अनेक महिला गरोदरपणादरम्यान येणारे स्ट्रेचमार्क कसे घालवायचे किंवा स्ट्रेचमार्क्स येऊ नयेत यासंबंधी विचारणा करतात. हे स्ट्रेचमार्क्स सर्वसामान्यपणे पोटावर, स्तनांवर आणि मांडीच्या आतील बाजूस येतात. आपल्या त्वचेच्या आतील बाजूस इलॅस्टीन आणि इलॅस्टीन फायबरचा असतात. गरोदरपणादरम्यान मातेचे वजन वाढल्यामुळे पोटाचा आकारही वाढतो. त्यामुळे इलॅस्टीन फायबर काही प्रमाणात तुटतात. त्वचा पातळ असल्याने आणि हे फायबर तुटल्यामुळे व त्वचा ताणली गेल्याने त्याचे व्रण त्वचेवर वेगवेगळ्या आकारात दिसून येतात. या व्रणांना स्ट्रेचमार्क्स असे म्हणतात. हे स्ट्रेचमार्क पांढरे, लालसर किंवा काही वेळा काळपट असतात. गरोदरपणादरम्यान अचानक वाढलेले वजन स्ट्रेचमार्क्सचे प्रमुख कारण असते. महिलेच्या आईला किंवा बहिणीला त्यांच्या गरोदरपणादरम्यान स्ट्रेचमार्क्स आले असतील, तर मुलीच्या गरोदरपणादरम्यान स्ट्रेचमार्क्स येऊ शकतात. गरोदरपणादरम्यान पुरेसे पाणी प्यायले गेले नाही, तरी स्ट्रेचमार्क्स येऊ शकतात. तुम्ही नियमितपणे व्यायाम करणाऱ्या नसाल, तर त्वचेची लवचिकता कमी असते, त्यामुळेही स्ट्रेचमार्क्स येऊ शकतात.
स्ट्रेचमार्क्ससाठी आणखी एक कारण म्हणजे हार्मोन्स. गरोदरपणादरम्यान हार्मोन्स अधिक प्रमाणात निर्माण झाल्यामुळेही स्ट्रेचमार्क्स येऊ शकतात. गरोदरपणादरम्यान हिरव्या भाज्या, अँटीऑक्सिडंट्स आणि सुकामेवा यांचा समावेश असलेला चौरस आहार मिळाला नाही, तरीही स्ट्रेचमार्क्स पडू शकतात. खरे तर स्ट्रेचमार्क्स निर्माण झाल्यावर किंवा निर्माण होऊ नयेत यासाठी कोणताही ठोस उपाय नाही. मातेने कोणतेही क्रीम वापरले तरी स्ट्रेचमार्क्स शंभर टक्के जातीलच असे नाही. एकदा त्वचा प्रमाणाबाहेर ताणली गेली, की ती पूर्ववत होण्यासाठी बराच काळ लागत असल्याने काही स्ट्रेचमार्क्स राहतातच. स्ट्रेचमार्क्स निर्माण होऊ नयेत म्हणून काही प्रकारे स्वत:ची काळजी घेणे महत्त्वाचे आहे.
जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
वजन वाढीवर नियंत्रण : गरोदरपणादरम्यान मातेचे वजन वेगाने वाढत असल्यास त्यावर नियंत्रण ठेवावे.
भरपूर पाणी प्या : गरोदरपणादरम्यान इतर द्रव पदार्थांबरोबर तीन ते चार लीटर पाणी दिवसभरात पिणे आवश्यक आहे. तसेच नारळ पाणी प्यावे.
नियमित व्यायाम करा : गरोदरपणादरम्यान नियमित व्यायामामुळे त्वचेची काळजी व लवचीकपणा कायम राहण्याबरोबरच रक्ताभिसरण सुरळीत होते.
देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
ओलसरपणा कायम राखा : स्ट्रेचमार्क्स येऊ नयेत किंवा ते कमी व्हावेत यासाठी बाजारात अनेक क्रीम उपलब्ध आहेत. तरीही त्वचा कोरडी पडू नये व तिचा ओलसरपणा कायम राहावा यासाठी गरोदरपणाच्या पहिल्या आठवड्यापासूनच काळजी घ्यावी. दिवसातून दोनदा खोबरेल तेल, ऑलिव्ह ऑइल किंवा बदामाच्या तेल लावा. आंघोळीनंतर तेल लावल्यास त्वचा व्यवस्थितपणे तेल शोषून घेऊ शकते.
कॅफिन : कॅफिनमुळे त्वचेचा ओलसरपणा कमी होऊ शकतो. त्यामुळे कॉफी, चहा, शीतपेये, सोडा इत्यादीचे सेवन शक्य तेवढे कमी करावे.
पौष्टिक आहार : गरोदरपणादरम्यान पौष्टिक व आरोग्यपूर्ण खाद्यपदार्थांचे सेवन करावे. आहारात हिरव्यागार पालेभाज्या, सुकामेवा, मांसाहारी पदार्थ आणि जीवनसत्त्व ‘इ’ असलेले पूरक पदार्थ यांचा समावेश असावा. जीवनसत्त्व ‘इ’युक्त मॉईश्चरायझर्सचा उपयोग होऊ शकतो.
प्रसूतीनंतरचे स्ट्रेचमार्क्स कसे कमी करावेत :
गरोदरपणात मातेचे वजन वाढलेले असते. मात्र, प्रसूतीनंतर एकदम झपाट्याने कमी होऊ नये याची काळजी घ्यावी. वजन हळूहळू कमी झाल्यास त्वचा पूर्ववत होण्यासाठी पुरेसा वेळ मिळतो. स्ट्रेचमार्क्सची समस्या मोठ्या प्रमाणावर होत असल्यास त्वचारोग तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.