पणजी : महाराष्ट्रात निवडणूक म्हटले की चौकाचौकात होर्डिंग, बॅनर, पक्षाचे झेंडे, पोस्टरचे जणू युद्धच पहायला मिळते. रिक्षातून कानठळ्या बसवणारी प्रचारगीते, कोपरा सभा, पदयात्रा असा सारा माहोल असतो. गोव्यात नेमके याच्या उलट चित्र आहे. प्रचार सुरु आहे मात्र तो अतिशय शांतपणे केवळ घराघरांत. गोव्याच्या स्वभावाला साजेसा असा प्रचाराचा सारा सुशेगाद (निवांत) माहोल सध्या सर्वत्र अनुभवायला मिळत आहे. (Goa Assembly Election Updates)
गोव्यात येत्या १४ फेब्रुवारीला ४० विधानसभा मतदारसंघासाठी मतदान आहे. पणजी शहरात तसेच आजूबाजूच्या कलंगुट, तालीगाव, पोर्वारिम या ग्रामीण मतदारसंघात फेरफटका मारला तर निवडणुकीचा तामझाम तसा दिसत नाही. थेट रस्त्यावर प्रचाराचे फारसे प्रतिबिंब उमटत नाही. कोठेही तो दृश्य स्वरूपात ठासीवपणे नजरेत भरत नाही. कोठे झेंडे नाहीत की बॅनर्स. गोव्याची निवडणूक ही तशी वेगळीच असते. त्यात यंदा कोरोनाचे सावट असल्याने प्रचारावर अधिक निर्बंध आले आहेत. त्याचे प्रत्यंतर पदोपदी जाणवत आहे.
येथील टॅक्सीचालक, हॉटेलमालक, भाजीविक्रेते यांच्याशी बोलताना यामागील इंगित समजते. पणजी तुलनेने स्वच्छ शहर आहे. येथील चकाकक रस्ते सहज डोळ्यात भरतात. या रस्त्यांचे विद्रुपीकरण सहसा कोणी करत नाही. लोकांनाही ते आवडत नाही. त्यामुळे येथे कधीच कोणाच्या वाढदिवसाचे किंवा निवडीच्या शुभेच्छांच्या बॅनरनी चौक व्यापलेले नसतात. सत्तारूढ भाजप तसेच काँग्रेसला हे पुरेपूर माहिती आहे. त्यामुळे कोणताच मोठा पक्ष येथे फारशी बॅनरबाजी करत नाही.
सत्तेच्या रस्सीखेचीत आघाडीवर असलेल्या या पक्षांचे फारसे बॅनर येथे नाहीत. मात्र गोव्याच्या रणधुमाळीत नव्याने उतरलेल्या तृणमूल काँग्रेस तसेच आम आदमी पक्षाला कदाचित हे माहीत नसावे. कारण या पक्षांचे ग्रामीण भागात मोठे बॅनर दिसतात. त्याबद्दल एक रिक्षावाला स्पष्टपणे म्हणाला, रस्ते विद्रूप करून कधी कोणाला मते मिळत नसतात. त्याची ही प्रतिक्रिया प्रातिनिधीक म्हणावी लागेल.
घरोघरी भेटीगाठी घेण्यावर भर
येथे प्रामुख्याने घरोघरी मतदारांच्या थेट भेटीगाठींवर उमेदवारांचा भर आहे. कोरोनाच्या निर्बंधांमुळे पर्यायही नाही. गोव्यातील मतदारसंघही फार मोठे नाहीत. प्रत्येक मतदारसंघात २२ ते ३३ हजार मतदार आहेत. येथील सर्वात मोठ्या काणकोण मतदारसंघात अवघे ३४ हजार २४१ मतदार आहेत. पुण्या- मुंबईचा विचार केला तर तेथील प्रभागही यापेक्षा मोठे आहेत. महाराष्ट्रात विधानसभा मतदारसंघात साधारणपणे किमान तीन लाख मतदार असतात.
सर्व मतदारांना एकदा तरी भेटण्याचा उमेदवारांचा प्रयत्न असतो. अन्यथा मतदार खप्पा होण्याची भीती असते. मतदारांचीही उमेदवारांनी आपल्या घरी यावे अशी अपेक्षा असते. प्रत्येक घरात चार ते पाच मतदार असल्याचे गृहीत धरून प्रचाराची आखणी करीत असल्याचे काही उमेदवारांनी सांगितले. त्यामुळे शेवटच्या टप्प्यात प्रत्येक घरी पोहोचण्यासाठी सर्वच पक्षांचे उमेदवार प्रयत्नांची शिकस्त करीत आहेत. पण ती देखील सुशेगादपणे.
विजयासाठी हवीत आठ ते नऊ हजार मते
कमी मतदारसंख्येमुळे येथील निवडणुका प्रचंड चुरशीने होतात. त्यामुळे पक्षापेक्षाही वैयक्तिक संपर्क अत्यंत महत्त्वाचा ठरतो. आठ ते नऊ हजार मते मिळवणारा उमेदवार येथे विजयी होतो. त्यामुळे वैयक्तिक संपर्काला येथे अनन्यसाधारण महत्त्व आहे. यासाठीच प्रत्येक उमेदवार प्रत्यक्ष घरी जाऊन मतदारांना भेटण्यावर भर देतो.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.