पणजी : गोवा निवडणुकीची भाजपची सूत्रे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हाती, तर काँग्रेसचे सुकाणू कर्नाटकातील नेते दिनेश गुंडूराव यांच्याकडे आहे. या दोन्ही नेत्यांनी आपापल्या राज्यातील आमदारांची यंग ब्रिगेड गोव्यात प्रचारासाठी उतरवली आहे. (Goa Assembly Election Updates)
महाराष्ट्रातील भाजपचे तब्बल १७ तरुण आमदार, तीन खासदार महिनाभर गोव्यातच तळ ठोकून असून सारे मतदारसंघ पिंजून काढत आहेत. तर काँग्रेसच्या दिमतीला कर्नाटकातील पंधरा आमदार आहेत. भाजप व कॉंग्रेसने गोव्याची निवडणूक प्रतिष्ठेची केली असून दोन्ही पक्ष प्रचारात कोणतीही कसर बाकी राहू न देण्याची काळजी घेत आहेत. गोवा म्हणजे मनोहर पर्रीकर असेच भाजपसाठी गेली वीस वर्षे समीकरण होते. यंदा प्रथमच पर्रीकर यांच्याशिवाय भाजप निवडणुकांना सामोरे जात आहे. त्यामुळे फडणवीस यांच्यावर पक्षाने मोठी जबाबदारी सोपविलेली आहे. सत्ता राखण्यासाठी भाजप प्रयत्नांची पराकाष्ठा करीत असून महाराष्ट्रातील अनेक आमदार, खासदार, पदाधिकाऱ्यांवर त्यांनी जबाबदाऱ्या सोपविल्या आहेत.
याबाबत आमदार सिद्धार्थ शिरोळे म्हणाले, अन्य पक्षांतून आलेल्या जवळपास दहा आमदारांना भाजपने उमेदवारी दिली आहे. या आमदारांना भाजपशी प्रचारपद्धती, बूथरचनेची माहिती देणे. भाजप कार्यकर्ते तसेच हे नवे उमेदवार आणि त्यांचे समर्थक यांच्यात समन्वय साधणे. त्याचप्रमाणे सध्याचे जे भाजपचे आमदार आहेत त्यांच्या प्रचाराचा समन्वय ठेवण्याची जबाबदारी पक्षाने आमच्यावर सोपविलेली आहे.
हे नेते मुक्कामालाच
खासदार मनोज कोटक, उन्मेष पाटील, सुनिल मेंढे तर आमदार सिद्धार्थ शिरोळे, महेश लांडगे, राहुल नार्वेकर, राम शिंदे, राम सातपुते, समाधान आवताडे, प्रशांत ठाकूर, रवींद्र चव्हाण, प्रवीण दटके, निरंजन डावखरे, सचिन कल्याणशेट्टी, संजय केळकर, मंगेश चव्हाण, योगेश सगर, सुनिल राणे, पराग अळवणी, अमित साटम माजी आमदार विनय नातू, बाळा भेगडे हे गेले अनेक दिवस येथेच आहेत. पक्षाने प्रत्येकावर एकेका मतदारसंघांची जबाबदारी सोपविलेली आहे. काही जण गोव्यात जवळपास महिनाभर मुक्कामीच आहेत. तर काही जण आपल्या मतदारसंघात येऊन-जाऊन करतात.
काँग्रेसपुढेही यंदा मोठे आव्हान
काँग्रेसपुढेही यंदा मोठे आव्हान आहे. गेल्या वेळी पक्षाचे १७ आमदार निवडून आले होते. त्यापैकी केवळ दोन जण आता पक्षात राहिलेले आहेत. त्यामुळे पक्षाने अनेक नव्या चेहऱ्यांना संधी दिलेली आहे. पक्षाने प्रचारात कोणतीही कसर ठेवलेली नाही. महाराष्ट्र व कर्नाटकातील अनेकावंर पक्षाने जबादाऱ्या सोपविल्या आहेत. पक्षाचे गोव्याचे प्रभारी दिनेश गुंडूराव म्हणाले, महाराष्ट्रातील मंत्री विश्वजित कदम, सतेज पाटील यांच्यावर पक्षाने काही मतदारसंघांची जबाबदारी सोपविलेली आहे. त्याशिवाय महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, मंत्री यशोमती ठकूर, नसीम खान प्रचाराला येत हेत. कर्नाटकातील पंधरा आमदार माझ्या मदतीसाठी येथे आलेले आहेत. त्यांच्यावर पक्षाने विविध जबाबदाऱ्या सोपविलेल्या आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.