही, तोपर्यंत पॅलेस्टाईन आणि इस्राईलमधला संघर्ष, हिंसाचार आणि द्वेष थांबणार नाही. यासाठी अमेरिका, युरोपियन महासंघ, चीन, रशियासह मध्य-पूर्व देशांनी पुढाकार घायला पाहिजे. भारतानेदेखील दोन राष्ट्राच्या तोडग्याचे कायम समर्थन केले आहे. या वेळी ‘हमास’ माघार घेईलही. तात्पुरती शांतता प्रस्थापित होईल; मात्र प्रश्न कायमचा सुटणार नाही. ‘हमास’ परत हल्ला चढवेल. इराण आपल्या कारवाया करत राहणार. हा हिंसाचार थांबणार नाही.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Border Gavaskar Trophy: ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी भारतीय संघ जाहीर, Shami नाहीच; KL Rahulला अभय

Porsche Car Accident : डॉ. तावरेसह हाळनोरविरुद्ध फौजदारी खटला चालणार; राज्य सरकारकडून मंजुरी

South West Nagpur Assembly Election : विरोधकांसाठी आमच्या ‘लाडक्या बहिणी’च पुरेशा; देवेंद्र फडणवीस यांची टीका

Imtiaz Jaleel: "ज्यानं मला पाडलं, त्याला पाडण्यासाठी मी काय करतो बघाच"; इम्तियाज जलील यांचा थेट इशारा

IND A vs AFG A : भारतीय संघाचे लोटांगण; अफगाणिस्तानने उपांत्य फेरीत वाईट पद्धतीने हरवले

SCROLL FOR NEXT